देवभूमी उत्तराखंडची जगप्रसिद्ध चारधाम यात्रा सुरू झाली असून या यात्रेसाठी पहिल्याच आठवड्यात लाखो भाविकांना ऑनलाईन नोंदणी केली आहे. सर्वात पवित्र अशा बाबा केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. पहाटे, बाबा केदारनाथ की जय या जयघोषात केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह आठ हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. सहा महिन्यानंतर भक्तांसाठी खुल्या झालेल्या केदारनाथ मंदिराला (Kedarnath Dham) सुमारे 35 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्यावर सुरक्षा दलाची धावपळ झाली. या भागात अद्यापही बर्फाची चादर आहे, शिवाय आणखीही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यातच भाविकांनी मोठ्या संख्येनं चारधाम यात्रेसाठी नावनोंदणी केल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. केदारनाथाचे दरवाजे उघडताना हजारो भाविकांनी बाबा केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी एकाचवेळी गर्दी केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यावर वेळीच सुरक्षा दलाने हालचाल केली आणि भाविकांना ठराविक संख्येनं मंदिरात प्रवेश द्यायला सुरुवात केली. या सर्वांचा आढावा घेतल्यावर आता बाबा केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी 30 एप्रिल पर्यंतच घेण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. हवामानाची बदलती स्थिती आणि भाविकांचा गर्दीचा ओघ या दोघांचा ताळमेळ ठेऊन पुढच्या तारखा जाहीर करण्यात येतील असे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे आज भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. अजूनही लाखो भाविक दर्शनासाठी नोंदणी करत आहेत. त्याचवेळी, खराब हवामानाचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता नोंदणी करून दर्शनासाठी पोहोचणाऱ्या प्रवाशांना मध्येच थांबवून सुरक्षित स्थळी पाठवले जात आहे. बाबा केदारनाथाचे मंदिर असलेल्या भागात हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत मोठ्याप्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. आता या भागात मोठ्याप्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना प्रथम सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेची नोंदणी थांबवण्यात आली आहे. फक्त 30 एप्रिलपर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या संपूर्ण परिसरात पुढचा सर्व आठवडा तुफान बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना भद्रकाली आणि व्यासी येथे थांबवण्यात आले आहे. केदारनाथ यात्रेसाठी (Kedarnath Dham) हजारो भाविक उत्तराखंडमध्ये पोहोचले असताना नवीन यात्रेकरुंनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
केदारनाथ यात्रामार्गातील लिंचोलीजवळ भैरव आणि कुबेर हिमनद्यांवरील ट्रेक मार्गाची स्थिती सातत्याच्या बर्फवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक झाली आहे. या भागात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात आहेत. आता या भागात ठराविक वेळेत फक्त काही व्यक्तींना यात्रेसाठी परवानगी देण्यात येत आहे. केदारनाथमधील रात्रीचे तापमान -4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरत आहे. या प्रतिकूल परिस्थितीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. आता पुढच्या यात्रेबाबात हवामानाच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. यंदाच्या केदारनाथ यात्रेला 6 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. तर 25 ते 29 एप्रिल दरम्यान 96,000 हून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी नोंदणी केली आहे.
=======
हे देखील वाचा : बेवारसी असलेला ‘हा’ एक हजार कोटींचा बंगला…
======
दरम्यान केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे पहाटे विधीपूर्वक पुजेनं उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी प्रार्थना केल्यानंतर दरवाजे उघडले गेले. शिवपुराणात भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे, जिथे शिव स्वतः प्रकट झाले होते. केदारनाथ धाम हे त्यापैकीच एक आहे. उत्तराखंडमधील हिमालय पर्वताच्या कुशीत असलेल्या केदारनाथ धामला सहा महिन्यांनी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2022 रोजी केदारनाथ धामचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले होते. आता हे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले असून पुढचे सहा महिने ही यात्रा सुरु असेल. मात्र यावेळी केदारनाथाच्या यात्रेवर बदलत्या हवामानाचे सावट आहे. त्यामुळे हवामान चांगले असल्यास दरवर्षीप्रमाणे यात्रा सहा महिने सुरु राहिल.
केदारनाथ धाम (Kedarnath Dham) हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच चार धाम आणि पंच केदार पैकी एक आहे. हिवाळ्यात मंदिराचे दरवाजे 6 महिने बंद असतात. त्यावेळी या मंदिराचा बराचसा भाग बर्फाखाली झाकला जातो. या कडाक्याच्या थंडीतही मंदिरात एक दिवा चालू असतो. हा दिवा सहा महिन्यानंतर बाबा केदारनाथाचे दरवाजे उघडल्यावरही तेवतांना दिसतो. हा चमत्कार बघण्यासाठी पहिल्या दिवशी भक्तींचा गर्दी होते. यावर्षीही भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजला असला तरी मोठ्या प्रमाणात होणारी बर्फवृष्टी ही भाविक आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
सई बने