अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांना धमकी दिली आहे. सोरोस यांच्या कारवाया संशयास्पद असल्याचे सांगून ट्रम्प यांनी अमेरिकेत होणाऱ्या निदर्शनांना सोरोस निधी पुरवतात असा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवाय सोरोस यांच्यावर ‘रिको’ म्हणजेच ‘रैकेटीर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स’ कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही ट्रम्पंनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प आपल्या मंत्रीमंडळातील सहका-यांसोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्याविरोधात घोषणा देत, फ्री पॅलेस्टाईनचा नारा लावला. या घटनेची ट्रम्प यांनी गंभीर दखल घेतली. याबाबत तपास झाल्यावर ट्रम्पविरोधात घोषणा देणारे जॉर्ज सोरोस यांच्या एनजीओचे कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी आता सोरोस यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थात ट्रम्प यांच्या या धमकीनंतर सोरोसच्या एनजीओ ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. (George Soros)
अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे नाव कायम भारतामधील दंगलीसंदर्भातून घेतले जाते. भारतात केंद्र सरकारविरोधात जी आंदोलने होतात, त्याला जॉर्ज सोरोस यांच्याकडून निधी दिला जात असल्याचा आरोप आहे. भारतासह जगभरातील अन्य देशातीलही सरकार विरोधात जी आंदोलने होतात, त्यात जॉर्ज सोरोस यांचेच नाव येते. देशविरोधी आंदोलनाला बक्कळ पैसा देऊन आपला स्वार्थ सोरोस साधत असतात. मात्र आता हेच जॉर्ज सोरोस महाशय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज सोरोस यांच्यावर निदर्शनांना आणि देशात दंगली भडकवण्यासाठी निधी दिल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये सोरोस हे देशाचे वातावरण बिघडवत असून त्यांच्यामुळे देशातील शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे रिको कायद्यांतर्गत सोरोस आणि त्यांच्या एनजीओची चौकशी करण्याचे संकेत ट्रम्पंनी दिले आहेत. फक्त सोरोस यांच्या एनजीओची नाही तर संपूर्ण सोरोस कुटुंबाची आणि त्यांच्या संपत्तीचीही चौकशी कऱण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (International News)
ट्रम्प यांनी ज्या रिको कायद्यातून सोरोस यांची चौकशी करण्याचे सांगितले आहे, तो रिको म्हणजे ‘रैकेटीर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स’ हा कायदा आहे. ट्रम्पंनी हा आरोप करताच सोरोसच्या एनजीओ ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ने हे आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातही सोशल मिडियाच्या माध्यमातूनही सोरोस यांच्या एनजीओवर आरोप केले होते. त्यांनी जॉर्ज सोरोस आणि त्यांचा मुलगा अलेक्झांडर सोरोस याला, सरकार तुमच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. सोबतच सोरोस वडील-मुलाच्या जोडीला ‘मनोरुग्णांचा गट‘ असेही ट्रम्प यांनी नाव दिले आहे. जॉर्ज सोरोस यांच्या एनजीओचा सगळा कारभार त्यांचा मुलगा अलेक्झांडर सोरोस हा बघत आहे. अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या पाच मुलांपैकी एक असलेला अलेक्झांडर ओपन सोसायटी फाउंडेशनच्या संचालक मंडळाचा अध्यक्ष आहे. (George Soros)
ट्रम्प यांचा या सोरोस कुटुंबावरचा राग गेल्या काही दिवसात अधिक वाढला, त्याला कारण ठरला तो त्यांचा हॉटेल दौरा. काही दिवसापूर्वी ट्रम्प वॉशिंग्टन डीसीमधील एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या सहका-यांसोबत गेले होते. तिथे त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा, अशा आशयाच्या घोषणाही होत्या. हा व्हिडिओ जगभरातील सोशल मिडियावर व्हायरल झाला. याप्रसंगी हतबल असलेले ट्रम्प आणि त्यांचे साथीदार दिसत होते. शिवाय त्यांच्या सुरक्षा रक्षकांनाही या लोकांना अडवता आले नाही. मात्र या प्रकरणाची नंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यात सोरोस यांचा हात असल्याचा संशय आहे. (International News)
============
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता मंदीच्या उंबरठ्यावर !
==============
ट्रम्पचा दावा आहे की, डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार सोरोस यांनी यासर्वासाठी निधी पुरवला होता. जॉर्ज सोरोस हे 2020 पासून डेमोक्रॅट्स पक्षाचे देणगीदार आहेत. त्यांनी लाखो डॉलर्स देणगी या पक्षाला दिली आहे. त्याबदल्यात त्यांना ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी हे आरोप केल्यावर सोरोसची एनजीओ, ओपन सोसायटी फाउंडेशनने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी ज्या कायद्याद्वारे चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत, त्या रिको कायद्यांतर्गत आरोप सहसा बेकायदेशीर सट्टेबाजी आणि कर्ज वसूल करण्यासारख्या संघटीत गुन्हेगारी कारवायांसाठी लावले जातात. जर सोरोस यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर तुरुंगवासाची शिक्षा किंवा मोठा दंड होण्याची शक्यता आहे. (George Soros)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics