दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील ग्रीस या देशाचे नाव समोर आले की, पांढ-या, निळ्या घरांची सुंदर रांग समोर येते. जगभरातील सर्वाधिक पर्यटक या देशाला भेट देतात. विशेषतः सॅंटोरिनी या ग्रीसमधील बेटावर वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. सॅंटोरिनी हे सायक्लेड्स बेट समूहातील सर्वात दक्षिणेकडील बेट आहे. या बेटाची ओळख म्हणजे, तेथील आकर्षक पांढ-या रंगाची घरं. या बेटाला घेरणा-या समुद्राचे पाणीही निळ्या रंगाचे आहे. याच बेटावर सक्रिय ज्वालामुखीही आहे. या सर्वांमुळे सॅंटोरिनी बेटांवर पर्यटकांची तोबा गर्दी होते. मात्र आता त्याच पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. कारण गेल्या दोन दिवसात या सॅंटोरिनी बेटावर तब्बल 200 हून अधिक भूकंप झाले आहेत. (Greece)
या भूकंपामुळे येथील ज्वालामुखीचा स्फोट होणार अशी अफवाही पसरली आहे. परिणामी येथील पर्यटकांनी देश सोडण्यासाठी विमानतळांवर गर्दी केली आहे. यासर्वात सॅंटोरिनी बेटावर रहाणा-या नागरिकांमध्येही मोठी घबराट पसरली आहे. या बेटाचे सर्व अर्थकारण हे पर्यटकांवर अवलंबून आहे. पर्यटकच सॅंटोरिनी बेटापासून दूर राहिले तर करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहेच. शिवाय सातत्यानं येणारे भूकंप हे 1956 सारख्या मोठ्या भूकंपाची चाहूल तर नाही ना, हा प्रश्नही त्यांना सतावत आहे. ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटाचे फोटो आणि व्हिडिओ हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या बेटावर अनेक भारतीय चित्रपटांचे शुटिंग झाले आहे. अनेक लोकप्रिय गाणी ही ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर चित्रित झाली आहेत. (International News)
बँग बँग चित्रपटातील मेहरबान हे गाणे याच बेटावर चित्रित झाले आहे. आता हेच सुंदर बेट मोठ्या नैसर्गिक आव्हानाचा सामना करत आहे. गेल्या 2 दिवसात या बेटावर 200 हून अधिक भूकंप झाले आहेत. त्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले असून प्रथम या भागातील शाळा बंद कऱण्यात आल्या आहेत. या संपूर्ण बेटाचा ताबा आता पोलीस आणि बचाव कर्मचा-यांनी घेतला आहे. या भागात एवढ्या मोठ्या संख्येनं होत असलेल्या भूकंपामुळे, भूकंप तज्ञ आणि सरकारी अधिकारी यांच्यात बैठका चालू आहेत. यातून सॅंटोरिनी बेटावर पुढेही असेच भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वात येथे मोठ्या संख्येनं असलेल्या पर्यटकांनी बेटापासून दूर रहाणे पसंत केले आहे. सॅंटोरिनी बेटाच्या भोवती असलेल्या समुद्रामध्ये अनेक मोठ्या बोटींमध्ये पर्यटक रहाण्यासाठी येतात. सध्या या बोटी खाली करण्यात आल्या असून पर्यटकांनी विमानतळावर अन्य ठिकाणी जाण्यासाठी गर्दी केली आहे. त्यातच प्रशासनानं समुद्रकिना-यापासून दूर रहाण्याचे आदेशही नागरिकांना दिले आहेत. शिवाय स्विमिंग पूलही बंद करण्याचे आदेश आहेत. (Greece)
सॅंटोरिनी बेटावरील सर्व शाळांना सुट्टी दिली असून त्याच्या आसपास असणा-या अनाफी, आयोस आणि अमोर्गोस या बेटांवरील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. स्थानिक अधिका-यांनी या भागात मोठे समारंभ करण्यासही बंदी घातली आहे. या सर्वांमुळे सॅंटोरिनी बेटावरील स्थानिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पांढ-या रंगाची घरे आणि इमारती असलेले हे जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. हे शहर मोठ्या भूकंपामुळे उदधवस्त तर होणार नाही, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे. याशिवाय येथील ज्वालामुखीचा विस्फोट होणार अशी शंकाही स्थानिकांना त्रस्त करीत आहे. मात्र या भूकंपांचा ज्वालामुखीशी काहीही संबंध नसल्याचे भूकंपतज्ञांनी स्पष्ट केले आहे. या भागात यापुढे 6 रिश्टर स्केलपर्यंत भूकंप होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सॅंटोरिनीच्या मुख्य शहराचा मोठा भाग एका कड्यावर आहे. मोठा भूकंप झाला तर या भागात मोठी हानी होण्याची शक्यता आहे. (International News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या कड्यावरील मोठे दगड पडण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. सॅंटोरिनीमधील हॉटेल बहुतांशी अशाच कड्यांच्या काठावर असलेल्या रस्त्यांवर आहेत. ही हॉटेलही खाली करण्याची सूचना देण्यात आली आहे. मोठा भूकंप झालाच तर बचाव पथके आणि प्रशिक्षीत कुत्रे यांच्या टिम तयार करण्यात आल्या आहेत. सॅंटोरिनीमध्ये एकूण चार छोटी बेटे येतात. या सर्वांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्या सर्व बेटांवर अशीच काळजी घेण्यात येत आहे. या बेटांवर साधारण 20 हजारांहून अधिक नागरिक रहातात. मात्र येथे दरवर्षी 34 लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. 1956 मध्ये सॅंटोरिनी बेटावर सर्वात मोठा, 7.5 रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यात 53 नागरिकांचा मृत्यू झाला होता. शिवाय या बेटावरील बहुतांश घरे कोसळली होती. आता 69 वर्षांनी असाच भूकंप होणार अशीच भीती सॅंटिरिनीमधील नागरिक व्यक्त करीत आहेत. (Greece)
सई बने