तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा संदेश देणारी डिवलाई उद्यापासून सुरु होत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जणं या सणाची वर्षभर वाट बघतात. पाच दिवसाचा मोठा सण असलेली ही दिवाळी मोठा आनंद आणि उत्साह सोबत घेऊन येत असते. घर स्वच्छ करण्यापासून ते घर सजवणे, घरात वेगवेगळे पदार्थ बनवण्यापर्यंत सर्वच गोष्टी सगळे एकत्र मिळून करातात. खऱ्या अर्थाने दिवाळी संपूर्ण कुटुंब एकत्र आणत असते. उद्या दिवाळीचा पहिला सण आहे ‘वसुबारस’. आता वसुबारस सण म्हणजे नक्की काय आणि तो का साजरा करतात हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाला वैज्ञानिक, पौराणिक, ऐतिहासिक असेच सर्वच प्रकारचा इतिहास असतो. वसुबारस सणाच्या बाबतीतही असेच आहे. वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. या सणाचे महत्व म्हणजे भरत हा कृषिप्रधान देश आहे. या देशात पशु पक्षी, प्राणी या सर्वांवर समान प्रेम केले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या पोटात ३३ कोटी देव असल्याची मान्यता आहे. त्यामुळे ती नेहमीच वंदनीय आहे. याच गायीप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
वसुबारस सण साजरा केला जाण्याचे दुसरे महत्व म्हणजे आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असे मानले जाते. काही ठिकाणी वसुबारसच्या आधी ‘करुडाष्टमी’ येते त्या दिवसापासून दिवाळी सुरु होते तर काही ठिकाणी धनतेरसला दिवाळीचा पहिला दिवस समजला जातो. यंदा २८ ऑक्टोबर अर्थात सोमवारी वसुबारस हा सण साजरा होत आहे. अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे .
वसुबारसच्या दिवशी ज्यांच्याकडे घरी गाय, वासरे आहेत त्यांच्याकडे पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. संध्याकाळी गाय आणि वासराची सोबत पूजा केली जाते. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी.
समुद्रमंथनाच्या वेळी अमृत सह- नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह पाच गाई उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटले गेले आहे, कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे, शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.
वसुबारची पूजा करण्याची पद्धत
वसुबारची पूजा संध्याकाळी करायची असते. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. सर्वप्रथम गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून हार घालावा. वासराची देखील अशीच पूजा करावी. नंतर त्यांना निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श तरुण नमस्कार करावा. गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी अनेक ठिकाणी गवारीची भाजी आणि भाकरी देखील नैवेद्य म्हणून दाखवतात. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे आणि त्याची पूजा करावी.
=========
हे देखील वाचा : ‘या’ मंदिरातील पोकळ खांबांमधून येतो संगीताचा आवाज
=========
वसुबारस पूजन मंत्र
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
वसुबारसचे काही नियम देखील आहेत. ते म्हणजे या दिवशी स्त्रिया दिवसभर उपास करतात. शिवाय वसुबारसला गहू, मूग खात नाही. सवाष्ण स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.