राजस्थानमधील जयपूरच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर म्हणून ओळख असलेले एकलिंगेश्वर महादेव मंदिर हे जगभरातील शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिराचे दरवाजे राजघराण्यातील सदस्यांसाठी सदैव उघडे असले तरी सर्वसामान्य शिवभक्तांसाठी केवळ शिवरात्रीच्या दिवशीच या मंदिरात प्रवेश असतो. त्यामुळे शिवरात्रीच्या दिवशी तमाम शिवभक्त एकलिंगेश्वर महादेव मंदिरात गर्दी करतात.
एका छोट्या डोंगरावर असलेल्या किल्यामध्ये वसलेल्या या मंदिराचा परिसरही अत्यंत सुंदर आहे. दाट झाडी असलेल्या या डोंगरावर अनेक पक्षांचे वास्तव्य आहे. मोर येथे मुक्तपणे विहार करत असतात. या महादेवाच्या डोंगराखालीच भव्य आणि तेवढेच सुंदर असे बिर्ला मंदिर आहे.
या सर्वांमुळे जयपूरमधील मोती डुंगरी येथील या एकलिंगेश्वर महादेव मंदिर शिवरात्रीच्या दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात येतं. या दिवशी मंदिरात शिवभक्तांच्या लांबच लांब रांगा असल्या तरी या नितांत सुंदर परिसरामुळे आणि महादेवाच्या भेटीच्या ओढीमुळे शिवभक्तांचा सर्व थकवा दूर होतो.

जयपूर राजघराण्याच्या राजमाता गायत्री देवी यांची नितांत श्रद्धा एकलिंगेश्वर महादेवावर होती. त्या नित्य नियमानं महादेवावर अभिषेक करीत असत. श्रावण महिन्यात येथे राजघाराण्याकडून सहस्त्र रुद्राभिषेक करण्यात येतो. एरवी राजघराण्यातील सदस्य उपस्थित नसले तरी फक्त पुजारी महादेवावर अभिषेक करतात. त्याव्यतिरिक्त कोणालाही येथे प्रवेश करण्याची परवानगी नाही.
शंकर गढी मंदिर म्हणूनही ओळख असलेल्या या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्सवात साजरी होते. शिवपिंडीवर अभिषेक करुन पुजा करण्यात येते. अर्थात पहिला मान राजघराण्यातील सदस्यांना असतो. संपूर्ण मंदिरावर फुलांची सजावट असतेच शिवाय पूर्ण डोंगरही फुलांनी सजवण्यात येतो.
वर्षातून एकदाच शिवभक्तांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात येत असल्यानं भाविकांना शिवपिंडीवर जलाशिषेक करण्याचा मान मिळतो. त्यासाठी हे भाविक किमान एक किलोमिटरची पायपीट करीत महादेवाच्या चरणी येतात. भाविक रात्रीपासून रांगा लावतात. भक्तांचा हा आकडा तीन लाखांच्याही पुढे जातो.
====
हे देखील वाचा: Mahashivaratri: महाशिवरात्री का साजरी केली जाते?
====

या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. जयपूर शहराच्या निर्मितीच्या आधीच या मंदिराची स्थापना करण्यात आली तेव्हा भगवान शंकराची मूर्तीसोबत देवी पार्वती आणि शिवशंकर पूत्र गणेशाच्या मुर्तीही येथे स्थापित करण्यात आल्या. मात्र काही दिवसातच या अन्य मूर्ती अचानक गायब झाल्या.
त्यानंतर पुन्हा देवी पार्वती आणि श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या. पण पुन्हा या सर्व मूर्ती अचानक गायब झाल्या. यानंतर मात्र हे एकलिंगेश्वर महादेव मंदिर चमात्कारीक असल्याची चर्चा परिसरात झाली आणि त्यानंतर कधीही महादेवाच्या पिंडीशिवाय अन्य मूर्ती येथे बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही.
====
हे देखील वाचा: एक असे शिव मंदिर ज्या मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज पडते आणि त्यामुळे शिवलिंग दुभंगते!
====
शिवशंकर आपल्या कुटुंबियांपासून नाराज होऊन जयपूरमधील या मोती डुंगरी डोंगरावर आले आणि तेथेच विराजमान झाले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुठल्याही शिव परिवारातील कुटुंबियांची मूर्ती स्थापन झाल्यास गायब होणार अशी आख्यायिका या भागात सांगण्यात येते.
एकलिंगेश्वर महादेव मंदिर! शिवभक्तांना फक्त वर्षातून एकदाच दर्शन देणाऱ्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविक महाशिवरात्रीची वाट पहात असतात. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांची प्रतीक्षाही भक्तांना त्यामुळे सुखावह वाटते.
– सई बने