Home » आहारात ‘हे’ बदल करा आणि हिवाळ्यातील आजारांपासून राहा दूर

आहारात ‘हे’ बदल करा आणि हिवाळ्यातील आजारांपासून राहा दूर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Winter
Share

अनेक ठिकाणी हिवाळा सुरु झाला आणि थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळा हा ऋतू उत्तम शरीर कमवण्यासाठी अतिशय चांगला समजला जातो. या काळात या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते. थंडीशी सामना करण्यासाठी आपल्या शरीराला चांगल्या ऊर्जेची गरज असते आणि त्यासाठी जेवण देखील चांगले जाते. जसे ऋतू बदलतात तसा आपल्याला आपला आहार देखील बदलवणे आवश्यक असते. ऋतू येतात आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच असतो. कधी आपल्या लक्षात येते, कधी नाही.

आता हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे आता आहारात बदल करणे गरजेचे आहे. कारण जिथे उन्हाळ्यात आपण थंड पदार्थ घेतो. तिथेच हिवाळ्यात आपण गरम पदार्थ घेण्यास प्राधान्य देतो. आपल्या आहारात आपण काही गोष्टींचे पालन केले तर आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यास मदत होते. पण ऋतूनुसार आहारात बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या त्या ऋतूंमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करणे.

आहारातील बदलावांमुळे आपल्या शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळत असते. आता हिवाळा सुरु होत असल्याने कोणता आहार घेणे आपल्या आरोग्याच्या आणि शरीराच्या दृष्टीने चांगले ठरेल चला जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या
हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या हिरव्या भाज्या या आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये आढळणारे कॅरोटीनॉइड्स, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हिवाळ्याच्या संसर्गापासून रक्षण करण्यास मदत करतात.

लिंबू
आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि इतरही पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक तत्व या आंबट पदार्थांमधून आणि खासकरून लिंबूमधून आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतात. हिवाळ्यात स्वस्त दरात मिळणारी संत्री खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये लिंबूवर्गीय फळ खाऊन प्रतिकारशक्ती मजबूत ठेवता येते.

Winter

सुका मेवा
प्रथिने, पोटॅशियम आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक घटक बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये आढळतात. हे सर्व मेवे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात आजारी पडण्यापासून बचाव होतो.

दुग्धजन्य पदार्थ
शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध, दही, चीज आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

संपूर्ण धान्य
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तुमच्या आहारात संपूर्ण धान्याचा समावेश केला तर ते तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल. कारण हे मॅग्नेशियम, लोह आणि जस्त, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.

देशी तूप
घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. या ऋतूमध्ये अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा एक अमूल्य स्रोत आहे.

गाजर
हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हे देखील त्यापैकीच एक आहे. एका अभ्यासानुसार नियमित गाजर खाल्ले तर रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

काजू
काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक (जस्त) अशी अनेक खनिजे असतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

आलं
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. याच्या नियमित सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढू लागते. आपण ते चहामध्ये टाकून पिऊ शकता. आल्याचा तुकडा चघळल्याने हिवाळ्यात थंडीपासून आराम मिळतो.

हळद
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळतो, जो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ओळखला जातो. हिवाळ्यात हळदीचे दूध पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती तर वाढतेच, शिवाय शरीर उबदार राहण्यासही मदत होते. कडधान्ये किंवा भाजीपाला यांसारख्या अन्नामध्ये हळदीचाही समावेश केला जाऊ शकतो.

बदाम
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर आणि इतर पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. रोज मूठभर बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण ऊर्जा पातळीही वाढते. हिवाळ्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वांचे शोषण सुधारते.

( टीप- या लेखात देण्यात आलेली माहिती आणि उपाय यांचा उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.