Home » विलासरावांच्या फिल्डींगमुळे राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

विलासरावांच्या फिल्डींगमुळे राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

by Team Gajawaja
0 comment
Vilasrao Deshmukh
Share

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा आज स्मृतिदिन. १९९९ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २००३ साली सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी त्यांनी हे पद सोडले. २००४ साली त्यांनी निवडणूक जिंकून पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. जर २६/११ झाले नसते, तर कदाचित पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे वसंतराव नाईकांनंतर ते दुसरे मुख्यमंत्री ठरले असते. पण इतर काँग्रेस मुख्यमंत्रांप्रमाणे त्यांनीही आपला कार्यकाल पूर्ण केला नाही. २००८ ला जेव्हा त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा हे पद राणेंना मिळू नये म्हणून विलासरावांनी जोरदार फिल्डिंग केली होती.


वर्ष होतं २००७, स्थळ होतं दिल्ली. नारायण राणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटायला गेले होते. सोनिया गांधी राणेंना म्हणाल्या, “राणेजी जल्दही बदलाव आएगा”. सोनिया गांधींनी शब्द दिल्याने नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती. परंतु राणे ज्या स्वप्नाचा पाठलाग करत होते,ते कधीच पूर्ण होणार नव्हते.


मुख्यमंत्रीपदासाठी राणे यांनी शिवसेनेला राम राम केला होता. पण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली. राणे यांनी आपले आत्मचरित्र ‘नो होल्ड बार्ड’ या पुस्तकात काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी कशा प्रकारे झुलवत ठेवलं याचा लेखाजोखा मांडला आहे. (Vilasrao Deshmukh vs Narayan Rane)

२००५ साली राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. सिंधुदुर्गची पोटनिवडणूक एकहाती जिंकून त्यांनी आपले नेतृत्त्व सिद्ध केले होते. पोटनिवडणूक जिंकून राणे काँग्रेसचे आमदार म्हणून विधासभेत दाखल झाले आणि त्यांची वर्णी महसूलमंत्रीपदी लागली. तरी राणेंची नजर मुख्यमंत्रीपदावर होती.


२००७ साली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी राणे यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि विचारले, “आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसवणार आहोत. तुम्हाला याबद्दल काही म्हणायचे आहे का?” राणे म्हणाले, “मी माझ्या कामातून यावर उत्तर देईन. मला दिलेली जवाबदारी मी योग्यरितीने पार पाडेन.” नंतर पटेल यांनी राणेंना सोनिया गांधींकडे नेले, गांधी यांनी राणेंना तुमचं काम लवकरच होईल, असे आश्वासन दिले.


दरम्यान सहा सात महिने यावर काहीच झाले नाही. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख कमी पडले, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आला. आता मुख्यमंत्रीपदी आपलीच निवड होणार असे राणेंना वाटत होते. पण अचानक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले. विलासराव देशमुख यांनीच अशोक चव्हाण यांचे नाव पुढे केले, असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.


राणे म्हणतात “मुख्यमंत्रिपद गेल्यानंतरही राज्याची सूत्रे आपल्या हातात रहावी म्हणून विलासराव यांनी आपल्या हाताखालील माणसाचे नाव पुढे केले. नारायण राणे हे शिवसैनिक आहेत, त्यांच्यावर मुस्लिमविरोधी शिक्का असून त्यामुळे अल्पसंख्याक समाजात काँग्रेसचा मतदार हिरावला जाईल अशी भिती विलासराव यांनी काँग्रेस नेत्यांना दाखवली. इतकेच नाही, तर माझ्या विरोधकांनी मुस्लिम समाजातील वरिष्ठ नेतेही काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला पाठवले होते. (Vilasrao Deshmukh vs Narayan Rane)

परंतु राणे यांनी काँग्रेस नेत्यांकडे आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदर कसे आहोत हे पटवून देण्याचे काम केले. अखेर काँग्रेसने ७ डिसेंबर २००८ रोजी प्रणब मुखर्जी, एके अँटोनी आणि दिग्विजय सिंह या तिघांचे एक शिष्टमंडळ मुंबईला रवाना केले.
विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा नेत्यासाठी मतदान केले. त्यात अशोक चव्हाण यांना ३६, बाळासाहेब विखे पाटील यांना २ तर आपल्याल्या ४८ मतं मिळाली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

====

हे देखील वाचा – सुषमा स्वराज: वाजपेयी काळात घेतला होता महत्त्वाचा निर्णय ज्यामुळे बहरली चित्रपटसृष्टी

====


अनेक आमदारांनी राणे यांचे अभिनंदन केले. आता फक्त प्रणब मुखर्जी माध्यमांसमोर पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा करणार होते. तेवढ्यात विलासराव देशमुख आले आणि त्यांनी प्रणब मुखर्जी यांना १० मिनिटे थांबण्यास सांगितले. तेवढ्यात विलासराव यांनी अहमद पटेल यांना फोन केला. पटेल यांनी प्रणबदांना फोन करुन सांगितले की, मुख्यमंत्रीपदाची घोषणा उद्या दिल्लीतून होईल. (Vilasrao Deshmukh vs Narayan Rane)


शेवटी नारायण राणे यांना कळून चुकले की, आपल्या मनासारख्या गोष्टी होणार नाही. एके अँटनी हे तेव्हा केंद्रीय संरक्षणमंत्री होते. अँटनी यांनी राणेंना हवाई दलाच्या विमानातून दिल्लीला नेले.विमानतळावर पोहोचल्यावर दिग्विजय सिंह यांनी राणे यांचे अभिनंदन करत उद्या तुम्ही मुख्यमंत्री होणार असे सांगितले. रात्री १ वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थाही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार होती, तर सकाळी ११ वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार होती.


राणे दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा अहमद पटेल यांचा त्यांना फोन आला आणि ते म्हणाले, “तुम्ही शरद पवार साहेबांना एकदा फोन करुन सोनिया गांधींना तुमचे नाव सुचवायला सांगा”. राणे यांनी लगेच पवारांना फोन लावला आणि मुख्यमंत्रीपदासाठी सोनिया गांधींना आपले नाव सुचवावे अशी गळ घातली. तेव्हा पवार हसायला लागले आणि त्यांनी सांगितले की, काँग्रेसने आपल्याला एक चिठ्ठी पाठवली आहे, त्यात मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव आहे. त्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचे नाव झळकू लागले. सोनिया गांधी यांनी राणेंना फोन केला, पुढच्या वेळेला मुख्यमंत्रीपदासाठी तुमचा विचार केला जाईल असे सांगितले.


राणेंनी सोनिया गांधी यांना सर्व हकीगत सांगितली. एकूण आमदारांपैकी अशोक चव्हाण यांन ३६, तर आपल्याला ३८ मते मिळाली आहेत. तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. शेवटी तुमचा पक्ष आहे तुमचा निर्णय आहे.. पण जे व्हायचं होतं ते झालंच.. राणेंचं मुख्यमंत्रीपद कायमंच गेलं होतं. (Vilasrao Deshmukh vs Narayan Rane)


२०१० साली अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला आणि राणे यांच्या मनात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची आशा जागी झाली. पण आता काँग्रेसने राज्यातील नव्हे तर, थेट दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना आणून मुख्यमंत्रीपदी बसवले. राणे यांची पुन्हा घोर निराशा झाली. राणे पुन्हा मुख्यमंत्री नाही झाले. त्यांच्या नावापुढे ‘माजी मुख्यमंत्री’ हे विशेषण कायमचे चिकटले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.