ब्रिटनमध्ये राजघराण्याचे महत्त्व आजही अबाधित आहे. महाराणी एलिजाबेथ म्हणजे समस्त ब्रिटनवासीयांसाठी मानाचा ठेवा आहे. राणीचा प्रत्येक शब्द ब्रिटनवासीयांसाठी आदराचा असतो. मात्र काही दिवसांपूर्वी याच महाराणी एलिजाबेथनं अशी घोषणा केली आहे, ज्यावर ब्रिटनमध्ये कधी नव्हे तो नाराजीचा सूर उमटत आहे.
महाराणी एलिजाबेथनं काही दिवसांपूर्वी प्रिंन्स चार्ल्स हे ब्रिटनचे महाराज होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली. त्यासोबत प्रिंन्स चार्ल्स यांची द्वितीय पत्नी कैमिला शैंड (Camilla, Duchess of Cornwall) म्हणजेच डचेस ऑफ कार्नवल महाराणी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली. कैमिलाच्या नावासाठी समर्थन व्यक्त करत राणीनं शाही घराण्यानं काही नव्या परंपराचा स्विकार केला आहे आणि नागरिकांनीही त्यांचा स्विकार करावा, अशी आशा व्यक्त केली.
राणी एलिजाबेथच्या याच घोषणेनंतर ब्रिटनमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रिन्स चार्ल्स यांची प्रथम पत्नी प्रिन्सेस डायना हे त्यामागचे कारण आहे. प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू होऊन काही वर्ष होऊन गेली असली तरी, डायना अद्यापही ब्रिटेनवासीयांच्या मनात राणीचाच दर्जा ठेऊन आहे. तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि कैमिला तर नाहीच नाही….! त्याचमुळे पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये राणीनं काही सांगावं आणि नागरिकांनी उघड उघड नाराजी व्यक्त करावी असं होत आहे.
‘डचेस ऑफ कॉर्नवाल आणि काउंटेस ऑफ चेस्टर’ म्हणून ओळखली जाणारी ‘कैमिला शैंड (Camilla, Duchess of Cornwall)’ ही प्रिन्स चार्ल्सची द्वितीय पत्नी. इंग्लडमधील सर्वाधिक नापसंत असणारी व्यक्ती म्हणूनही कैमिलाचा उल्लेख होतो. यामागे कैमिलानं, चार्ल्स आणि डायनाच्या मध्ये दरी निर्माण केली आणि यातूनच डायनाचा मृत्यू झाल्याचे काही इंग्लडवासीयांचे मत आहे.
कैमिलाचा सर्व जीवनप्रवासच अशा धक्कादायक घटनांनी भरलेला आहे. कैमिलाचा जन्म १७ जुलै १९४७ रोजी झाला. ब्रूस शैंड आणि रॉसलिंड शैंड या दाम्प्त्याची ही मोठी मुलगी. इंग्लड, फ्रांन्स, स्विझरलॅडमध्ये कैमिलाचं शिक्षण झालं. उच्च घराण्यात वाढलेल्या कैमिलाला घोडस्वारीचा शौक आहे. अशाच एका घोडस्वारीच्या स्पर्धेदरम्यान तिची आणि प्रिंन्स चार्ल्सची ओळख झाल्याचे सांगण्यात येते.
सुरुवातीला असलेल्या या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. चार्ल्स आणि कैमिलाबाबत उघड उघड चर्चा होऊ लागली. मात्र राजघराण्याला कैमिला शैंड (Camilla, Duchess of Cornwall) सून म्हणून कधीच पसंत नव्हती. महाराणी एलिजाबेथनं याबाबत नाराजी व्यक्त केली होती. कैमिला शैंड (Camilla, Duchess of Cornwall) ही सुरुवातीपासून स्वतंत्र विचारांची महिला होती. राजघराण्यात एवढा स्वतंत्र बाणा चालणार नाही, म्हणून कैमिलाला विरोध झाला. परिणामी चार्ल्सला रॉयल नेव्हीचे निमित्त काढून परदेशात पाठवण्यात आले.
या सर्वात एवढे विवाद झाले की १९७३ मध्ये कैमिलानं एंड्रयू पार्कर बाउल्स सोबत लग्न करुन राजघराण्यापासून आपली सुटका करुन घेतली. मात्र हे सर्व लोकांसाठी होतं. प्रत्यक्षात चार्ल्स आणि कैमिलानं आपल्या नात्याला कधीही फुलस्टॉप दिला नव्हता. लग्न झाल्यावरही या दोघांना एकत्र पहिले गेले. याचा कैमिलाच्या वैवाहिक आयुष्यावरही परिणाम झाला. कैमिला आणि एंड्र्यू यांच्यामधील वादाच्या बातम्या इंग्लडच्या वृत्तपत्रात झळकत होत्या.
या सर्व वादाच्या दरम्यान चार्ल्सच्या जीवनात डायनाचा प्रवेश झाला. प्रिंन्स चार्ल्स आणि डायनाची मोठी बहिण सारा स्पेंसर यांची मैत्री होती. याच दोघांच्या एका भेटीत साराबरोबर आलेली डायना चार्ल्सला आवडली. अवघ्या अठरा वर्षाच्या डायनानं प्रिंन्स चार्ल्सला जणू भूरळ घातली. दोघं वारंवार भेटू लागले. अखेर एक दिवस चार्ल्सनं डायनाला आपल्या राजवाड्यात शाही भोजनासाठी आमंत्रित केले. याचा अर्थ चार्ल्स, आपल्या सर्व कुटुंबाला डायनाची ओळख करुन देणार होता.
डायनाचे घराणेही शाही घराण्याशी संबंधित होते. डायनाचे सौदर्य आणि तिचा स्वभावही सर्वांना आवडला आणि चार्ल्सला डायनाबरोबर लग्न करण्यासाठी आग्रह करण्यात आला. यातून चार्ल्स कैमिलाला विसरुन जाईल, अशी आशाही होती. १९८१ मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि डायनाचा शाही विवाह सोहळा पार पडला. आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा, खर्चिक आणि लोकप्रिय सोहळा म्हणून या विवाहाची नोंद झाली. गोड चेहऱ्याची डायना समस्त इंग्लवासीयांच्या चर्चेचा विषय ठरली.
डायनाचे सौंदर्य आणि शांत चेहरा यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. यात बऱ्याचवेळा प्रिन्स चार्ल्सकडेही दुर्लक्ष होऊ लागले. या शाही जोडप्याला विल्यम आणि हैरी ही दोन मुले झाली. मात्र डायनला कैमिलाच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. त्यातून ती डिप्रेशनमध्ये गेली.
====
हे ही वाचा: असं काय घडलं होतं त्या रात्री की, आतंकवादी कसाब म्हणाला भारतमाता की जय!
====
कैमिलाबरोबर तिची भेटही झाली, पण कैमिला चार्ल्सला विसरायला तयार नव्हती. परिणामी डायनाची तब्बेत आणखी खराब झाली. यात कैमिलाच्या घटस्फोटाच्या बातमीनं अधिक भर घातली. या सर्वांमुळे चार्ल्स आणि डायनाचा घटस्फोट झाला. यानंतर वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी डायनाचे एका अपघातात निधन झाले. डायनाच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये कैमिलाबद्दल नकारात्मक वातावरण तयार झाले. तिच्यामुळेच डायनाचे निधन झाले, असा आरोप डायनाच्या चाहत्यांनी केला.
यथावकाश कैमिला आणि चार्ल्सच्या नात्याला राजघराण्यानं मान्यता दिली आणि दोघांचाही विवाह झाला. तरीही कैमिला राजघराण्यात उपरीच मानली जायची. मात्र राणी एलिजाबेथनं अलिकडे झालेल्या एका शाही समारंभात आपल्या मुलाकडे राजघराण्याची गादी देण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्लडमध्ये राजाची पत्नी महाराणी ठरते. त्यानुसार कैमिला शैंड (Camilla, Duchess of Cornwall) महाराणी होणार हे उघड झाले. राणीला कैमिलाबद्दल असलेला जनतेचा रोषही माहित असल्यामुळे कैमिलाला जनतेने उदार मनाने स्विकारावे, असे आवाहनही केले.
====
हे ही वाचा: ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा करार झालेले ब्राह्मोस (BrahMos) नक्की काय आहे
====
६ फेब्रुवारी १९५२ रोजी महाराणी एलिजाबेथ यांचा राज्यरोहण समारंभ झाला. आता त्याला सत्तर वर्ष झाली आहेत. आज नव्वदीपार असलेल्या राणीचा उत्तराधिकारी कोण याची उत्सुकता अवघ्या ब्रिटनला आहे. त्यात कैमिलाचे नाव पुढे आल्यानं आणखी चर्चा होऊ लागली आहे. अर्थात राणी एलिझाबेथने अनेकवेळा धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. हा असाच प्रकार असल्याची चर्चाही राणीच्या चाहत्यांमध्ये आहे. लवकरच ब्रिटनची भावी राणी कोण हे स्पष्ट होणार असून, त्यावेळी राणी नक्की जेनतेच्या भावनांचा विचार करेल अशी अपेक्षा डायनाचे चाहते व्यक्त करीत आहेत.
– सई बने