आज नरक चतुर्दशी दिवाळीचा दुसरा दिवस. आजच्या दिवसाला छोटी दिवाळी देखील म्हटले जाते. श्रीकृष्णाने आजच्या दिवशी नरकासुराचा वध केला आणि त्याच्या कैदेमध्ये असणाऱ्या १६ हजार स्त्रियांना मोकळे केले. शिवाय आज यमदीप दानाचे देखील मोठे महत्व आहे. नरक चतुर्दशीला पहाटे सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशी झाली की दुसरा दिवस असतो तो मुख्य दिवाळीचा अर्थात लक्ष्मी पूजनाचा. दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिच्याकडे संपत्ती, भरभराटसोबतच उत्तम आरोग्य आणि संकटमुक्त जीवन मागितले जाते. दिवाळी किंवा दीपावली हा हिंदू धर्मातील सण-उत्सवातला मुख्य सण आहे. प्रत्येकाला दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते. आणि आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी साजरी होते. या दिवशी घरोघरी दिव्यांची आरास, दारात रांगोळी, रोषणाई, विविध पक्वान्न पाहायला मिळतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.समुद्रमंथनाच्या वेळी क्षीरसागरातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय आहे, आणि शुभ तिथी कधी पासून चालू होते जाणून घेऊया.
यंदा आश्विन अमावस्येची तारीख दोन दिवसांवर येत असल्याने यावर्षी अनेक जणांमध्ये लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर आहे की, १ नोव्हेंबरला असा गोंधळ आहे. लक्ष्मीपूजन हे आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा हा सण १ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळातील तीन शुभ मुहूर्त मानले जातात. देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळात करावी.
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
सकाळी ८ ते सकाळी ९.३० – लाभ
सकाळी ९.३० ते दुपारी ११ – अमृत
दुपारी १२.३० ते दुपारी २ – शुभ
संध्याकाळी ५ ते ६.३० – चंचल
संध्याकाळी ५:३५ ते ८:११ – प्रदोष काल
संध्याकाळी ६.२१ ते ८.१७ – वृषभ काल
लक्ष्मी पूजन पूजा पद्धत
गणेश-लक्ष्मीची मूर्ती चौरंगावर ठेवून त्याच्या बाजूला रांगोळी काढा. मूर्तीच्या बाजूला दिवा लावून यानंतर प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी कच्चे तांदूळ ठेवा.
त्यानंतर गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशासोबत कुबेर, सरस्वती आणि काली मातेची पूजा करण्याची परंपरा आहे.
भगवान विष्णूची पूजा केल्याशिवाय देवी लक्ष्मीची पूजाही करायला हवी. लक्ष्मीजींच्या उजव्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठापना करा. हळदी- कुंकू, अक्षता- फुले अर्पण करुन बताशा आणि लाह्या अर्पण करा. या दिवशी केरसुणीची देखील पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचा मंत्र वाचून गोडाचे पदार्थ आणि घरातील फराळ ठेवा.
लक्ष्मी मंत्र
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।
कुबेर मंत्र
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥
========
हे देखील वाचा : नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व कोणते?
========
समुद्रमंथनाच्यावेळी क्षीरसागरातून माता लक्ष्मी प्रकट झाली होती. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केली जाते. म्हणून या दिवशी लोक आपली घरे सजवून देवी लक्ष्मीचे स्वागत करतात आणि तिची पूजा करतात. असे मानले जाते की लक्ष्मी-विष्णूचा विवाह देखील दिवाळीच्या रात्री झाला होता.
लक्ष्मी प्रकाश, सौंदर्य, सौभाग्य आणि संपत्तीची देवी आहे. यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची साधारणपणे पूजा केली जाते, पण आळशी असलेल्या किंवा तिच्याकडे केवळ संपत्ती म्हणून काम करण्याची इच्छा नसलेल्या लोकांकडे ती जास्त काळ टिकत नाही असे सांगितले जाते.
प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आहे. लक्ष्मीपूजनाबाबत पण एक प्रसिद्ध कथा आहे. असं म्हणतात विष्णू देवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व देवांना माता लक्ष्मीसह बळीच्या कारागृहातून मुक्त केलं होतं. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी, त्यामुळे आपण दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय किंवा पूजा करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)