Home » ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिका हा देश जगभरात सर्वाधिक चर्चेत असलेला देश आहे. अमेरिकेतील निवडणुका, डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासीक विजय आणि ट्रम्प यांनी केलेल्या घोषणा यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. यात अजून एका विषयानं भर टाकली आहे. हा विषय म्हणजे, अमेरिकेच्या आकाशात दिसत असलेली गुढ ड्रोन किंवा युएफओ. अमेरिकेच्या आकाशात नोव्हेंबर महिन्यापासून ड्रोन सदृष्य वस्तू उडतांना दिसत आहेत. आधीच अमेरिकेत युएफओ म्हणजेच परग्रहींची विमानांची क्रेझ आहे. दर महिन्याला येथे युएफओ बघितल्याचे दावे करण्यात येतात. आता याच दाव्यांमध्ये नोव्हेंबर पासून भर पडली आहेत. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये आकाशात एकाचवेळी अनेक गुढ दिवे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दिवे ड्रोनचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा अद्यापही हे दिवे कुठले होते, याचा शोध लावण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर टिका करण्यात येत आहे. (America)

अमेरिकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक स्वभावानुसार असे ड्रोन जिथे दिसतील तिथून त्यांना खाली पाडावे असे आदेशच दिले आहेत. मात्र या सर्व गोंधळानंतरही न्यू जर्सी येथील एकाच वेळी दिसलेले दिवे कसले होते, अचानक असे दिवे आकाशात एकाचवेळी कसे लागले आणि हे दिवे अचानक जसे आले तसेच नंतर गायब कसे झाले हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आकाशात रहस्यमय ड्रोन दिसत आहेत. हे ड्रोन कुठून आले आहेत, याचा तपास अमेरिकेतील गुप्तचर संस्था करीत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश न आल्यामुळे याबाबत गुढ अधिक वाढले आहे. अमेरिकेत गूढपणे उडणाऱ्या वस्तू वारंवार दिसल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी आकाशात एकाचवेळी दिसणारे हे दिवे कसले आहे हे शोधण्यासाठी स्वतंत्र ड्रोन लाँच केले. मात्र त्यातूनही अपेक्षित असे कारण सापडले नाही. त्यामुळे आकाशात दिसणारे हे दिवे नक्की कुठले होते याबाबत आता अमेरिकेत अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. आकाशात दिसणारे हे दिवे ड्रोनचे नसून उडत्या तबकड्यांचे असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (International News)

अमेरिकेत जवळपास महिनाभर असा वस्तू दिसत असल्यामुळे अधिक गुढ वाढले आहे. या गुढ वस्तू म्हणजे ड्रोन असल्याचे सांगून पोलीसांनी त्यांचा माग काढण्यासाठी न्यू जर्सी पोलीसांनी त्यांच्याकडील ड्रोन या ड्रोनच्या मागावर पाठवले होते. मात्र पोलीसांच्या ड्रोनला याचा कुठलाही मागोवा घेता आलेला नाही. या सर्व प्रकरणाची सुरुवात नोव्हेंबर पासून झाली. एका स्थानिक अधिका-यानं समुद्रातून न्यू जर्सीकडे 50 ड्रोन येतांना पाहिले. यासंदर्भात या अधिका-यानं राज्य पोलीस, एफबीआय आणि यूएस कोस्ट गार्डला अलर्ट पाठवला. यानंतर कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका जहाजावर 13 ड्रोन घिरट्या घालत असल्याची नोंद करत आपल्या सुरक्षतेची मागणी केली. त्यानंतर अन्यही काही जहाजांनी आपल्यावर ड्रोन सदृश्य वस्तू दिसत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. या घटनेनंतर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या. या सर्व ड्रोनमधून उष्णतेच्या उत्सर्जनाचे कोणतेही संकेत मिळत नसल्यामुळे त्यांचा थर्मल इमेजिंगद्वारे मागोवा घेणे अशक्य झाले. या घटनेनंतर न्यू जर्सीमध्ये अनेक वेळा अज्ञात उडणाऱ्या वस्तू दिसल्या आहेत. (America)

========

हे देखील वाचा : चला, सामान भरा !

======

सामान्य नागरिकांनाही या वस्तू पाहिल्या असून आता त्याबाबत घबराट निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अज्ञात वस्तू आकाशात उडतांना दिसत असूनही सुरक्षा यंत्रणा त्याचा माग काढू न शकल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्व ड्रोन असल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन कुठून आले, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच हे ड्रोन सदृश्य युएफओ असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेच्या आकाशात युएफओ दिसत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येतात. हा त्यापैकीच एक प्रकार असल्याची चर्चाही सुरु आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या गुढ ड्रोन बाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रम्प यांनी न्यू जर्सी आणि इतर ठिकाणी पाहिलेले रहस्यमय ड्रोन पाडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र एवढ्या सर्व गोंधळानंतरही या आकाशात दिसणा-या गुढ वस्तू कुठल्या आहेत, हे सांगण्यात प्रगत अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.