जागतिक हवामान बदलाचा भयानक फटका हिमालयला बसणार असून हिमालयात ८ ते ९ रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप येऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. रुडकी आयआयटीचे प्राध्यापक एमअएल शर्मा यांनी हा दावा केला आहे. भूकंप या विषयात पीएचडी केलेले प्राध्यापक शर्मा यांनी हा दावा केल्यामुळे त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण अभियांत्रिकी भूकंपशास्त्र, भूकंपविज्ञान, भूकंपाचा धोका विश्लेषण आदी विषयात प्राध्यापक शर्मा यांचा अभ्यास आहे. हिमालयातील हिमशिखरांना हवामान बदलाचा फटका बसणार का याबाबत प्रा. शर्मा गेले काही वर्ष अभ्यास करीत आहेत. या अभ्यासामधून हिमालयात विनाशकारी भूकंपाच्या विळख्यात येऊ शकतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
जगात सर्वत्रच हवामान बदलाचा फटका बसत आहे. काहीवेळा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, तर काही ठिकाणी अतिरिक्त पडणा-या पावसानं शेतजमिनीची प्रचंड धूप झाली आहे. याच हवामान बदलाचा फटका हिमालयालाही बसला आहे. हिमालयातील हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेमुळे या हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी या नद्यां ज्या प्रदेशातून जातात, तेथे पाण्याची पातळी भविष्यात वाढणार आहे. काही ठिकाणी या नद्या प्रवाहाबाहेर येणार आहेत. या सर्वातून हिमालयातील हिमपर्वत हे कमकुवत होऊन येथे खूप मोठा भूकंप येण्याची शक्यता प्राध्यापक एमअएल शर्मा यांनी वर्तवली आहे. हा भूकंप ८ ते ९ तीव्रतेचा असणार आहे. यामुळे या भागातील मानवी जीवनला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची भीतीही प्रा. शर्मा यांनी व्यक्त केली आहे. प्रा. शर्मा हे आयआयटी रुडकीचे प्रमुख आहेत.

भूकंप या विषयावर ते अभ्यास करीत आहेत. भूकंपामळे होत असलेल्या विनाशकारी हानीला रोखण्यासाठी ते गेल्या काही वर्षापासून भूकंपाची पूर्वसूचना देणारे यंत्र तयार करीत आहेत. भूकंपामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी या भूकंप पूर्वसूचना देणारी यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. यातून भूकंप हा कधी होणार, त्याची तिव्रता किती असणार भूकंप होण्याच्या काही तास आधी समजणार आहे. मिनिटभर आधी भूकंप होणार की नाही यांची सूचना या प्रणालीमार्फत देण्यात येणार आहे. यामुळे मनुष्यहानी वाचवता येईल, असे प्रा. शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. हिमालयीन प्रदेश सेन्सिंग झोन चार आणि पाचमध्ये येतो. हा अतिशय धोकादायक झोन मानण्यात येतो. त्यामुळेच येथे भविष्यात भूकंप होईल, असा दावा प्रा. शर्मा यांनी केली आहे. हिमालयाच्या रांगांमध्ये सर्वात मोठा भूकंप २०१५ मध्ये झाला होता.
या भूकंपामुळ संपूर्ण नेपाळ हादरला होता. खूप मोठी हानी या भूकंपात झाली होती. प्रा. शर्मा यांचा हिमालयासंदर्भातील दावा व्हायरल होत असतांना आता हैदराबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनीही अशाच प्रकारचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. हिमालय आणि उत्तराखंडमध्ये विनाशकारी भूकंप येण्याची शक्यता असल्याचे डॉ. राव यांचे मत आहे. मात्र हा भूकंप नेमका कधी येईल हे स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये झालेल्या बांधकामामुळे या भूकंपाचा धोका वाढल्याचे डॉ. राव यांनी सांगितले आहे. हिमालयातील या संभाव्य भूकंपामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
================
हे देखील वाचा: बिहार मध्ये १७ दिवसांत १२ पूल नदीत पोहायला उत्तरले
==================
ज्या हिमालयाबाबत ही भविष्यवाणी करण्यात येत आहे, त्या हिमालयाची निर्मितीही भूकंपाच्या माध्यमातून झाल्याचा दावा आहे. सुमारे ५५ दशलक्ष वर्षांपूर्वी भारताची युरेशिया प्लेटशी टक्कर झाली आणि जमिनीच्या दोन मोठ्या तुकड्यांमधील टक्कर दरम्यान समुद्राच्या तळापासून जमीन वर येऊ लागली. या तुकड्याला हिमालय म्हणतात. हिमालयात आजही वाढ होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच हा सर्व पट्टा भूंकपप्रवण पट्टा असल्याचा इशारा नेहमी दिला जातो. १९०५ मध्ये हिमाचल प्रदेश मधील कांगडा येथे झालेल्या भूकंपामुळे २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. १९३४ मध्ये झालेल्या भूकंपाचा फटका नेपाळसह भारताली बिहारलाही मोठ्या प्रमाणात बसला होता. याशिवाय १९९१ मध्ये उत्तरकाशी, १९९९ मध्ये चमोली आणि २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपांनी हजारो नागरिकांचा जीव घेतला आहे. भूकंप कधी आणि कसा येणार हे सांगता येत नाही. त्यासाठी कितीही आधुनिक प्रणाली बसवली तरी, त्यातून अवघा एक मिनीट आधी सूचना येते. हिमालयीन भागातही अशी अनेक भूकंपसूचक यंत्रे बसवली आहेत. भविष्यातील धोका यातून नक्की मापता येईल, अशी आशा आहे.
सई बने
