Home » डॉल्फिनने देखील घेतला रशियाच्या ‘आर्मी’मध्ये सहभाग

डॉल्फिनने देखील घेतला रशियाच्या ‘आर्मी’मध्ये सहभाग

by Team Gajawaja
0 comment
Dolphin Army of Russia
Share

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाने आता अधिक उग्र झाले आहे.त्यात रशिया आणि युक्रेनला जोडणा-या पुलावर बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट युक्रेननं केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात येत आहे. याआधी रशियन सैन्यान युक्रेनवर जोरदार बॉम्बहल्ले केले आहेत. सोमवारी रशियाकडून युक्रेनची राजधानी किवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला. या युद्धात रशियानं परमाणू हत्यारंही वापरण्याची धमकी दिली आहे. पण त्याआधी रशियानं डॉल्फिन माशांचाही वापर युद्धासाठी सुरु केला आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने त्यांची खास डॉल्फिन आर्मी (Dolphin Army of Russia) तैनात केली आहे.समुद्रात अतिशय वेगानं प्रवास करणा-या या डॉल्फिन माशांना शत्रूंच्या समुद्रातील हालचाली टिपण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या युद्धात रशिया आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. रशिया युक्रेनविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र झाले आहे. यावेळी रशियाने आणखी एक खास शस्त्र दाखल केले आहे. या युद्धात आता रशियाची डॉल्फिन आर्मी सहभागी झाली आहे. रशियन सैन्याने या डॉल्फिन माशांना प्रशिक्षण देऊन युद्धासाठी तयार केले आहे. रशियाने यासाठी एका खास रणनीती आखली आहे आणि त्या अंतर्गत डॉल्फिन आर्मीचा युद्धात समावेश झाला आहे. या डॉल्फिन माशांना रशियन सैन्याने प्रशिक्षण दिले आहे. हे डॉल्फिन काळ्या समुद्रातील नौदल तळांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात रहाणार आहेत. रशियाची ही आर्मी खूप गुप्त स्वरुपात काम करत होती मात्र या डॉल्फिन आर्मीबाबत (Dolphin Army of Russia) प्रथम अमेरिकेनं माहिती बाहेर काढली.अमेरिकेच्या यूएस नेव्हल इन्स्टिट्यूट ने अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रांमधून काही डॉल्फिन मासे काळ्या समुद्रात विशिष्ट पद्धतीनं फिरत असल्याचे स्पष्ट झाले होते. एप्रिल महिन्यात या डॉल्फिन माशांची माहिती बाहेर आली पण त्यांच्यावर कोणाचाच संशय आला नाही. पण त्यानंतर आणखी काही फोटो पुढे आल्यावर या डॉल्फिनची संख्या वाढल्याचे लक्षात आले. दरम्यान डॉल्फिनच्या दोन बटालियन रशियन सैन्यानं अधिक तैनात केल्या होत्या. त्यांच्या विशिष्ट हालचालींमुळे रशियाच्या या डॉल्फिन आर्मीचे गुपित उघड झाले आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची ही डॉल्फिन्स आर्मी (Dolphin Army of Russia) समुद्रात असलेल्या कोणत्याही शत्रूच्या जहाजाचे किंवा पाणबुडीचे ध्वनी सिग्नल ओळखू शकते. रशियन सैन्याने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे की, ज्याच्या मदतीने डॉल्फिनच्या हालचाली सिग्नलमध्ये रूपांतरित केल्या जातात आणि सैन्याला शत्रूच्या जहाज किंवा पाणबुडीच्या हालचालींची माहिती मिळते. लष्कराच्या माहितीनुसार हे डॉल्फिन रशियन नौदल तळाचे निरीक्षण करतात. कोणतेही जहाज, पाणबुडी किंवा युद्धनौका रशियात प्रवेश करत असेल तेव्हा विशिष्ट पद्धतीनं सिग्नल देतात. त्यावरुन रशियन सैन्याला समुद्रात होणा-या या हालचालींची माहिती मिळते. या डॉल्फिनच्या सोबत रशियाच्या आण्विक पाणबुड्या आणि युद्धनौकाही तैनात आहेत. त्यांच्या सोबतीनं ही डॉल्फिन आर्मी(Dolphin Army of Russia) काम करत आहे. या डॉल्फिनला पाण्याखालील शत्रूच्या लक्ष्य बिंदूंचा आवाज आणि त्यांची श्रेणी शोधण्यात पटाईत करण्यात आले आहे. यातून रशियानं आपल्या समुद्री सिमांची नाकेबंदी अतिशय चोखपणे केल्याचे लक्षात येते. 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका उपग्रह छायाचित्रातूनही रशियाने सीरियन युद्धादरम्यान टर्टस आणि सीरियातील नौदल तळावर डॉल्फिनचा वापर केल्याचे स्पष्ट झाले होते. शीतयुद्धाच्या काळातही अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने डॉल्फिनला प्रशिक्षण देण्यासाठी नवीन तंत्र विकसित केले होते.

===========

हे देखील वाचा : रामसेतूचे दगडं पाण्यावर कसे तरंगतात?

===========

मात्र या डॉल्फिनशिवाय रशियाने बेलुगा व्हेललाही प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षित व्हेल मासे 2019 मध्ये नॉर्वेमध्ये दिसले होते. हार्नेस घातलेली आणि कॅमेरा टांगलेली एक व्हेल बोटी ओढत असल्याचे काही मासेमारांच्या लक्षात आले होते. तेव्हाच रशियन सैन्य बेलुगा व्हेलला प्रशिक्षित करण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता हे व्हेल मासेही या युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन आर्मीकडून तैनात आहेत की नाही हे मात्र स्पष्ट झालेले नाही. डॉल्फिन माशाच्या 40 प्रजाती अस्तित्वात आहेत. आत्तापर्यंत अनेक सैन्याने खाणी शोधण्यापासून ते हरवलेल्या किंवा अडकलेल्या माणसांना वाचवण्यासाठी डॉल्फिनचा वापर केला आहे. व्हिएतनाम युद्धादरम्यान डॉल्फिनच्या लष्करी वापराची माहिती प्रथम बाहेर आली. यूएस नेव्ही मरीन मॅमल प्रोग्रामचा एक भाग म्हणून डॉल्फिनना प्रशिक्षित करण्याचे काम होते. रशियन सैन्याने यापुढे जात असे प्रशिक्षित डॉल्फिन इराणलाही विकले आहेत.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.