भारतातील सर्वच शहरात सध्या उष्णतेचे वारे सुरु आहेत. काही शहरातील तापमानानं चाळीशी ओलांडली आहे, तर काही शहरात तापमान पंचेचाळीस अंशावर आले आहे. या उष्णतेमुळे सर्वच हैराण झाले आहेत. जागतिक पर्यावरण संघटनांच्या मते पुढच्या काही वर्षात असेच किंवा यापेक्षाही अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे काळजी व्यक्त करण्यात येत आहे. (Death Valley)
पण विचार करा, या जगात असे एक शहर आहे, जेथील तापमान ५६ अंशापर्यंत पोहचते. सूर्य जणू शेजारीच असल्याची भावना तेथे वावरतांना जाणवते. अशा तप्त ठिकाणी गेल्या हजार वर्षापासून मानवी वस्ती आहे. फारकाय प्राणीही अशा तप्त जागी राहतात. पृथ्वीवरील ही सर्वाधिक उष्ण जागा कुठे आहे, हे जाणले तर अधिक आश्चर्य वाटले. कारण ज्याचा डेथ व्हॅली म्हणून उल्लेख करण्यात येतो, हे शहर अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या एका टोकाला ही डेथ व्हॅली आहे. इथे फक्त उन्हाळ्यातच नाही तर एरवीही एवढी उष्णता असते की, अंगावर उकळते पाणी पडल्याचा भास होतो. येथे राहणा-या नागरिकांना ठराविक नियम पाळावेच लागतात. अन्यथा या उष्णतेनं त्यांचा जागीच मृत्यू होण्याचा धोका आहे. (Death Valley)
भारतासह जगातील सर्वच देशांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मालीसारख्या देशात तापमानानं ४८ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. मात्र यापेक्षाही अधिक तापमान अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील डेथ व्हॅलीमध्ये आहे. ‘डेथ व्हॅली‘ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण असल्याचे म्हटले जाते. येथीन नेहमीचे तापमान हे ५० अंशांपर्यंत राहते. १९१३ मध्ये हे तापमान ५६.७ अंशांवर पोहचले होते. तर २०१३ मध्ये या हेथ व्हॅलीमध्ये तापमानाचा पारा ५४ अंशापर्यंत पोहचला होता. सतत अंगावर गरम लाव्हा पडत असल्याचा भास या ठिकाणी होतो. म्हणूनच या जागेला डेथ व्हॅली म्हणतात.
आता या डेथ व्हॅलीचे तापमान ५५ अंशावर आहे. तरीही या डेथ व्हॅलीमध्ये मानवी वस्ती आहे. काही वर्षापासून नाही, तर जवळपास १००० वर्षापासून येथे मानवी वस्ती आहे. तसेच प्राणीही काही प्रमाणात आहेत. या सर्वांनी येथील उष्ण वातावणाशी स्वतःला जुळवून घेतले आहे. पण त्यासोबत येथे राहणाऱ्या प्रत्येकाला काही नियम कटाक्षानं पाळावे लागतात. त्या संदर्भात या डेथ व्हॅलीच्या प्रत्येक रस्त्यावर फलक लावण्यात आले आहेत. (Death Valley)
येथे सकाळी १० नंतर घराबाहेर पडू नका, अशा सूचना लिहिलेल्या आहेत. डेथ व्हॅलीचे तापमान कायम इतके तप्त असते की, येथे काही मिनिटे फिरल्यावर शरीरावर पाणी ओतून घ्यावे लागते. या भागात फिरतांना विशिष्ट शूज घालावे लागतात. सामान्य सोल असलेले शूज घातले तर त्या शूजचे तळवे काही तासातच फाटतात. एवढं असूनही या भागात टिम्बिशा जमातीचे वास्तव्य आहे.
या जमातीची ओळख पानामिंट शोशोन म्हणूनही आहे. हे तिंबिशा जमातीचे नागरिक येथे १००० वर्षापासून रहात आहेत. या भागात उन्हाळ्यात पारा ५४ अंशापर्यंत जात असला तरी येथे थंडीही तेवढीच भयानक पडते. डेथ व्हॅली समुद्रसपाटीपासून ८६ मीटर खाली वसलेल्या या शहरात हिवाळ्यातील तापमान शून्याच्या खाली जाते. या तापमानाची टिम्बिशा जमातीच्या नागरिकांना सवय झाली आहे. त्यांनी या डेथ व्हॅलीमध्ये पाण्याचे स्रोत कोठे सापडतात याची माहिती आहे. (Death Valley)
तसेच शेती उपयोगी जमीन कशी आहे, कुठल्या वनस्पतीची लागवड कधी आणि कशी करावी, याची माहिती आहे. त्यामुळेच एवढ्या विषम हवामानातही त्यांनी त्यांचे अस्तित्व टिकवले आहे. फक्त टिम्बिशा जमातीच्या नागरिकांनीच नव्हे तर येथे आढळणाऱ्या जंगली मेंढ्या, ससे आणि इतर प्राण्यांच्या सवयीही याच हवामानला अनुसार आहेत. या भागात कधीही दिवसा प्राणी फिरतांना दिसत नाहीत. तर ते रात्रीच्या काळोखात बाहेर पडतात.
=============
हे देखील वाचा : पाकिटबंद फूडच्या लेबलवरील माहिती योग्य आहे की नाही कशी तपासून पहावी?
=============
डेथ व्हॅलीमध्ये नॅशनल पार्कही आहे. यात काम करणारी ब्रॅन्डी स्टीवर्ट ही तिचा अनुभव व्यक्त करतांना डेथ व्हॅलीतील जीवन म्हणजे एक परीक्षा असल्याचे सांगते. इथे इतके गरम आहे की मला माझा संयम हरवून बसेन असे वाटते. घरातून बाहेर पडल्यावर केस कडक होतात. घाम वाहू लागण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होते. यावरुन तेथील जीवनमालाचा अंदाज येतो. डेथ व्हॅलीची हवा स्वच्छ आणि कोरडी असते.(Death Valley)
त्यामुळे येथील माती, खडक आणि वाळू सारखे गडद रंगाचे पृष्ठभाग सूर्याच्या उष्णतेमुळे खूप गरम होतात. डेथ व्हॅली देखील वाळवंटाला लागून आहे, त्यामुळे या वाळवंटातील उष्ण हवा या व्हॅलीतील हवा अधिक तप्त करते. याशिवाय या खोऱ्यात कोरडे पर्वत आहेत, ज्यामुळे उष्ण वाऱ्यांचे वर्तुळ निर्माण होते. या खोऱ्याला डेथ व्हॅली असे नाव देण्यामागेही एक कारण आहे. १९ व्या शतकात सोन्या-चांदीच्या अनेक खाणी येथे मिळाल्या. त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक लोक या दरीतून प्रवास करीत. पण सोने मिळण्याऐवजी त्यांचा उष्णतेनं मृत्यू होत असे. हे प्रमाण एवढे वाढले, की या व्हॅलीला डेथ व्हॅली असे नाव पडले. आजही या डेथ व्हॅलीत उत्सुकतेपोटी पर्यटक येतात. मात्र एक दिवसापेक्षा जास्त येथे राहू शकत नाहीत.
सई बने