Home » क्रिसन परेराची ही सत्यघटना तुम्हाला माहिती आहे का?

क्रिसन परेराची ही सत्यघटना तुम्हाला माहिती आहे का?

by Team Gajawaja
0 comment
Krishan Perera
Share

क्रिसन परेरा (Krishan Perera) या अभिनेत्रीची शारजाह तुरुंगातून सुटका झाली असून ती पुढच्या 48 तासात कधीही भारतात येऊ शकते. ही बातमी ऐकल्यावर तुम्ही पहिला प्रश्न विचाराल. ही क्रिसन परेरा कोण आणि तिला अटक का झाली? क्रिसन परेरा ही नवोदित अभिनेत्री कोणाच्याही ध्यानीमनी नसेल. या अभिनेत्रीला एका वेबसिरिजमध्ये भूमिका देण्याचं अमिष दाखवण्यात आलं होतं. क्रिसन एका ब्रेकच्या प्रतीक्षेतच होती. ती या सर्व जाळ्यात सहजपणे खेचली गेली. मुंबईत तिची ऑडीशन झाली नंतर दुबईला फायनल ऑडीशनचं अमिष तिला दाखवून दुबईला पाठवण्यात आलं पण ती गेली शारजाहमध्ये आणि एका सापळ्यात सापडली. क्रिसन थेट शारजाह तुरुंगात गेली. नवोदित क्रिसन परेराची (Krishan Perera) ही सत्यघटना सर्व तरुण तरुणींनी जाणून घ्यावी अशीच आहे. उत्साहाच्या भरात अनेकवेळा तरुणाई नवख्यांवर विश्वास ठेवते आणि आयुष्याला कलाटणी लागते. क्रिसनही अशाच जाळ्यात सापडली होती. तिच्या कुटुंबानं तिच्यासाठी लढाई दिली आणि आता ती शारजाहमधील तुरुंगातून बाहेर आली आहे.  एका वेबसिरिजमध्ये भूमिका करण्याच्या अमिषानं क्रिसनचं आयुष्यच बदलून गेलं. आता तिच्या आयुष्यावरच एखादी वेबसिरीज येईल. इतके त्यात चढ-उतार झाले आहेत.  

शारजाहच्या तुरुंगात बंद असलेली मुंबईची अभिनेत्री क्रिसन परेराची सुटका झाली आहे. क्रिसनचा भाऊ केविन परेरा याने क्रिसनच्या या सुटकेचा एक छोटा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात क्रिसन तिच्या आईबरोबर व्हिडिओ कॉलमार्फत बोलत असून सुटकेच्या आनंदात दोघींच्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत आहेत. क्रिसन (Krishan Perera) ही नवोदित अभिनेत्री आहे. ‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ही क्रिसन शाहजाहच्या तुरुंगात बंद असल्याची बातमी आल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. क्रिसनला यूएई पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. क्रिसनजवळ एक ट्रॉफी होती. त्यात अंमली पदार्थ लपवल्याचे स्पष्ट झाले आणि क्रिसन शारजाहच्या तुरुंगात पोहचली. या घटनेनं स्वतः क्रिसन आणि तिच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला होता. कारण क्रिसन ऑडीशनला दुबईला जाणार होती. पण ती शारजाहात कशी पोहचली याचेच त्यांना उत्तर मिळत नव्हते.  त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानक गाठले आणि मग या सर्वांचा उलगडा झाला. संपूर्ण परेरा कुटुंबाभोवती एक फास आवळला होता. त्यात क्रिसनचा बळी गेला होता, ही गोष्ट स्पष्ट झाल्यावर क्रिसनच्या (Krishan Perera) कुटुंबानं धावपळ सुरु केली.  कायदेशीर कारवाई केली, पुरावे सादर केले.  यातील ख-या आरोपींना पुढे आणले  आणि त्यामुळेच आता निर्दोष क्रिसन तुरुंगाच्या बाहेर पडली आहे.  

क्रिसन परेराला (Krishan Perera) 1 एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर अटक करण्यात आली होती.  मुंबई क्राईम ब्रँचनं याबाबत तपास केला. तेव्हा एका बेकरी मालकाने एका भांडणाचा बदला घेण्यासाठी क्रिसनला फसवले होते. याप्रकरणी पोलिसांनी बेकरीचा मालक अँथनी पॉल आणि अँथनीला मदत करणाऱ्या बँकेतील सहायक व्यवस्थापक राजेश बोभाटे यांना अटक केली आहे. क्रिसनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अँथनी पॉल नावाच्या व्यक्तीने त्याचा साथीदार रवी सोबत मिळून क्रिशनला आंतरराष्ट्रीय वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी यूएईला पाठवले होते.  त्याआधी तिची मुंबईत फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एक ऑडीशन घेण्यात आली. त्यात ती पास झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अंतिम निर्णय दुबईतील ऑडीशनवर असेल असे सांगण्यात आले आणि तिच्या विमान प्रवासाची सोय करण्यात आली. मात्र ती निघाली तेव्हा विमानतळावर तिच्या हातात  एक ट्रॉफी देण्यात आली.  याचा ऑडीशनमध्ये उपयोग होणार असल्याचे क्रिसनला सांगण्यात आले. या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज होते. शारजाहमध्ये क्रिसनच्या सामानाची तपासणी झाल्यावर तिला तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीसांनी केलेल्या तपासात आरोपी पॉलने याआधीही अनेकांना अशा प्रकारे फसवल्याचे स्पष्ट झाले आहे. अँथनीचे कुटुंब आणि अभिनेत्री कृष्ण परेरा यांचे कुटुंब  बोरिवली येथील एका इमारतीत राहतात. काही दिवसांपूर्वी अँथनीच्या बहिणीचे क्रिसनच्या (Krishan Perera) आईसोबत कुत्र्यावरुन भांडण झाले होते. या अभिनेत्रीच्या आईचा अँथनीशी वादही झाला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी एवढे मोठे नाट्य रचले गेले आणि एका तरुणीचे आयुष्य पणाला लागले.  

========

हे देखील वाचा : ‘या’ शिवलिंगाची वर्षातून एकदाच केली जाते पूजा

========

मुंबई पोलीसांनी अँथनी पॉल आणि त्याला मदत करणारा दुसरा आरोपी राजेश बोबाटे याला अटक केली आहे. पोलीसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे की, या दोघांनी याआधीही सुमारे पाच जणांना अशा पद्धतीने अडकवले आहे. काही काळापूर्वी डीजे क्लेटन रॉड्रिग्ज देखील अशाच एका प्रकरणात पकडला गेला होता.  त्याला आयत्यावेळी कोणी केक हातात दिला आणि त्यात अंमली पदार्थ होते. दोन्ही आरोपींना मुंबईत अटक केल्यानंतर आता मुंबई क्राइम ब्रँचची टीम इतर घटनांचाही तपास करीत आहे.  क्रिसनची सुटका झाली आहे. मात्र अशाच पद्धतीनं अडकवलेल्या अन्य निर्दोष व्यक्तींना सोडवण्याचे आव्हान आता मुंबई पोलीसांपुढे आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.