DODO…अनेक ठिकाणी तुम्ही या पक्षाचे फोटो बघितलेच असतील, पण दुर्दैव म्हणजे तो आज आपल्यात नाहीये आणि यापेक्षाही दुःखद गोष्ट म्हणजे माणसामुळे नामशेष होणारा हा पृथ्वीवरचा पहिला जीव होता. आज तो फक्त चित्रात उरला आहे. त्याला एक वेडा पक्षी म्हटलं गेलं होतं. पण त्याच्याइतका शहाणा तर माणूसपण नव्हता. पण तो पूर्णपणे नामशेष झाला कसा, त्याच्यामागेही एक स्टोरी आहे. आज याच DODOची करुण कहाणी आपण जाणून घेणार आहोत. अनेक जण डोडोला वेडगळ वागणारा प्राणी म्हणायचे आणि याच कारणामुळे तो कायमचा संपला, असंही म्हटलं गेल. पण सत्य काहीतरी वेगळच आहे. डोडोचा पोर्तुगीज भाषेत अर्थ होतो वेडा… आता पोर्तुगीज लोकांशी त्याचं काय कनेक्शन हे पुढे सांगतो. खर तर DODO हा कबुतराच्या फॅमिली मधला…म्हणजे कबुतराचाच नातेवाईक पण त्याच्या पेक्षा थोडासा मोठा. जशी मांजर लहान असते, पण आपण वाघ सिंहालाही कॅट फॅमिली मधलं म्हणतो. तसच काहीस डोडोचं होतं.

४० लाख वर्षांपूर्वी आशिया खंडाच्या एका भागातून उडत हे कबुतरासारखे पक्षी मॉरिशसच्या जमिनीवर उतरले. ही जागा म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गच होती कारण इथे खाण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या आणि इथे त्यांची शिकार करेल, असा एकही प्राणी अस्तित्वात नव्हता. म्हणजे तुम्हाला एक युनिक गोष्ट सांगू की मॉरीशस मध्ये विषारी सापच नाहीयेत. म्हणजे हा देश किंवा बेट किती isolated होता, याचा विचार करा. बरं.. हा DODO पक्ष्याचा झुंड इथे आला. इथेच विसावला. कसलं टेन्शन नव्हतं. त्यामुळे मॉरिशसच्या जमिनीलाच त्यांनी आपलं घर बनवलं. आता DODOचं थोडं वर्णन सांगतो, त्याची चोच पिवळसर तपकिरी रंगाची आणि पुढच्या बाजूने किंचितशी वाकलेली भक्कम चोच. चोचीच्या मागचा डोळ्यापर्यंतचा आणि डोक्याचा अर्धा भाग राखाडी रंगाचा, उरलेला मागील डोक्याचा पांढरट तपकिरी पिसांचा भाग, यांच्या नाकपुड्यांचे छिद्र चोचीपर्यंत गेलेले दिसते. थोडा बदकांसारखा आकार, बदकाच्या पिल्लांसारखे छोटेसे पंख, पिवळसर पाय, अंगावर पांढरट तपकिरी राखाडी कुरळ्या पंखांच मिश्रण…. उंची जवळपास तीन फूट. २१ किलो वजन असावं. आता इतकं सगळं सांगणं गरजेचं होतं. कारण तो आज अस्तित्वात नाहीये.
हे देखील वाचा :
China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !
आता इथे शिकारी प्राणी नव्हता… आणि खायला भरपूर होतं. तर हा नुसता खातच सुटला. या प्रजातीने इतकं खाल्लं की यांचा आकार वाढत गेला, चेहरापट्टी बदलत गेली. वजन वाढलं. दुसरीकडे जाण्याची गरज नव्हती म्हणून तो फार उडतही नव्हता आणि काही वर्षांनी उडणंसुद्धा विसरला. त्यामुळे एकाच बेटावर लाखो वर्ष हे पक्षी राहिले. वाढले आणि आपलं साम्राज्य तयार केलं. आता शारीरिक ताकत कितीही असली तरीही युद्ध करण्याची किंवा प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. कारण ती परिस्थितीच त्यांच्यावर कधी उद्भवली नव्हती. माणूस १०व्या शतकापर्यंत मॉरीशसमध्ये पोहोचला नव्हता. पण नंतर याच शतकात पहिल्यांदाच अरब इथे पोहोचले आणि त्यांनी या बेटाला दिना अरोबी असं नाव दिलं. पण त्यांचा डोडोशी फारसा संपर्क आला नाही आणि त्यांना इथे काहीच नवीन सापडलं नाही, त्यामुळे ते परतले. पुढे १५०७ दरम्यान पोर्तुगीज इथे आले. आता हे शाणे निघाले. यांना मोठ्या प्रमाणात डोडो दिसले. त्यामुळे खाण्यासाठी तरी यांचा उपयोग होईल. असं त्यांना वाटलं. त्यात डोडोला आपल्यावर कुणी attack करतंय. कुणी जीवे मारायला येतंय. या गोष्टी कळतच नव्हत्या. ते कुणी शिकार करायला आलं, की पळतच नव्हते. कारण त्यांनी आत्मसंरक्षण ही वृत्तीच आत्मसात केली नव्हती.
आणि DODO ची शिकार व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या याच कारणामुळे पोर्तुगीजांनी त्यांचं नाव डोडो म्हणजेच वेडा असं ठेवलं. त्यांचं मांस रुचकर नव्हतं, असे उल्लेख पोर्तुगीजांनी करून ठेवले आहेत. पण पोर्तुगीजांनी त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली नाही. त्यामुळे डोडो तसे सुरक्षित राहिले. पण नंतर १६३८ ला डच मॉरीशसवर आले. अख्खा कंट्रोल त्यांनी घेतला. आपल्या प्रिन्स मॉरीस ऑफ नासाऊ याच्या नावावरूनच त्यांनी या बेटाचं नाव मॉरीशस ठेवलं. आता हे आले सोबतच इतर प्राण्यांची फौज घेऊन आले. म्हणजे कुत्रे, मांजर, घोडे, माकड डुक्कर वगैरे… आता इथे डच लोकं मजा म्हणून डोडोची शिकार करू लागले. सोबतच इतर प्राणी आपलं अन्न म्हणून त्यांची शिकार करू लागले. पण डोडो मात्र डोडोच… तो शिकार होत गेला. कधीही घाबरून पळाला नाही. भीती ही त्यांची वृत्तीच नव्हती. त्यांना असं चालत जाऊन काठीने मारणसुद्धा शक्य होतं. त्यामुळे डच लोकांमध्ये शर्यतसुद्धा लागायची की कोण किती डोडो मारतय.

यासोबतच डचांनी इथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु केली. त्यामुळे शिकारीसोबत अन्न-पाणी असा दुहेरी धोका त्यांच्या नशिबी आला. या डचांनी त्यांची इतकी कत्तल केली इतकी कत्तल केली की, शेवटचा डोडो मारताना त्यांना कदाचित वाटलं, नसावं की आपण एक पृथ्वीवरची पक्ष्याची जातच नामशेष करून टाकतोय. १६९० पर्यंत पृथ्वीवर एकही डोडो टिकला नाही. म्हणजे जी जात पृथ्वीवर तब्बल ४० लाख वर्ष वावरली. पण तिला फक्त ५० वर्षात माणसाने संपवून टाकलं. माणसाच्या जन्मापूर्वीपासून पृथ्वीवर राहणारी ही पक्ष्यांची जमात माणसानेच संपवली. आता डोडोचे फक्त अवशेष उरलेले आहेत. अनेक म्युझिअम्स मध्ये ते पहायला मिळतात. तुम्हाला माहितीये दोन डोडो भारतातसुद्धा आणले गेले होते, मुघलांच्या काळात… मुघल चित्रकार उस्ताद मन्सूरने १६२५ साली हे चित्र काढून ठेवलं होतं. यामध्ये मध्यभागी तुम्ही DODO पाहू शकता. युरोपियन लोकांनीही काही डोडो तिथे नेले होते, पण ते जगू शकले नाहीत. आता नामशेष झालेल्या डोडोचं पक्ष्याचं पुनर्जीवन करण्यासाठी सायंटिस्ट प्रयत्न करत आहेत. पण माणसाने तेव्हाच पृथ्वीसाठी घातक नसलेल्या पक्ष्याची प्रजाती का संपवली, हेच मोठ कोडं आहे.
हे देखील वाचा :
मनुष्य प्राणी पृथ्वीवरील मूलनिवासी नाही? काय सांगतो सिद्धांत?
