अमेरिकेने लष्करी विमानाने 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवले आहे. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या या भारतीयांवरून सध्या गदारोळ सुरू आहे. कारण या सर्वांना हातात बेड्या घालून पाठवण्यात आले आहे. आता या तरुणांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मात्र अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी खर्च केलेल्या रक्कमेवरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातील काहींनी पन्नास लाखापासून ते एक करोडपर्यंत खर्च केले आहेत. काही एजेंटच्या माध्यमातून ही मंडळी डंकी रुटनी अमेरिकेत पोहचली. यासाठी अनेकांना आपली घरे आणि जमिनीही विकल्या आहेत. यातील काहींना तर अमेरिकेच्या हद्दीत दाखल झाल्यावर लगेच पकडण्यात आले. या सर्वांनीच डंकी रुट हे भीषण वास्तव अमेरिकेत जाण्यासाठी पार केले. (America)
आपल्याजवळची लाखोंची पुंजी अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी खर्ची घातली. पण ही पूंजी खर्ची घालतांना आपण निवडलेला मार्ग हा बेकायदेशीर आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. शिवाय या डंकी रुटमधील धोक्यांचीही त्यांना कल्पना देण्यात आली होती. पण तरीही अमेरिका या मोहजालामागे लागून या सर्वांनी या डंकी रुटनं प्रवास केला. या डंकी रुटनं अशाच अनेक तरुणांचा जीवही घेतला आहे. अमेरिकेत जाण्यासाठी फक्त भारतातील नव्हे तर जगभरातील लाखो स्थलांतरित या डंकी रुटचा वापर करतात. यात त्यांच्या जीवाला धोका आहे, याची जाणीवही त्यांना असते. या अवघड वाटेचे डंकी रुट असे नामांतर कसे झाले, आणि त्यातील नेमके धोके कसे आहेत, हे जाणून घेऊयात. (International News)
अमेरिका आणि युरोपमधील विकसित देशांमध्ये जाण्यासाठी डंकी रुटचा वापर होतो. यातून लाखो स्थलांतरित बेकायदेशीरपणे संबंधित देशात पोहचतात. वास्तविक कोणत्याही देशाच्या नागरिकांला दुस-या देशात जायचे असेल तर त्याला पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता असते. पण ही दोन्हीही महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर हा प्रवास बेकायदेशीर मार्गानं होतो. प्रामुख्यानं पंजाबमधील तरुणांची अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील सर्वच इच्छूकांना व्हिसा मिळत नाही. व्हिसा नाकारलेले हे तरुण बेकायदेशीर मार्ग अवलंबतात. 2023 मध्ये शाहरुख खानचा डंकी नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटावरुनच मग परदेशात बेकायदेशीरमार्गानं जाणा-यांनी डंकी रुट हा शब्द रुढ झाला. (America)
अमेरिकेत अशा डंकी रुटनं म्हणजेच बेकायदेशीर मार्गानं जाणं हे धोकादायक आणि अत्यंत खर्चिक असे आहे. या सर्वात एजंट हा प्रकार असतो, आणि हे एजंट मागतील ती रक्कम द्यावी लागते. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशात जाण्यासाठी असा डंकी रुट देणारे अनेक एजंट पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यात आहेत. व्हिसा नाकारलेले तरुण या एजंटच्या जाळ्यात येतात आणि त्यांच्या आश्वासनांना भुलून लाखो रुपये बेकायदेशीरपणे चालणा-या प्रवासासाठी खर्च करतात. हे एजंट प्रथम संबंधिताची बनावट कागदपत्र तयार करतो. या कागदपत्रात अनेकवेळा त्या युवकांची नावेही बदलण्यात आलेली असतात. बहुतांशी या प्रवासाची सुरुवात दुबईपासून होते. तिथे पोहचल्यावर मग या एजंटची एक साखळीच असल्याचे लक्षात येते. कारण येथे दुसरा एजंट असतो. (International News)
ब-याचवेळा दुबईमध्ये पोहचण्यासाठीही बोटींचा वापर होतो. अशा पद्धतीनं ठराविक अंतरानं एजंट बदलतो आणि प्रवासाचे साधनही. ब-याचवेळा शेकडो किलोमीटर चालतही जावे लागते. काहीवेळा बस किंवा टॅक्सीमधून दाटीवाटीनं प्रवास करावा लागतो. या सर्व मार्गाला डंकी रुट म्हटले जाते. यात समुद्र, जंगल, वाळवंट आणि निर्जन भागातील प्रवासाचा समावेश असतो. अमेरिकेत जाण्याची इच्छा असलेल्या बहुतांश तरुणांना अशाच मार्गातून प्रवास करत मेक्सिको किंवा कॅनडाच्या सीमेपर्यंत आणले जाते. या सर्व मार्गात अनेक एजंट असतात, आणि त्या प्रत्येकाची फी ही काही लाखात असते. यात एजंटचेही अनेक ग्रुप आहेत. त्या प्रत्येकाचे अमेरिकेत प्रवेश करण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. यातील सर्वात कठिण मार्ग हा लॅटिन अमेरिकेतून प्रवेशाचा आहे. एजंट तरुणांना डॅरियन गॅप नावाच्या जंगलातून नेतात. या जंगलात अनेक हिंस्त्र पशू आहेत. शिवाय अनेक घातक अशा गुन्हेगारी टोळ्याही आहेत. (America)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
Donald Trump : ट्रम्पना कुठे करायची आहे, रिसॉर्ट सिटी
===============
या परिस्थितीत पनामाच्या जंगलातून आणि पर्वतांमधून आठ ते दहा दिवस प्रवास करावा लागतो. त्यानंतर कोस्टा रिका आणि निकाराग्वामध्ये प्रवेश होतो. येथून मेक्सिकोची सीमा गाठली जाते आणि मग ती स्वप्नातील अमेरिका बघता येते. हे सर्व होत असतांना किमान दोन वर्षाचाही कालावधी जातो. तसेच लाखो रुपये खर्च करावे लागतात. अनेक महिलांवर या डंकी रुटमध्ये बलात्कारही झाले आहेत. तर अनेकांच्या पैशासाठी हत्या झाल्या आहेत. वास्तविक डंकी रुट म्हणजे, मानवी तस्करीचे मोठे जाळे आहे. अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमावर्ती भागात अनेक बोगदे आहेत. त्यातून या मानवी तस्करी करणा-या टोळ्या लाखो रुपयांची कमाई करत लाखो स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश देतात. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही यासंदर्भात संसदेत माहिती दिली आहे. आता बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचलेल्या या भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून अमेरिका किंवा युरोपमध्ये अशाच डंकी रुटचा वापर करत जाण्याच्या तयारीत असलेल्या अन्य तरुणांनीही धडा घेतल्यास त्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत. (International News)
सई बने