आज यंदाच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा आणि मोठा दिवस आहे. आज दिवाळीतील मुख्य सण साजरा होत आहे आणि तो म्हणजे लक्ष्मी पूजन. अनेक ठिकाणी काळ लक्ष्मी पूजन साजरे करण्यात आले तर बरेच लोकं आज लक्ष्मी पूजन साजरे करणार आहेत. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची यथासांग पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे सांगितले जाते की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरित होते आणि फिरते.
देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना यावेळी आशीर्वाद देत त्यांच्या मागण्या पूर्ण करते. मात्र लक्ष्मी चंचल समजली जाते. ती सगळेकडे जात नाही. तिला स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण आवडते. त्यामुळे ती अशा वातारणातच राहणे पसंत करते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तिला ज्या भक्ताचे घर आवडते ती तिथेच राहते. यामुळेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा मिळविण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. यामध्ये आजच्या दिवशी कोणते उपाय करू नये आणि कोणते उपाय करावे याबद्दल देखील जाणकार काही माहिती देतात. चला जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या गोष्टी कराव्या
– शास्त्रानुसार दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी स्नान वगैरे आटोपून सूर्योदयापूर्वी करावी.
– लक्ष्मी मातेच्या पूजेपूर्वी घराची व्यवस्थित साफसफाई करून घराला फुले, आंब्याची पाने, रांगोळी इत्यादींनी सजवा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरामध्ये पूजेच्या वेळी उत्तम प्रकाश आणि प्रसन्न वातावरण देखील असणे आवश्यक असते.
– घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत. असे केल्याने मााता लक्ष्मी प्रसन्न होते.
– लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य स्तोत्रांचे पठण करावे.
– गणेशजी आणि लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळी लाल वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.
– लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय असून, यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
– या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या गोष्टी करु नये
– घराच्या प्रवेशद्वारावर किंवा घराच्या आत कुठेही घाण राहून देऊ नका. नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.
– दिवाळीच्या दिवशी कोणीही गरीब किंवा गरजू दारातून रिकाम्या हाताने परत जाणार नाही हे नक्की पहा.
– लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करणे टाळा. असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होईल.
– गणेश-लक्ष्मीची पूजा करताना ज्याची सोंड उजव्या बाजूला आहे अशा गणेशाची मूर्ती ठेवू नका.
– घरामध्ये फटाके वाजवू नका.
– दूध, दही आणि त्यांपासून बनलेल्या पदार्थांचे दान करू नये
– दिवाळीत मिठाचे दान करू नये
– दिवाळीत हळद देऊ नये
– दिवाळीत संध्याकाळी साखर देऊ नये
– लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये.
(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)