Home » Donald Trump : महासत्ता मंदीच्या उंबरठ्यावर !

Donald Trump : महासत्ता मंदीच्या उंबरठ्यावर !

by Team Gajawaja
0 comment
donald trump
Share

जागतिक महासत्ता म्हणवून घेणा-या अमेरिकेमध्ये या वर्षाच्या अखेरीस मंदीची सुरुवात होणार असल्याचे भाकीत मान्यवर अर्थतज्ञांनी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या निर्णयाचा यात मोठा वाटा असला तरी अमेरिकेची युद्ध निती याला बहुतांशी कारणीभूत असल्याचा ठपका या विश्लेषकांनी ठेवला आहे. जेपी मॉर्गन, फॉर्च्यून आणि अन्य आर्थिक धोरणांच्या अभ्यासकांसह काही मान्यवर आर्थिक संस्थांनीही हा इशारा दिला आहे. वाढती शुल्के, उच्च महागाई, ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होणे आणि उत्पादनात घट होणे यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे जगावर आपलेच राज्य आहे, अशा थाटात वावरणा-या अमेरिकेचे वास्तव जगासमोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या टेरिफ कार्डामुळे जगातील सर्वच देशांना धाकात ठेऊ पहात आहेत. अमेरिकेशिवाय कुठल्याही देशाला प्रगती करता येणार नाही, अशा वल्गना ट्रम्प करत आहेत. तसेच अमेरिकेच्या मनाप्रमाणे व्यापारातील अटी मान्य न करणा-या देशांना ते वाटेल तसा वाढीव कर लावत आहेत.

मात्र याच ट्रम्पना आता हादरवून सोडेल, असा अहवाल अमेरिकेतील मान्यवर अर्थतज्ञांनी सादर केला आहे. या अहवालानुसार जागतिक महासत्ता असलेली अमेरिका ही मंदीच्या उंबरठ्यावर आहे. 2025 डिसेंबर पर्यंत अमेरिकेत सर्वदूर आर्थिक मंदीचे संकट येणार आहे, त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरचे मूल्यही कमी होण्याचा धोका आहे. अमेरिकेतील मान्यवर अर्थतज्ञांनी हा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजनेही हा दावा खरा असल्याचे सांगितले आहे. या सर्वांना हा मंदीचा इशारा देतांना डोनाल्ड ट्रम्पच्या शुल्कांचा अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रावर परिणाम झाल्याचे नमूद केले आहे. शिवाय अमेरिकेची अर्थव्यवस्था सतत घसरत असून ही मंदीची सुरुवात असल्याचे सांगितले आहे.

या सर्वात डोनाल्ड ट्रम्प यांची ‘अमेरिकन फर्स्ट’ ही घोषणाच अमेरिकेच्या आर्थिक पतनास कारणीभूत ठऱणार असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक दाव्यांवर अनेक प्रश्न विचारले आहेत. ट्रम्प प्रशासन जीडीपी वाढ, परकीय गुंतवणुकीत वाढ आणि महागाईवर नियंत्रण यातून अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे, असे म्हणत असले तरी, वास्तवात उलट परिस्थिती आहे. अमेरिकेत महागाई वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसू लागला आहे. कारखान्यात काम करण्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ अन्य देशांमधून येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे अनेक उद्योगसमुहाला टाळे लागत आहे. परिणामी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. याशिवाय अमेरिकन ग्राहकांचा विश्वास कमी होत असून त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. वाढत्या व्याजदर आणि महागाईमुळे नागरिक खरेदी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बाजारातील मालाला उठाव नाही. यातून आर्थिक क्रियाकलाप मंदावत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

U

या सर्वात अर्थतज्ञांनी वाढत्या बेरोजगारीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातही अमेरिकेचा जीडीपी विकास दर कमी आहे त्यातूनही आर्थिक मंदीचे संकेत मिळत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. या सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे की, अमेरिकेचे कर्ज दररोज 21 अब्ज डॉलर्सने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, 48 दिवसांत त्यांचे कर्ज सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्सने म्हणजेच 86 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढले आहे. गेल्या 2 वर्षात अमेरिकेचे कर्ज 37.2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे. यासोबत अमेरिकेवरील कर्जच वाढत नाही तर वित्तीय तूटही वाढत आहे. सध्या अमेरिकेची वित्तीय तूट 1.63 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 140 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

=======

Donald Trump : या भारतीयापुढे ट्रम्प नितीची हार !

=======

या सर्वांसोबत ट्रम्प प्रशासनात वाढलेल्या खर्चाचाही बोजा मोठा आहे. गेल्या महिन्यात जुलैमध्ये अमेरिकन सरकारचा खर्च 9.7 टक्क्यांनी वाढून 630 अब्ज डॉलर्स झाला आहे. तर सरकारचा महसूल फक्त 2.5 टक्क्यांनी वाढला म्हणजेच 338 अब्ज डॉलर्स आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून अमेरिकन लोकांमध्ये त्यांच्या उत्पन्नाबद्दल, व्यवसायाच्या परिस्थितीबद्दल आणि नोकरी बद्दल अस्थिरतेची भावना आहे. या सर्वांतून अमेरिकेत मंदी येत असल्याचे अर्थतज्ञ सांगत आहेत. हा सर्व अहवाल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही देण्यात आला तरी ट्रम्प याबाबत किती गंभीरपणे पावले उचलतात, याकडेही अर्थतज्ञांचे लक्ष आहे.

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.