क्रायमिया (Crimea) हा तसा पूर्व युरोप मधला, काळ्या समुद्राच्या उत्तरेला असलेला एक द्वीपकल्प. याला लागून आहे अझोवचा समुद्र. आजचा क्रायमिया हा रशिया आणि यूक्रेन मध्ये विभागला गेला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी १९५४ ला तत्कालीन सोव्हिएत रशियाने यूक्रेनला हा प्रदेश ‘मैत्रीचं प्रतीक’ म्हणून हस्तांतरित केला.
क्रायमिया (Crimea) हा भाग नेहमीच रशिया आणि यूक्रेन यांच्यामधल्या वादाचा विषय राहिला आहे. इतिहासात, क्रायमिया कोणाचा यावरून तर युद्धसुद्धा लढली गेली आहेत. मध्ययुगापासून पुढे पाहिल्यास हा प्रदेश ऑटोमान तुर्काच्या साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर सतराव्या शतकापासून पुढे रशियन साम्राज्याचा या भागावर वरचष्मा राहीला.
तत्कालीन सोव्हिएत रशियाने तर १९५४ पर्यन्त क्रायमियावर राज्य केलं. क्रायमियाचं युद्ध आणि रशियातलं गृहयुद्ध यात तर क्रायमियाच्या लोकसंखेच्या विभागणीमद्धे खूप मोठा बदल झाला.
जेव्हा ऑटोमान लोक राज्य करत होते, तेव्हा तातार लोकांची संख्या क्रायमियामध्ये ज्यास्त होती. तातार म्हणजे मुस्लिमवंशाचे तुर्क लोक. रशियाने जेव्हा क्रायमिया मिळवला, तेव्हापासून रशियन, यूक्रेनियन आणि तातार अशी लोकसंख्या विभागली गेली.
१९४४ ला तर क्रायमिया (Crimea) मधल्या हालचालींनी कळस गाठला. रशियात तेव्हा स्टॅलिन राज्य करत होता. १९४४ ला सोव्हिएत संघाच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख लावेरांती बेरिया याने स्टॅलिनच्या वतीने तातार वंशीय लोकाना क्रायमिया मधून हेतुपूरतसर हुसकावून लावलं. यामुळे तातार लोकसंख्या कमी होऊन तिथे रशियनवंशीय लोकसंख्या वाढली.
स्टॅलिनच्या मृत्यूनंतर म्हणजे १९५३ नंतर सोव्हिएत रशियामध्ये वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या. सोव्हिएत महासंघामधल्या प्रजासत्ताक राज्यांच्याबाबत धोरण बदलली. तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या सुप्रीम प्रेसिडीयमने वटहुकूम काढून क्रायमिया ओबलास्ट या प्रजासत्ताक राज्याला यूक्रेन मध्ये समाविष्ट करायला परवानगी दिली. या सगळ्याचा करता करविता होता निकिता कृशचेव्ह!
कृशचेव्ह हा स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत महासंघाचा सर्वोच्च नेता बनला. त्याला यूक्रेनबद्दल एक प्रकारची सहानुभूती होती. यूक्रेनबाबत सोव्हिएत संघाचे संबंध सुधारावेत यासाठी त्याने मैत्रीचं प्रतीक म्हणून क्रायमिया ओबलास्ट यूक्रेनला देऊ केला.
याबाबत २५ जानेवारी १९५४ ला सोव्हिएत महासंघाच्या सुप्रीम प्रेसिडीयमने ठराव मंजूर केला आणि हुकूम जारी केला. आणि तो प्रत्यक्षात येण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस ठरवला गेला. शेवटी क्रायमियाचं हस्तांतरण झालं आणि हा प्रदेश सोव्हिएत रशियाने यूक्रेनकडे सुपूर्त केला.
====
हे देखील वाचा: ब्रिटनच्या लोकांचा ‘कैमिला शैंड’ वर एवढा राग का आहे?
====
कहाणी इथेच संपत नाही –
साधारण २००९ ला समोर आलेल्या एका नव्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी १९५४ रोजी सोव्हिएत महासंघाच्या प्रेसीडियमला क्रायमियावर निर्णय घेण्यासाठी पूर्ण गणसंख्या नव्हती. त्यामुळे कमी सदस्य संख्या असूनसुद्धा यूक्रेनला क्रायमिया देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं गेलं.
थोडक्यात सांगायचं तर कोरम पूर्ण नव्हती, २७ पैकी फक्त १३ सदस्य हजर होते, म्हणून अशा पद्धतीने हस्तांतरण करणे हे बेकायदेशीर आहे, तसंच संविधानाला धरून नाही असे ताशेरेसुद्धा २०१५ ला रशियन फेडरेशनच्या अधिकाऱ्यानी ओढत ते स्पष्ट केलं.
१९९२ ला सोव्हिएत महासंघाने अधिकृतरीत्या हे स्पष्ट केलं की, निकिता कृशचेव्ह यांनी देशद्रोह केला आहे आणि क्रायमिया यूक्रेनला देऊन रशियन लोकांचा विश्वासघात केला आहे. ही बाब खूपच गंभीर होती.
क्रायमियाचा तिढा सुटला असं वाटत होतं, पण तसं न होता हे संकट अजून गहिरं झालं. क्रायमिया जणू अनंत काळासाठी धगधगता राहिला आणि रशिया-यूक्रेन वाद सतत उफाळत राहिला.
याला दीर्घकालीन उत्तर शोधण्यापेक्षा आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यापेक्षा रशिया आणि यूक्रेन हे नेहमीच एकमेकाना दोष देत राहिले, प्रसंगी युद्ध करत राहिले. क्रायमिया युद्धभूमी झाली. आधुनिक इतिहासात एकाच वंशाचे लोक रशिया आणि यूक्रेनमध्ये आहेत. हस्तांतरित केलेल्या क्रायमिया मध्ये ज्या भावनेने कृशचेव्ह यांनी मैत्रीच प्रतीक म्हणून क्रायमिया यूक्रेनला देऊ केला, ती भावना लयाला जाऊन एकमेकांमध्ये वैरच वाढत गेलं.
=====
हे देखील वाचा: ‘प्राग स्प्रिंग (Prague spring)’ अर्थात चेक प्रजासत्ताकमधला उठाव…
=====
क्रायमियाचा प्रश्न न सुटता तसाच राहिला. रशिया आणि यूक्रेन यांचा संघर्ष अजूनच तीव्र होत गेला. ही सगळी पार्श्वभूमी आहे क्रायमिया (Crimea) हस्तांतरणानंतरची! रशियाच्या महत्वाकांक्षेमुळे हा प्रदेश एकसंध न राहता दोन सत्तांमध्ये विभागला गेला. यामुळे अजून कलह निर्माण झाले.
– निखिल कासखेडीकर