Home » सोशल मिडियावरचा एक फोटो आणि प्राणीप्रेमी

सोशल मिडियावरचा एक फोटो आणि प्राणीप्रेमी

by Team Gajawaja
0 comment
Dogs
Share

कुत्रा हा घरचा सदस्य आहे, त्याला घरीच हागवा असे बॅनर घेतलेल्या तीन आजींचा फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय. कोल्हापूरच्या प्रसिद्ध रंकाळा तलावाभोवती काढलेला हा फोटो आता सोशल मिडियावर वादाचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्रातल्या बहुधा सर्व सोशल मिडायाच्या ग्रुपवर हा तीन आजींचा फोटो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. त्यातून घरगुती कुत्रा आणि त्याची घराबाहेर होणारी स्वच्छता हा वादाचा मुद्दा समोर आला आहे. यातून अनेक मुद्दे प्रकाशतही आले आहेत. मुळात कुत्रा किंवा अन्य प्राणी घरात पाळण्यासाठी काही नियम आहेत की नाही, याचीही चर्चा झाली.

शिवाय कुठले प्राणी पाळावे वा पाळू नयेत याबाबतही अनेक नियम आहेत, त्याचीही माहिती घेण्यात आली. कुत्रा हा घरचा सदस्य आहे, त्याला घरीच हागवा असे बॅनर घेतलेल्या तीन आजींचा फोटो प्रसिद्ध झाला, आणि प्राणीप्रेमी आणि स्वच्छता प्रेमींमध्ये एक शीतयुद्ध सुरु झाले. पण घरात प्राणी पाळतांना काही नियम असतात, ते पाळणे गरजेचे असल्याचेही यासोबत स्पष्ट झाले. आपल्याकडे बहुतांशपणे हे नियम पाळले जात नाहीत. त्यातील एक नियम म्हणजे, घरातील पाळीव प्राण्यांची स्वच्छता ही घरीच व्हायला हवी. भारत सरकारने कुत्रा घरी पाळणा-यांसाठी एक नियमावली तयार केली आहे. ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने पाळीव कुत्र्यांसाठी हे नियम तयार केले आहेत. घरात कुत्रा पाळता येतो. (Dogs)

भारतीय राज्यघटनेच्या कलम A(G) नुसार प्रत्येक नागरिकाला प्राण्यांबद्दल सहानुभूती आणि प्रेम दाखवण्याचा अधिकार आहे. तसेच, अधिनियम १९६० ११(३) नुसार, गृहनिर्माण संस्थांना पाळीव प्राणी ठेवण्याचा अधिकार आहे. याशिवाय भाडेकरूही आपल्या घरात कुत्रा पाळू शकतो. मात्र याचवेळी ज्या कुटुंबात पाळीव प्राणी आहेत, त्यांनी हे देखील सुनिश्चित करावे लागेल की, त्यांच्या पाळीव प्राण्यांमुळे त्यांच्या गृहनिर्माण संस्था किंवा शेजारच्या इतरांना त्रास होणार नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचे पालन करुन यासंदर्भात अधिक सुस्पष्ट आदेश दिला आहे. त्यानुसार निरोगी आणि स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार प्राण्यांना आहे. प्राण्यांचे कल्याण आणि कल्याण केवळ विविध कायद्यांतर्गतच नव्हे तर भारताच्या राज्यघटनेतही वैधानिकरित्या मान्य केले गेले आहे. (Dogs)

मुंबई महानगरपालिकेनेही घरात कुत्रा किंवा मांजर पाळण्याबाबत आपली नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कुत्र्यांच्या मालकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर महिन्याला त्यांच्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. तसेच कुत्र्याच्या मालकाने कुत्र्यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय निवारा असलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कुत्रा मालकाने कुत्रा इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराने आजारी असल्यास त्याला लसीकरण करावे. जर पाळीव प्राणी हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याच्यावर पशुवैद्यकाने उपचार केले पाहिजे आणि त्याचा पुरावा पालिकेत सादर करणे गरजेचे आहे. कुत्र्याच्या मालकीचे अधिकार बदलण्यासाठी कुत्र्याच्या मालकाला नवीन परवाना द्यावा लागतो. तसेच या नूतनीकरणाच्या वेळी, सर्व आवश्यक कागदपत्रे गरजेची असतात. परवाना आणि महानगरपालिका प्रभाग, पत्ता, फोन नंबर, कुत्र्यांची माहिती, सर्व लसीकरणाचे रेकॉर्ड, कोणते प्रमाणपत्र आणि क्रमांक याची सर्व माहिती महानगरपालिकेच्या विभागकडे जमा करणे बंधनकारक असते. घरात कुत्रा पाळण्यासंबंधीच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते.

====================

हे देखील वाचा :  प्रलय आणणारा मासा !

====================

पुणे महानगरपालिकेचेही कुत्रा घरी पाळण्यासंदर्भात काही नियम आहेत. हे नियम न पाळणा-या कुत्रा मालकांवर कारवाईही करण्यात आली आहे. पुण्याच्या कोथरूडमधील रस्त्यांवर उघड्यावर शौच करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांकडून पालिकेनं दंडाची रक्कम वसूल केली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल कुत्र्यांच्या मालकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. श्वान मालकांवर लक्ष ठेवण्यासाठी उड्डाण पथके तयार करण्यात आली आहेत. जिथे पाळीव प्राणी मालक त्यांच्या कुत्र्यांना सकाळी आणि संध्याकाळी फिरायला घेऊन जातात तिथे ही भरारी पथके फिरत असतात. यासंदर्भात पालिकेनं फिरायला येणा-या नागरिकांनी या समस्येवर कारवाईसाठी मागणी केल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील काही बागांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शौचास नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर तिथे कुत्र्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. एकूणच या सर्व प्रकारात आता कोल्हापूरच्या आजींच्या पोस्टरनं धम्माल उडवून दिली आहे. (Dogs)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.