Home » Balipratipada : जाणून घ्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचे महत्त्व

Balipratipada : जाणून घ्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Balipratipada
Share

लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा, पाडव्याचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये पाडव्याला मोठे महत्त्व आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदीला लोकांची एकच झुंबड उडते. शिवाय पाडव्याला पत्नी आपल्या पतीला औक्षण करते, व्यापाऱ्यांसाठी देखील पाडव्याचा दिवस हा त्यांच्या वर्षाचा प्रारंभ असतो. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. (Diwali)

पाडव्याचा हा दिवस विशेषतः महाराष्ट्रात आणि इतर अनेक राज्यांमध्ये श्रद्धा आणि आनंदाने साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी दारासमोर महिला शेणाने बळीची प्रतीकात्मक प्रतिमा काढली जायची. आजही अनेक ठिकाणी ही पद्धत पाळली जाते. मात्र आता अनेक ठिकाणी शेणाऐवजी रांगोळीने बळी काढला जातो. यावर्षी २२ ऑक्टोबर 2025 रोजी बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त हा सकाळी १०.५६ वाजल्यापासून ते दुपारी १२.२३ वाजेपर्यंत आणि तिसरा मुहूर्त हा संध्याकाळी ४.२४ वाजल्यापासून ते ६.०९ वाजेपर्यंत आहे. (Balipratipada)

पाडव्याच्या दिवशी सकाळी घरातील पुरुषांना सुवासिक तेल आणि उटणे लावण्याची पद्धत आहे. या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना आणि नवऱ्याला पाटावर बसवून त्यांच्या भोवती रांगोळी काढून औक्षण करतात. आपल्या वैवाहिक संसार उज्ज्वलं व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो या साठी पत्नी पतीचे औक्षण करते. नवरा देखील बायकोला ओवाळणी देतो. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. विशेष करून उत्तर भारतात याचा महत्त्व आहे या दिवशी विष्णूंची पूजा केली जाते त्यांना पंच पक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. या सणाला अन्नकुट असे ही म्हणतात. व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या काढल्या जातात. नवीन वह्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करतात. (Top Marathi News)

या दिवशी विक्रमी संवत सुरू होतं. या दिवसाला द्यूत प्रतिपदा देखील म्हणतात त्या मागील कारण असे की एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला द्यूत खेळात हरवले होते.
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।
भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।
“हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बलिराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असुरशत्रू आहेस. केलेली ही पूजा तू ग्रहण कर.’’ अशी प्रार्थना करून बळीराजा प्रित्यर्थ दीप आणि वस्त्र दान करतात. ” ‘इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी विनवणी बळीराजाकडे केली जाते. (Latest Marathi Headline)

Balipratipada

पाडव्याच्याच दिवशी नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे. (Top Stories)

पौराणिक कथा
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, प्रजेचे हित पाहणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही या राजाची ख्याती होती. पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात समोर उभे राहिले. या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. (Marathi Trending Headline)

वचन दिल्या कारणाने बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनाने त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही दानशूरपण अंगी असल्याने त्याला पाताळ लोकचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. (Top Trending News)

=======

Laxmi Pujan : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण करा ‘हे’ खास फुल मिळवा भरभराटीचा आशीर्वाद

Diwali : दरवाज्याबाहेर आंब्याच्या किंवा अशोकाच्याच पानांचे तोरण का लावले जाते?

=======

बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा दिवस भक्ती, दानशीलता, प्रेम, आणि एकोपा दर्शवणारा आहे. बळी राजाच्या कथेने त्यागाचे आणि भक्तीचे महत्त्व शिकवले आहे. राजा बळीने आपल्या प्रजेवर असलेले प्रेम आणि त्यागाने समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण दिले आहे. त्याची ही कथा आजही आपल्याला प्रेम, एकोपा आणि सामाजिक समरसतेची शिकवण देते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.