Home » या कारणासाठी वयाच्या ८० व्या वर्षीही डॉ भगवती ओझा यांना ‘यंग गर्ल’ म्हटलं जातं

या कारणासाठी वयाच्या ८० व्या वर्षीही डॉ भगवती ओझा यांना ‘यंग गर्ल’ म्हटलं जातं

by Team Gajawaja
0 comment
डॉ भगवती ओझा
Share

भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्याचं व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी असतं. या व्यक्ती स्टार नसतात किंवा सेलिब्रेटीही नसतात. या असतात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्ती. परंतु, त्यांच्या कर्तृत्वामुळे या व्यक्ती सामान्यातल्या असामान्य व्यक्ती बनतात. 

डॉ भगवती एम ओझा! वयाची ८० वर्ष ओलांडूनही भल्या भल्या सेलिब्रेटींनांही लाजवेल असा फिटनेस ‘मेंटेन’ करणाऱ्या डॉ भगवती ओझा यांचा उल्लेख प्रसारमाध्यमांमध्ये “A Young Girl” असा केला जातो. तर काही ठिकाणी ‘Dr. Sport’ या नावानेही त्या ओळखल्या जातात. 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ‘फिटनेस’ राखणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आपल्यापैकी अनेकांना वयाची सत्तरी ओलांडण्याचीही शाश्वती नसते तिथे वयाची ८० वर्ष उलटलेल्या डॉ. भगवती ओझा नवनवीन छंद आत्मसात करत आपला फिटनेस मेंटेन करत असतात. परंतु, त्यांना सामान्यातले असामान्य बनवणारे निव्वळ ‘फिटनेस’ हे एकमेव कारण नाही. त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. 

डॉ भगवती ओझा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. पण आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना जिद्दीने कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि तो आयुष्यभर अमलातही आणला. त्या काळात हा निर्णय घेणं किती धाडसाचं होतं याची कल्पना आपण सहज करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिमतीने मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली. 

कॉलेजमध्ये भगवती यांच्या वर्गात त्या सोडून कुठलीच मुलगी नव्हती. परंतु, या गोष्टीने त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी शिक्षण पूर्ण करून मेडिकलची डिग्री घेतली, डॉक्टर झाल्या आणि यशस्वी कारकीर्द घडवली. 

स्त्रीरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ भगवती ओझा यांनी वयाच्या ४० व्या वर्षी दार्जिलिंगला जाऊन गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. सामान्यतः चाळीशीच्या उंबरठ्यावर स्त्रिया निवृत्तीचा विचार करत असतात; परंतु, डॉ भगवती मात्र सतत स्वतःला व्यग्र ठेवण्याचा, दर तीन वर्षांनी एक नवीन छंद जोपासून त्यामध्ये यशस्वी व्हायचा विचार करत असतात.

====

हे देखील वाचा: कोण आहेत प्रोफेसर शांतिश्री धूलिपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit)? 

====

डॉ भगवती ओझा जलतरणपटू, धावपटू, सायकलस्वार, गिर्यारोहक आणि पायलट आहेत. इतकंच नाही तर, त्या बडोदा मॅरेथॉनच्या ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत. 

दार्जिलिंगला गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण करून पुढील उच्च प्रशिक्षणासाठी त्या उत्तरकाशीला गेल्या. त्यानंतर वयाच्या ५० व्या वर्षी गुजरात फ्लाइंग क्लबमध्ये सामील होऊन पायलटचा परवाना मिळवला. त्यांना जवळपास १५० तास उड्डाण केले. 

डॉ भगवती यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी गुजरातमधील स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. यामधून त्या राष्ट्रीय स्तरावर खेळल्या आहेत. तसंच त्यांनी भारतीय सैन्यासोबत कारगिल युद्धात मिशन सद्भावनामध्येही भाग घेतला होता. मदर टेरेसा यांच्यासोबत माचू धरण आपत्तीच्या पुनर्वसन कार्यासाठी देखील काम केले आहे – ज्यामध्ये त्यांनी स्वतःच घरही गमावले होते. 

====

हे देखील वाचा: ‘कदंब’ या पुस्तकाला दुर्गाबाई भागवत यांनी अर्पणपत्रिका का लिहिली?

====

दरवर्षी १ ऑक्टोबरला ‘जागतिक वृद्ध व्यक्ती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी कर्तबगार वृद्ध व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार पद्मश्री पुरस्काराइतकेच महत्वाचे आणि मानाचे पुरस्कार समजले जातात. २०१६ सालच्या वृद्ध व्यक्ती दिनानिमित्त क्रीडा आणि साहसी श्रेणीमध्ये देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार (National Award for Older Persons in Sports and Adventure category) डॉ भगवती यांना देण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना त्यावेळचे राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या गुजरातमधील त्या एकमेव महिला आहेत. डॉ भगवती यांना आजवे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जवळपास १०० पुरस्कार मिळाले आहेत.  

आजही त्यांचा दिनक्रम थक्क करणारा आहे. दररोज पहाटे ४ वाजता उठून ५ किलोमीटर रनिंग आणि १५ किलोमीटर सायकलिंग करतात. दिवसभराचे काम उरकून रात्री ८ वाजता झोपायची शिस्त त्या कधीही मोडत नाहीत. त्याही पुढची गोष्ट म्हणजे डॉ भगवती यांच्याकडे स्वतःची गाडी नाही त्या फक्त सायकलचाच वापर करतात. सायकलवरून सोलो ट्रीपही करतात. 

आयुष्य जगायची इच्छा असणाऱ्यांना कधीही वयाचं बंधन नसतं. वय हा फक्त एक आकडा आहे, ही गोष्ट डॉ भगवती सारख्या व्यक्ती वारंवार सिद्ध करून दाखवतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.