18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र (Mahashivratri) साजरी होत आहे. महाशिवरात्रीचे हे व्रत शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. लाखो शिवभक्त या व्रताची वाट पाहत असतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे शिवभक्त कठोर व्रत करतात. काही शिवभक्त अगदी निर्जलाव्रतही करतात. शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त आहारात दुधाचा वापर टाळतात. या दिवशी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करण्यात येतो, म्हणूनच शिवभक्त दुधाचा आहारात वापर करत नाहीत. यामागे शिवशंकराप्रती असलेली भक्तांची अनंत श्रद्धा आहे. महाशिवरात्रीचे (Mahashivratri) व्रत, उपवास करताना शिवभक्तांनी काय काळजी घ्यावी, उपवासाचे कुठले पदार्थ खावेत हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. शिवाय उपवास करतांना फळांचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो, अशावेळी कोणती फळे खावीत हे जाणणेही महत्त्वाचे आहे.
भगवान शंकराच्या भक्तांसाठी मोठा सण असलेल्या महाशिवरात्रीसाठी सर्वच शिवमंदिरात सजावट करण्यात आली आहे. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप मोठा आणि विशेष मानला जातो. महाशिवरात्रीला (Mahashivratri) भगवान शंकर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, असे मानण्यात येते. या दिवशी महादेवाची आराधना केल्यास, उपासना केल्यास महादेव भक्तांवर प्रसन्न राहतात, त्यांच्या जीवनातील कष्टांचे हरण करतात, असे सांगण्यात येते. त्यामुळेच या भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त कडक उपवास करतात. मात्र हा उपवास करतांना काळजी घेण्याची गरज असते. साधारण या महिन्यात सकाळी थंडी आणि दुपारी कडक उन्हाचा त्रास जाणवतो. अशावेळी उपवासाचे पदार्थ काय खावेत याचाही प्रश्न पडतो. तसेच उपवास असेल तेव्हा ब-याच वेळा सारखी तहान लागल्याचा अनुभव येतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी, किंवा कोणत्या फळांचा रस घ्यावा हे सुद्धा जाणणे गरजेचे आहे.
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उपवासात कोणत्याही प्रकारचे धान्य, लसूण, कांदा आदी खाण्यास पूर्णपणे मनाई आहे. तसेच काही भक्त दूध, दही आणि दूग्धजन्य पदार्थही व्यर्ज करतात. अशावेळी शंकराच्या भक्तांसाठी फळांचा आहार हा सर्वोत्तम ठरतो. फळांचे सेवन केल्याने उपवासात अशक्तपणा जाणवत नाही. फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वांचाही पुरवठा होतो. फळे केवळ ऊर्जा वाढवण्याचे काम करत नाहीत, तर ती आरोग्यदायीही ठरतातच. उपवासात सफरचंद, डाळिंब, संत्री आणि केळी खाऊ शकता. याशिवाय महाशिवरात्रीला (Mahashivratri) कलिंगड मोठ्याप्रमाणात बाजारात येते. कलिंगड हे दुहेरी फळ आहे. कलिंगड खाल्यानं पोटही भरते आणि पाण्याची तहानही भागली जाते. त्यामुळे उपवास केल्यावर सतत तहान लागल्याची भावना होत असेल तर अशावेळी कलिंगडाचे सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उपवास करतांना भाविक फळांपासून बनवलेला रस देखील उपयोगी पडू शकतो. फळांचा रस प्यायल्याने उपवासामध्ये जाणवणारा अशक्तपणा दूर होतो. फळांचा रस अनेकअंगानी उपयोगी ठरतो. उपवास असेल तर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते, मात्र अशावेळी फळांचे रस सेवन केल्यास त्याचा खूप चांगला फायदा मिळू शकतो.
या सर्वांसोबत उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाण्यापासून केलेली खिचडी आणि शिंगाड्याच्या पिठाचाही मोठ्या प्रमाणात वापर महाशिवरात्रीला केला जातो. काही ठिकाणी शिंगाड्याच्या पिठाच्या पु-या आणि बटाट्याची भाजी अथवा रताळ्याची भाजीही खाल्ली जाते. मात्र हे सर्व अन्न पोटाला पचण्यासाठी जड पडते. तसेच त्यामुळे असिडीटी होण्याची शक्यताही असते, अशावेळी या आहारासोबत लिंबू सरबत किंवा ताकाचा अवश्य वापर करावा. यामुळे हे जड पदार्थ पचण्यासाठी मदत होते.
========
हे देखील वाचा : साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीसाठी रात्री ही विमानाने प्रवास करता येणार
========
या सर्वांसोबत महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उपवासामध्ये मोठा आधार ठरतात ते सुकेमेव्याचे पदार्थ. विशेषतः खजुराचा वापर या उपवासात मोठ्या प्रमाणात केला जातो. खजुरांनी पोट भरते, तसेच शरीराला आवश्यक अशी पोषकतत्वेही पुरेपूर मिळतात. त्यामुळे या उपवासात खजूरालाही विशेष महत्त्व आहे. अनेक शिवमंदिरात भगवान शंकराच्या पिंडीवरही खजूर अर्पण केले जातात, आणि हेच खजूर मग भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात. भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उपवास ही मोठी पर्वणी असते. हा उपवास करतांना अनेक पर्याय भक्तांसमोर उपलब्ध असतात. त्याचा योग्य वापर करुन आहारात समतोल ठेवल्यास उपवासाचा त्रास जाणवणार नाही.
सई बने