Home » तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? : जाणुन घ्या फायदे

तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवता का ? : जाणुन घ्या फायदे

by Team Gajawaja
0 comment
American Heart Association
Share

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्‌विषावहै ॥
ॐ शांती…शांती…शांती..॥

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवणापूर्वी म्हणण्याचे काही श्लोक आहेत, त्यापैकीच हा एक श्लोक आहे.  जेवतांना कायम कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत,मित्र-मैत्रिणींसोबत जेवावे असे नेहमी सांगितले जाते. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.  एकत्र जेवण्याचे खूप फायदे आहेत.  त्यामुळे मन आनंदी राहते..कुटुंबासोबत गप्पा मारल्या जातात आणि मुख्यत्वे सर्वांच्या सोबत जेवल्यामुळे ताटातले सर्व पदार्थ पोटात जातात. या सर्वांचा पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. अन्नाचे पचन चांगले होते,परिणामी आरोग्य चांगले राहते.  मंडळी हे सर्व आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून कायम सांगितले जाते.  मात्र आता अमेरिकेनेसुद्धा एकत्र जेवण्याचे फायदे किती आहेत, याची माहिती करुन घेतली आहे. 


अमेरिकेच्या हार्ट असोसिएशने (American Heart Association) चक्क या एकत्र जेवण्याच्या पद्धतीवर संशोधन केले आहे आणि त्यातून आलेल्या निष्कर्षानुसार एकत्र जेवल्यास 91 टक्के लाभ मिळतो.  एकत्र जेवल्यास ह्दयरोग ज्यांना आहे,  त्यांच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होत असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे.  संशोधनात आढळून आले आहे की, रोज घरच्यांसमवेत एकत्र जेवल्याने आपला दिवसभरातील ताण व थकवा निघून जातो.

अमेरिकेच्या हार्ट असोसिएशनने (American Heart Association) नुकतेच एक व्यापक असे संशोधन केले.  व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यातील बदलत्या सवयीमुळे ह्दयविकाराच्या घटनांमध्ये अमेरिकेत वाढ झाली आहे.  यामुळे या हार्ट असोसिएशनने आपल्या रुग्णांच्या फायद्यासाठी एक मोहिम राबवली.  त्यातून काढण्यात आलेले निष्कर्ष हे भारतीय संस्कृती आणि जेवण्याची पद्धत यांची उपयुक्तता किती आहे, हे सांगणारे आहेत.  अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, 91% पालक मुलांना सोबत घेऊन जेवण करण्यावर भर देत आहेत.  असे एकत्र जेवण जेवल्यावर ताण तणाव कमी होतात तसेच ह्दयावर ताण कमी येतो.  मुलांसोबत जेवण घेतल्यामुळे बीपीही कन्ट्रोलमध्ये रहाते असे या पालकांना आठळले आहे.  त्यात कुटुंबासोबत बसून जेवण केल्याने मुलांचाही आत्मविश्वासही वाढतो.  पालकांनी मुलांच्या शाळेतील प्रगतीची चौकशी केल्यानं त्यांना प्रोत्साहन मिळते.  जेवणावर अशा गप्पा झाल्याने पालक आणि मुलांचेही आरोग्य सुधारते असे निष्पन्न झाले आहे. नेहमी आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी डिनर थेरपीची प्रथा झपाट्याने वाढत आहे.   

अमेरिकन हार्ट असोसीएशनसोबत (American Heart Association) वेकफिल्ड रिसर्चने हेल्दी फॉर गुड हार्ट यांनी 1,000 अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले. या संशोधनात असे आढळून आले की, 84% लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीसोबत शक्य तितके खाण्याची इच्छा असते. कारण बहुतांशी प्रौढ व्यक्ती दिवसातील बराच वेळ एकटे राहतात.  त्यातील 3 पैकी 2 नागरिकांनी सांगितले की, या एकटेपणामुळे तणाव जाणवतो.  त्यातच जेवणही एकट्याने केल्याने जेवण व्यवस्थित होत नाही आणि ताण वाढतो, असे या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.  

==========

हे देखील वाचा : धनतेरसच्या दिवशी नवी झाडू का खरेदी करतात? पहा काय सांगते शास्र

==========

वृद्धांच्या या सततच्या तणावामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.  अमेरिकन हार्ट असोसिएशनचे (American Heart Association) प्रोफेसर एरिन मिकोस सांगतात की , इतरांसोबत जेवण केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.  कुटुंब किंवा मित्रमंडळीसोबत जेवण जेवल्यास एकटेपणाचा अनुभव कमी होतो.  त्यामुळे आता अमेरिकेत आठवड्यातले किमान दोन दिवस तरी मित्रमंडळींसोबत दुपारचे जेवण जेवण्याचा आग्रह हार्ट असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.  असोसिएशनने त्यासाठी अनेकांबरोबर संवाद साधला.  त्यातील 10 पैकी 6 नागरिकांनी सांगितले की,  मित्रमंडळींना भेटता आले नाही तर व्हिडिओ कॉलचा वापर त्यासाठी केला जातो.   करोनाच्या काळात असा एकाकीपणा अनेकांना जाणवला होता.   काही पेशंट डिप्रेशनमध्येही गेले.   त्यातून ह्दयरोग्यांची संख्या वाढली होती.  अशावेळी हार्ट असोसिएशनने आपल्या पेशंटना एकत्र आणण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय दिला.  त्याचा या रुग्णांना फायदा झाला.  

अर्थात हे सगळं संशोधन अमेरिकेत झालं आहे.  एकत्र कुटुंबसंस्कृती आणि एकत्र जेवण्याची पद्धती ही आपली भारतीय संस्कृती आहे.  पण गेल्या काही वर्षात आपण आपलीच संस्कृती विसरत चालल्यासारखे आहे.  आता अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेले संशोधन खरं तर सर्व भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.