Home » कोलकाता दुर्गा पंडालमध्ये महिलांची वेदना

कोलकाता दुर्गा पंडालमध्ये महिलांची वेदना

by Team Gajawaja
0 comment
Durga Pooja
Share

कोलकाता येथील दुर्गा पूजा आणि त्यासाठी उभारण्यात आलेले भव्य पांडाल हे जगभरातील दुर्गा प्रेमींसाठी आकर्षण असतात. कोलकात्यातील दुर्गापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक कोलकाता येथे येतात. दुर्गापुजेचे 10 दिवस हे कोलकातामधील सर्वाधिक उत्साहाचे दिवस असतात. दुर्गा देवीच्या भव्य मूर्ती असलेले पंडाल बघण्यासाठी हजारोंची गर्दी होते. यावर्षी कोलकाता येथे दुर्गा पूजा 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी तयारी पूर्ण होत आहे. मात्र यावर्षीच्या या दुर्गापुजेच्या उत्साहात कोलकाता येथील आर.जी. हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगण्यात येणार आहे. या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानं आणि नंतर झालेल्या तिच्या हत्येनं संपूर्ण देशालाच हादरवून सोडलं होतं. या कॉलेजमधील सहकारी अद्यापही तिच्यासाठी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत कोलकाताच्या दुर्गा पुजेतही या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारे देखावे उभारण्यात येत आहेत. या सर्वप्रकरणी जनतेचा स्थानिक पोलीस यंत्रणा आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यावर प्रचंड रोष आहे, हा राग या दुर्गा पुजेच्या देखाव्यामधून व्यक्त करण्यात येत आहे. (Durga Pooja)

कोलकातामधील दुर्गापुजा ही जगभर ओळखली जाते. या साठी संपूर्ण कोलकातानगरी दिवाळीसारखी सजवली जाते. दुर्गादेवीचे मोठे देखावे केले जातात. यासाठी काही महिने अनेक कलाकार हे पंडाल तयार करीत असतात. यातील देखावे आणि नयनरम्य लाईट बघण्यासाठी हजारोंची गर्दी कोलकातामध्ये होते. यावेळी कोलकातामध्ये 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान हा दुर्गापुजेचा उत्सव साजरा होणार आहे. कोलकात्यातील दुर्गापूजेचे अनोखे विधी आहेत. नवरात्री सुरू होण्याच्या आठवडाभर आधी दुर्गादेवीच्या मूर्ती रंगवल्या जातात आणि डोळे सोडून बाकी देवीची मुर्ती तयार केली जाते. (Social News)

महालयाच्या दिवशी देवीला विधीपूर्वक आमंत्रित केले जाते आणि शुभ विधीमध्ये मूर्तींवर डोळे लावले जातात. मूर्तींवर डोळे लावताना देवी पृथ्वीवर अवतरते असे मानले जाते. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात. नवरात्रीच्या षष्टीच्या दिवशी, म्हणजे जेव्हा आपल्याकडे सहावी माळ असते, तेव्हा कोलकात्यात दुर्गापूजेचा पहिला दिवस असतो. त्याच दिवशी दुर्गा मुर्ती घरात किंवा भव्य अशा पंडालमध्ये म्हणजेच मंडपामध्ये आणल्या जातात. या मुर्तींच्या सजावटीमध्ये सिंदूर महत्त्वाचा असतो. दशमीचा दिवस या दुर्गापुजेमध्ये महत्त्वाचा असतो. या दिवशी देवीनं राक्षसाचा वध केल्याचे सांगितले जाते. यालाच विजयादशमी म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते यात महिला प्रथम देवीला आणि नंतर एकमेकांना लाल सिंदूर लावून देवीची मिरवणूक काढतात. (Durga Pooja)

देवीचे विसर्जन करण्यापूर्वी मोठी मिरवणूक काढून देवीचे आशीर्वाद घेतले जातात. कोलकातामध्ये अनेक मोठी मंडळे दरवर्षी दुर्गापुजेचे आयोजन करतात. त्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या देवस्थानाचे देखावे उभारण्यात येतात. गेल्यावर्षी कोलकातामधील देखाव्यांमध्ये राममंदिराचे आकर्षण होते. मात्र यावर्षी कोलकाता येथील आर.जी. मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या डॉक्टर तरुणीच्या हत्येचा देखावा काही मंडळांनी उभारला आहे. त्यातून महिलांसाठी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे. कोलकाताच्या एका पंडालमध्ये दुर्गा माँची मूर्ती बसवण्यात आली आहे, जिने आपले डोळे हाताने झाकले आहेत, जणू तिला समोरचे दृश्य दिसत नाही. पुतळ्याच्या अगदी समोर एका महिलेचा मृतदेह दाखवला आहे आणि त्याच्या शेजारी डॉक्टरांचा ड्रेस लटकलेला आहे. (Social News)

======

हे देखील वाचा :  खबरदार दुर्गा पूजा कराल तर !

======

अभिजीत सरकार यांच्या घरासमोर हा दुर्गा पंडाल उभारण्यात आला आहे. अभिजीत सरकार यांचा 2021 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात मृत्यू झाला होता. अभिजीतचा भाऊ बिस्वजित सरकार यांनी यावर्षीच्या दुर्गा पंडालमध्ये आर.जी. मेडिकल कॉलेजमधील अत्याचार प्रकरणाचा देखावा उभारण्यास सहाय्य केलं आहे. शिवाय त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर प्रश्न उपस्थित केला की, या पंडालची थीम नाही, तर बंगालमध्ये घडणाऱ्या घटनांचे सत्य आहे. याशिवाय अन्य काही पंडालमध्येही आर.जी. कॉलेजमधील घटनेची नोंद घेण्यात आली आहे. कोलकातामध्ये दुर्गा माता पंडालमध्ये मोठ्याप्रमाणात विद्युत रोषणाई कऱण्यात येते. मात्र काही मंडळांनी यावर्षी विद्युत रोषणाई न करण्याचा निर्णय घेत, आर.जी. मेडिकल मधील डॉक्टर युवतीस श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. (Durga Pooja)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.