Home » ट्रम्पची सेना

ट्रम्पची सेना

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump Leaders
Share

भारतात सरकारी कामकाजाला लालफितीमधील कारभार म्हटले जाते. आता बहुतांश सरकारी कार्यालयात ऑनलाईन कामकाज पद्धती आहे. तसेच सर्वत्र सीसीटिव्हीचे जाळे आहे. मात्र सरकारी कामकाजावरील लालफितीचा शिक्का पूर्णपणे पुसता आलेला नाही. बरं भारतातील सरकारी कामकाजाची पद्धत संथ आहे, पैसेखाऊ आहे, असं म्हटलं जात असेल तर भारत काही एकटा असा देश नाही. दस्तुरखुद्द अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. हे अन्य कोणाचे वक्तव्य नसून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ही माहिती दिली. अमेरिकेतील सरकारी कामकाज यंत्रणा पोखरली आहे. यातील 75 टक्के कर्मचारी हे नेमके कशासाठी नेमले आहेत, याची त्यांनाही माहिती नाही. हा सरकारी पैशाचा आणि अमेरिकन नागरिकांच्या करातील पैशाचा गैरवापर त्वरित थांबवण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर करताच अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी नुसतीच घोषणा करुन थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या शपथविधीपूर्वीच या नोकरशाहीवर लगाम लावण्यासाठी टेस्ला, स्पेसएक्स आणि ‘एक्स’चे सीईओ इलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमेरिकेतील नोकरशाही संपवण्यासाठी आणि फालतू खर्च कमी करण्यासाठी मस्क आणि रामास्वामी सूत्र हातात घेणार आहेत. 2026 पर्यंत अमेरिकेला नोकरशाही मुक्त करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. (Donald Trump Leaders)

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी आपली टिम तयार करायला सुरुवात केली आहे. यामध्ये ज्येष्ठ उद्योगपती इलॉन मस्क, उद्योजक विवेक रामास्वामी आणि न्यूज अँकर पीट हेग्था या नव्या नावांना संधी मिळाली आहे. इलॉन मस्क आणि रामास्वामी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’चे नेतृत्व करणार आहेत. ट्रम्प यांनी या दोघांच्या नावाची घोषणा करतांना अमेरिकन देशभक्त विवेक रामास्वामी यांच्यासमवेत इलॉन मस्क, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) चे नेतृत्व करतील. हे दोघे मिळून माझ्या प्रशासनाला सरकारी नोकरशाही दूर करण्याचा मार्ग मोकळा करतील, अतिरिक्त नियम कमी करतील, फालतू खर्च कमी करतील आणि फेडरल एजन्सींची पुनर्रचना करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवाय ‘सेव्ह अमेरिका मूव्हमेंट’ साठी या दोघांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी खर्चात कमालीची कपात करण्यात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी सूचित केले. अमेरिकेत सरकारी कच-याची सफाई करण्याची वेळ आली आहे, वार्षिक US$6.5 ट्रिलियन सरकारी खर्चात फसवणूकच अधिक होते. सामान्य अमेरिकन नागरिकांना मात्र सुविधांच्या नावावर काहीच मिळत नाही. ही परिस्थिती मस्क आणि स्वामी बदलणार आहेत, असे ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या भाषणशैलीत सांगितले आणि अमेरिकेतील सर्वच सरकारी यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण यातून 75 टक्के सरकारी कर्मचा-यांना काढण्यात येईल आणि त्यांनी केलेले घोटाळेही उघडकीस आणण्यात येतील अशी तंबीही ट्रम्प यांनी दिली आहे. (International News)

सोबत हे काम 4 जुलै 2026 पूर्वी पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी अमेरिकन जनतेला दिली आहे. भ्रष्ट नोकरशाहीला कमी करुन स्वातंत्र्याच्या घोषणेच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त अमेरिकेला उत्तम भेट देणार असल्याची घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प सध्या आपल्या टिमची नियुक्ती करत आहेत. यात त्यांनी अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. इलॉन मस्क, विवेक रामास्वामी यांच्यानंतर सर्वाधिक चर्चेचं नाव ठरलं आहे ते न्यूज अँकर पीट हेग्था यांचे. फॉक्स न्यूजचे अँकर पीट हेग्था यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. लष्कराचे अभ्यासक म्हणून हेग्था यांची ख्याती आहे. त्यांना संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. त्याचवेळी स्टीव्हन विटकॉफ यांची मध्यपूर्वेतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना इराक आणि अफगाणिस्तान युद्धांचाही अनुभव आहे. पीट हेगसेथ हे ट्रम्प यांचे समर्थकही आहेत. दक्षिण डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांची नवीन होमलँड सुरक्षा सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. (Donald Trump Leaders)

======

हे देखील वाचा : ट्रम्प यांची महिला आघाडी

====

क्रिस्टी नोएम 2018 मध्ये दक्षिण डकोटाच्या पहिल्या महिला गव्हर्नर बनल्या. 2018 च्या निवडणुकीत त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाला होता. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीमध्ये, नोएम या टॉम होमन यांच्यासोबत काम करतील. टॉम होमन यांचीही नुकतीच अमेरिकेच्या बॉर्डर झार म्हणून निवड झाली आहे. देशाची सीमा सुरक्षा धोरणे आणि इमिग्रेशनशी संबंधित प्रकरणांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते. याशिवाय ट्रम्प यांनी नॅशनल इंटेलिजन्सचे माजी संचालक जोहान रॅटक्लिफ यांची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) चे संचालक म्हणून नियुक्ती केली. तसेच विल्यम जोसेफ मॅकगिनली यांची व्हाईट हाऊसचे वकील म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) ची पुनर्रचना करण्याची जबाबदारी ट्रम्प यांचे कट्टर समर्थक ली गेल्डिन यांच्याकडे आली आहे. या एजन्सीचे कठोर नियम संपुष्टात आणण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. एकूण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सर्व नियुक्तीवरुन अमेरिकेत लवकरच मोठी नोकरकपात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.