मेक्सिकोमधील सर्वात कुख्यात ड्रग्ज माफियांपैकी एक असलेल्या नेमेसियो ओसेगुएला याच्या मृत्यूनंतर अद्यापही मेक्सिको धगधगत आहे. ५९ वर्षीय नेमेसियो हा कुख्यात ड्रग्ज माफिया ‘एल मेंचो’ या नावाने ओळखला जात होता. गेल्या तीन दशकांपासून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून त्याने मेक्सिकोसह अमेरिकेतही ड्रग्ज तस्करीचे जाळे विणले होते. अमेरिकन सरकारने एल मेंचोवर ₹१.३६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. एल मेंचोला पकडण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराचा वापर करण्यात आला; पण या दोन्ही वेळी त्याने लष्करावर मात केली. कारण एल मेंचोकडे लष्कराहून प्रगत अशी हत्यारे आणि अन्य युद्धसामुग्री होती. शिवाय एल मेंचोचे सुरक्षा दल अत्यंत मोठे आणि कायम शस्त्रसज्ज असायचे. अशा परिस्थितीत त्याच्या सुरक्षेचा भेद करणे मेक्सिको आणि अमेरिकेलाही अशक्य वाटत होते. अशावेळी सुरक्षा यंत्रणांनी एल मेंचोवर थेट नजर ठेवण्याऐवजी त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवली आणि हा क्रूरकर्मा ठार झाला. ( El Mencho )

मेक्सिकोचा ड्रग्ज माफिया एल मेंचो याच्या मृत्यूनंतर अशांत झालेले मेक्सिको आता लष्कराने ताब्यात घेतले आहे. एल मेंचोच्या मृत्यूनंतर जाळपोळ करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एल मेंचोच्या विश्वासू साथीदारांना थेट गोळ्या घालण्यात आल्या असून, त्यात त्याचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या वकिलाचाही समावेश आहे. मात्र मेक्सिकोमध्ये अद्यापही एल मेंचोची दहशत जाणवत आहे. त्यामुळे तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता या ड्रग्ज माफियाला लष्कराने कशा गोळ्या मारल्या, याच्या कथा मेक्सिकोमध्ये सांगितल्या जात आहेत. कोणावरही सहज विश्वास न ठेवणारा एल मेंचो त्याच्याच प्रेयसीमुळे मारला गेला आहे. सुरक्षा यंत्रणांना तो २०२२ पासून गुंगारा देत होता. तेव्हापासूनच या यंत्रणांनी त्याच्या मैत्रिणीवर करडी नजर ठेवली होती. तिचा माग काढत ही यंत्रणा एल मेंचोपर्यंत कशी पोहोचली, याची कथा सुरस आहे.
एल मेंचो आणि त्याची पत्नी गेल्या काही वर्षांपासून विभक्त होते. एल मेंचो त्याच्या नव्या प्रेयसीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रेयसीवर सुरक्षा यंत्रणांनी नजर ठेवली होती. तिच्या सर्व हालचाली टिपल्या जात होत्या. ती कधी, कुठे जाते, कधी बाहेर पडते, याची चोख माहिती गोळा करण्यात आली होती. मेंचोची ही प्रेयसी जलिस्कोमधील तपालपा या पर्वतीय शहराजवळील एका निर्जन स्थळी असलेल्या मोठ्या बंगलेवजा हवेलीमध्ये वारंवार येत असल्याची माहिती मिळाली. मेंचोची ही प्रेयसी त्याच्या इतकी विश्वासाची होती की, तिच्यावर एल मेंचोच्या इतर कोणत्याही साथीदारांनी नजर ठेवलेली नव्हती. ती कधीही मेंचो राहत असलेल्या गुप्त ठिकाणी जाऊ शकते, हे स्पष्ट झाले होते. तिची कोणतीही तपासणी करण्यात येत नसे. ( El Mencho )
२१ फेब्रुवारीच्या रात्रीही एल मेंचोची प्रेयसी तो राहत असलेल्या निवासस्थानी गेल्यावर सुरक्षा यंत्रणांनी आपली योजना सुरू केली. सुरक्षा दलांनी दुसऱ्या दिवशी संपूर्ण कंपाऊंडला वेढा घातला. दुसऱ्या दिवशी ही प्रेयसी बाहेर पडेल, तेव्हा हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले. एल मेंचो तेव्हा त्या कंपाऊंडमध्येच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी चौफेर बाजूंनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी एल मेंचोच्या अंगरक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चार लष्कराचे जवान ठार झाले आणि काही जखमी झाले. मात्र लष्कराची तयारी भक्कम होती. आपला निभाव लागणार नाही, याचा अंदाज एल मेंचोला आला आणि त्याने आपल्या दोन विश्वासू साथीदारांसह जंगलाकडे पलायन केले. त्याला पळताना पाहून सशस्त्र दलांनी त्याचा पाठलाग केला. त्यात मेंचो आणि त्याचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. त्या तिघांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात दाखल करत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
=======
हे देखील वाचा : El Mencho: एका ड्रग्ज माफियाच्या ताब्यात जेव्हा संपूर्ण देश जातो
=======
मेक्सिकोचे संरक्षण मंत्री रिकार्डो ट्रेव्हिला यांनी हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तसेच मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन सैन्य या कारवाईत सहभागी नव्हते. एल मेंचोला ठार करण्याचे सर्व श्रेय मेक्सिकोच्या सैनिकांचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्थात एल मेंचो ठार झाल्यानंतर त्याचे हस्तक उद्रेक करतील, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला होता आणि तो खरा ठरला. आतापर्यंत मेक्सिकोमधील हिंसाचारात किमान २५ नॅशनल गार्ड सैनिक आणि सुमारे ३० संशयित टोळी सदस्य मारले गेले आहेत. तसेच एल मेंचोच्या कार्टलकडे असलेली मोठ्या प्रमाणातील शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ( El Mencho )
– सई बने
