Home » Donald Trump : ट्रम्प यांचे दुटप्पी धोरण पुन्हा उघड !

Donald Trump : ट्रम्प यांचे दुटप्पी धोरण पुन्हा उघड !

by Team Gajawaja
0 comment
donald trump
Share

आम्ही धोकादायक लोकांपासून आमच्या देशाचे रक्षण करत आहोत, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली आहे. तसेच अन्य 7 देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी एकदिवसापूर्वी घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला. ट्रम्प फक्त मुस्लिम देशातील नागरिकांना लक्ष करीत असल्याचा आरोप केला. या आरोपाच्या फैरी होत असतांनाच डोनाल्ड ट्रम्प यांनी नेपाळ देशाचा तात्पुरता संरक्षित दर्जा रद्द केला. त्यामुळे 7500 नेपाळी नागरिकांना त्वरित अमेरिका सोडावी लागणार आहे. (Donald Trump)

या सर्व देशांपासून अमेरिकेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. मात्र या सर्वांसोबत ज्या देशामध्ये अमेरिकेवर हल्ला करणारे दहशतवादी लपून राहिले, त्या पाकिस्तानचा समावेश का करण्यात आला नाही, हा प्रश्नही आता अमेरिकेन जनता ट्रम्प यांना विचारत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या किंवा इमिग्रेशन कायद्यांचा गैरवापर करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून अमेरिकेचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प प्रशासन सांगत असले तरी, अमेरिकेमधील गुन्हेगारी घटनांमध्ये पाकिस्तानमधून आलेल्या नागरिकांची मोठी संख्या आहे. असे असतांना पाकिस्तानवर अमेरिकेनं बंधनं का घातली नाहीत, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (International News)

सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने 12 देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली आहे. यासोबत 7 देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी घातली आहे. अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, विषुववृत्तीय गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या 12 देशातील नागरिकांवर आता अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्ण बंदी आहे. तर बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या 7 देशातील नागरिकांवर आंशिक बंदी आहे. यासोबत नेपाळच्या नागरिकांवरही अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण बंदी म्हणजे या देशांतील बहुतेक नागरिकांचे पर्यटक, विद्यार्थी, काम आणि स्थलांतरित म्हणून येणारे व्हिसा नाकारले जाणार आहेत. तर आंशिक बंदीमध्ये पर्यटक व्हिसा, खेळासाठी व्हिसा, पर्यटन व्हिसा यांचा समावेश असणार आहे. तर नेपाळी नागरिकांच तात्पुरता सुरक्षित दर्जा रद्द करण्यात आला आहे. यातून देशात गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या परदेशी नागरिकांना तात्पुरते संरक्षण मिळत असे. (Donald Trump)

मात्र हा दर्जाच रद्द केल्यामुळे नेपाळी नागरिकांना 9 जून पर्यंत अमेरिका सोडावी लागणार आहे. ट्रम्प यांनी हा प्रयोग आपल्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळतही केला होता. 2017 मध्ये त्यांनी 7 मुस्लिम बहुल देशांवर अशीच बंदी घातली होती. त्यात इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशांचा समावेश होता. 2017 मध्ये ही बंदी जाहीर झाल्यावर जगभरातील विमानतळांवर हजारो पर्यटक, प्रवासी, व्यावसायिक पाहुणे आणि निवास परवानाधारक नागरिक अडकून राहिले. सर्व देशांमधील प्रमुख विमानतळांवर त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अमेरिकेतील विमानतळावर असलेल्या या 7 देशातील नागरिकांना तिथूनच परत पाठवण्यात आले. हा सर्व गोंधळ आठवडाभर सुरु होता. त्यानंतर या बंदीवर न्यायालयात लढा लढला गेला. मग या सात देशामधील इराकवरील बंदी प्रथम रद्द करण्यात आली. नंतर सुदामला वगळण्यात आले. त्यानंतर जो बायडेन 2021 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी ही प्रवास बंदी रद्द केली. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर आहे का ?

Tamil Nadu : मानसिक तणाव आहे, मग या मंदिरात नक्की जा !

==============

आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाची सुरक्षितता प्रथम करणे आमचे कर्तव्य असल्याचे कारण सांगून ट्रम्प यांनी तब्बल 20 देशांवर बंदी घातली आहे. मात्र अफगाणिस्तान, सुदान सारख्या देशांवर बंदी घालणारे ट्रम्प, पाकिस्तानला का विसरले, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. याच पाकिस्तानमध्ये 9-11 हल्ल्याचा आरोप ओसामा बिन लादेन लपून राहिला होता. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दोन दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या आश्रयानं वाढल्या आहेत. याशिवाय हरकत-उल-मुजाहिदीन, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आहेत. असे असतांनाही डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर बंदी आणली नाही, हे त्यांचे दुटप्पी पाऊल असल्याची टिका होत आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.