अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अनेक देशातील शेअर मार्केट खाली पडले असून अब्जो रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना झाल्याची माहिती आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प आता औषधांच्यावरही टॅरिफ लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात जगभरात आर्थिक क्षेत्रात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. हे सर्व वातावरण जगभरात असतांना अमेरिकेत कसं वातावरण आहे हे जाणणेही महत्त्वाचे आहे. जगभरातील देशांना टॅरिफ धोरणावरुन धारेवर धरणा-या ट्रम्प यांच्या देशातील जनताही सध्या धास्तावलेली आहे. अमेरिकेत येणा-या सामानावर कर लावला तर त्या वस्तूंच्या किंमती आभाळाला भिडतील अशी भीती येथील जनतेमध्ये आहे. त्यामुळेच अमेरिकेतील अगदी साधे दुकान ते मोठे मॉल पर्यंत गर्दीच गर्दी दिसत आहे. (Donald Trump)
मीठापासून ते फ्रिज, लॅपटॉपपर्यंच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे मारामारी होत आहे. अमेरिकेत पुढच्या काही दिवसात या सर्व वस्तूंच्या किंमती आवाक्याच्या बाहेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवत आहेत. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात आर्थिक क्षेत्रात भूकंप आला असला तरी, अमेरिकेतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील 60 देशांवर लादलेल्या परस्पर टॅरिफचा परिणाम आता त्यांच्याच देशात मोठ्या प्रमाणात झाला आहे. अमेरिकेतील नागरिक जे दिसेल त्या दुकानातून खरेदी करतांना दिसत आहेत. एरवी अमेरिकेत शनिवार-रविवार हे दोन दिवस सुट्टीचे असतात. मात्र आता या दोन दिवसात समस्त अमेरिकाच सूपर मार्केटमध्ये खरेदी करायला आल्यासारखे दृश्य दिसत आहे. त्यात अगदी रोजच्या जेवणात लागणारे मीठ, साखर, तेल, बटर अशा वस्तूही जास्त प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. (International News)
फर्निचरपासून ते विद्युत उपकरणापर्यंत ही खरेदी सुरु आहे. भविष्यात अमेरिकेत महागाईचा भडका उडणार असल्याचे भाकीत येथील अर्थतज्ञांनी व्यक्त केल्यामुळे जनतेमध्ये अधिक काळजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दैंनदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करुन त्याचा साठा करण्यावर या मंडळींनी भर दिला आहे. फारकाय ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळेच मार्चमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी तेजी आल्याचे स्पष्ट झाले. परदेशी वाहने आणि ऑटो पार्ट्सवर 25 टक्के कर लावण्याची घोषणा झाली आणि अमेरिकेत कारच्या विक्रीत 11.3 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय गाडीचे सुट्टे भाग खरेदी करण्यामध्येही विक्रम झाला आहे. कारचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स, बागकामाचे साहित्य, हायसेन्स टेलिव्हिजन, मॅकबुक लॅपटॉप अशा वस्तूही येथील नागरिक खरेदी करुन ठेवत आहेत. ट्रम्प प्रशासनाने तैवानमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 32% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर, अशा वस्तूंची खरेदी वाढली आहे. (Donald Trump)
तैवानमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात. कर लावल्यावर या वस्तूंची किंमत अधिक होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिना सुरु झाल्यावर नागरिकांना या सर्वच वस्तूंचा अतिरिक्त साठा करायला सुरुवात केली आहे. यात कपडे आणि शूजची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिकेतील मॉलमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. अमेरिकेत चीन, फ्रान्स, भारत, तैवान सारख्या देशांमधून येणा-या कपड्यांची मोठी खरेदी होते. आता या कपड्यांवर कर लावण्यात आल्यामुळे त्यांच्या किंमती वाढण्याची भीती असल्यामुळे कपड्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सर्वात मोठी खरेदी आवश्यक अशा वस्तूंची होत आहे. त्यात मीठाचा समावेश आहे. शिवाय रेफ्रिजरेटर, डिशवॉशर, ब्लेंडर आणि टोस्टर सारखी स्वयंपाकघरातील उपकरणे खरेदी होत आहेत. (International News)
=============
हे देखील वाचा : Pamban Bridge : अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरणारा पांबन पूल !
China : भूकंपाच्या छायेत चीन !
==============
यासह लहान मुलांचे आणि वयोवृद्धांसाठी वापरण्यात येणा-या डायपरनाही मोठी मागणी आली आहे. काही सूपर मार्केटमध्ये तर डायपर एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी कऱण्यात आले की, एका व्यक्तिमागे ठराविकच डायपर पॅक खरेदी करता येतील असे बंधन घालण्यात आले आहे. लहान मुलांची खेळणीही विकत घेण्यात येत आहेत. शिवाय लहान मुलांसाठी आवश्यक अशा खाद्यपदार्थांचाही साठा करुन ठेवण्यात येत आहे. यासह भारतातून येणारे मसाले, कॉफी, चहा, तांदूळ यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्वांमुळे अमेरिकेतील सूपर मार्केट दिवसरात्र सुरु आहेत. औषधांवरही आता डोनाल्ड ट्रम्प कर लावणार असल्याची माहिती आल्यामुळे आवश्यक औषधांचा साठा तेथील नागरिक करीत आहेत. एकूण ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अवघे जग जसे हादरले आहे, त्यापेक्षा अधिक परिणाम अमेरिकेतील जनतेवर झाला आहे. (Donald Trump)
सई बने