साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा दिवस म्हणून दिवाळी पाडव्याला महत्व आहे. यादिवशी प्रत्येक ठिकाणी विविध पद्धतीने पूजा केली जाते. आजच्या दिवसाला व्यापारीवर्गामध्ये देखील मोठे महत्व आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते. मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे.
बलिप्रतिपदेची पूजा २ नोव्हेंबर २०२०४ रोजी आहे. प्रतिपदा तिथी शुक्रवार, ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल. प्रतिपदा तिथीची समाप्ती २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०८ वाजून २१ मिनिटांनी होईल.
पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हणतात. तसेच असूराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा होता. दानशूरात अग्रेसर होता. त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला. लक्ष्मीला दासी केले. देवांचे स्वातंत्र्य हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली.
प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे तीन पावले मावतील, एवढ्या जमिनीची याचना केली. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू, असं विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव, असं वामनाला सांगितलं. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका केली, व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडलं. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर, ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला.
पुराणांत असं सांगितलं आहे की, आश्विनी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता असेल, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरूष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतील, त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं.
वामनाने जेव्हा तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं, तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला की, ‘तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील.’ कृष्णाने बळीराजास असा आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा साजरा करण्याचा प्रघात पडला.
कालभैरवाची पूजा
कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी लहान मुले मीठ घेऊन गावात विक्री करण्यासाठी फिरतात. नूतन वर्षारंभी शुभशकून म्हणून लोक त्यांच्याकडून मीठ खरेदी करतात. ही प्रथा विशेषत: गुजरातमध्ये जास्त करून आढळते. बलिप्रतिपदा, पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. काही कुटुंबात बलिप्रतिपदे दिवशी कुळधर्म असतो. काही घरांमध्ये या दिवशी पुरुष दैवत नवरात्र सुरु होते. हे नवरात्र देवी नवरात्राप्रमाणे साजरे केले जाते.