पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले आहे. १९४८ पासून बलुचिस्तानवर पाकिस्तान सरकार आणि लष्करानं मोठ्या प्रमाणात अत्याचार केला आहे. त्याविरोधात आता तेथील जनता ठामपणे उभी राहिली आहे. यात एका महिलेचे नाव अग्रभागी आहे. या आहेत डॉ. मेहरंग बलोच. मेहरंग बलोच या बलुच शेरनी म्हणून ओळखल्या जातात. बलुचिस्तानमध्ये जे आंदोलन सुरु आहे, त्याचे नेतृत्व मेहरंग करीत आहेत. आंदोलनात उतरण्यापूर्वी मेहरंग यांनी आपले वडिल आणि भाऊ यांचा वेदनामयी मृत्यू पाहिला आहे. आता त्यांना आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलनात उडी घेतली आहे. (Dr. Mahrang Baloch)
पाकिस्तान सरकारच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये लढा सुरु झाला आहे. पाकिस्तानचे लष्कर, निमलष्करी दल आणि गुप्तचर दलांनी बलुच लोकांवर केलेल्या अत्याचाराविरोधात आता मोठे आंदोलन सुरु आहे. यात मेहरंग बलोच यांनी सुरु केलेल्या अहिंसक आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. मेहरंग बलोच या व्यवसायाने डॉक्टर आहेत. जानेवारीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली बलुचिस्तान ते इस्लामाबाद अशी १६०० किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये मेहरंग यांची लोकप्रियता वाढली आहे. मेहरंग बलोच यांची आंदोलने ही शांततेची असतात. त्या म्हणतात, आम्ही कोणत्याही व्यक्तीवर होणाऱ्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. बलुचिस्तानातून ७५ वर्षापासून बेपत्ता होणा-या नागरिकांसाठी त्या पाकिस्तान सरकारला जाब विचारत आहेत. मेहरांग बलोच यांचे वडील मजूर होते. (Dr. Mahrang Baloch)
त्या १६ वर्षाच्या असताना २०११ मध्ये त्यांच्या वडिलांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांच्या भावाचेही असेच अपहरण करण्यात आले. भावाचा मृतदेह रस्त्याच्या बाजुला मिळाल्यावर त्यांनी पाकिस्तान लष्कराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर असलेल्या मेहरंग यांच्या सभा आणि रॅलींना लाखो लोक उपस्थित असतात. विशेषत: तरुण आणि महिलांमध्ये त्यांची क्रेझ आहे. बलुच शेरनी या नावानं त्यांना संबोधण्यात येते. बलुचिस्तानमधील महिलांना अत्याचाराविरोधात एकत्र करुन रस्त्यावर उतरण्यास प्रोत्साहित करण्याचे काम मेहरंग यांनी केले आहे. मेहरंग म्हणतात, या चळवळीत हजारो महिला सामील झाल्या आहेत, तरुण किशोरवयीन मुलींपासून ते त्यांच्या आई आणि काकूंपर्यंत त्यांच्या आजी आणि पणजींपर्यंत महिला एकत्र झाल्या आहेत. या एकीतून नक्कीच चांगले होणार आहे. पाकिस्तान सरकारवर मात्र त्यांचा बराच दबाव आहे. बलुचिस्तानमधील ग्वादर शहरात बलुच लोकांच्या छळाबद्दल बोलण्यासाठी मेहरांगने गेल्या महिन्यात एक बैठक बोलावली. (Dr. Mahrang Baloch)
तेव्हा सुरक्षा दलांनी या सभेत गोंधळ घातला. सुरक्षा रक्षक सभेस्थानी आधीच जमा झाले आणि त्यांनी सभेला येणा-यांना परत जाण्याची सक्ती केली. शिवाय इंटरनेटही बंद करण्यात आले. असे असतानाही मेहरंग यांना पाठिंबा देणा-या हजारो महिला एका शेतात जमा झाल्या आणि तिथे मेहरंग यांची सभा झाली. बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानी लष्कराची छळछावणी म्हणण्यात येते. २००३ पासून ५०००० बलुची नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यातील २५००० नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. उर्वरित नागरिक हे बेपत्ता आहेत. यातील अनेक नागरिक हे पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. पाकिस्तानी सरकार बलुची नागरिकांवर मोठ्याप्रमाणात अत्याचार करत असून यावर जागतिक मानवाधिकार संघटनाही कोणतीही प्रतिक्रीया देत नसल्याची खंत बलुची नागरिकांची आहे. त्यामुळे हा लढा आता आमचा असून आम्ही तो आमच्या पद्धतीनं लढणार असल्याचे बलुची नागरिकांचे म्हणणे आहे. (Dr. Mahrang Baloch)
==============
हे देखील वाचा : शेख हसीना बांगलादेशमध्ये असत्या, तर आज जिवंत नसत्या !
===============
या सर्वात बलुची नागरिकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांच्या आंदोलनाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. मेहरंग बलोच करीत आहेत. मेहरंग बलोच यांच्या नेतृत्वाखाली महिलांची एक फळीच बलुचिस्तानमध्ये निर्माण झाली आहे. महिलांवर पाकिस्तानी लष्कराकडून अत्याचार झाल्याच्या घटना येथे नित्य होतात. त्यांना विरोध करण्यासाठी या महिला एक झाल्या आहेत. त्यापाठोपाठ बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र सैनिकांची तुकडीही तयार झाली आहे. या सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांवर केलेल्या हल्ल्यात १२० सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्ताननं हा दावा फेटाळला असला तरी पाकिस्तान सरकार बलुचिस्तान प्रांतातील चळवळींबाबत सावध भूमिका घेत आहे. बलुचिस्तानमध्ये चीनचे प्रोजेक्ट चालू आहेत. यातील चीनी कामगारांना परत जा, असा इशाराही बलुची नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात बलुची नागरिकांचा स्वातंत्र्याचा लढा अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. (Dr. Mahrang Baloch)
सई बने