Home » आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गुप्तहेराची चर्चा

आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गुप्तहेराची चर्चा

by Team Gajawaja
0 comment
Undercover
Share

गुप्तहेरांची (Undercover) दुनिया वेगळी असते. ते सर्वांना ओळखतात…पण त्यांना स्वतःची ओळख नसते. अनेक नावांनी त्यांना ओळखण्यात येते.  ही दुनियाच रोमांचकारी असते.  त्यामुळे सर्वसामान्यांना या गुप्तहेरांबाबत कायम उत्सुकता लागून असते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच एका गुप्तहेराची चर्चा रंगली आहे.  ही गुप्तहेर महिला असून अमेरिकाविरोधी गुप्तहेरी (Undercover) करण्याच्या आरोपाखाली ती तुरुंगात होती.  ही महिला म्हणजे, अॅना मॉन्टेस….

अमेरिकेने शीतयुद्ध काळातील गुप्तहेर (Undercover) अॅना मॉन्टेस 20 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सोडले आहे. अॅना मॉन्टेस ही डबल एजंट म्हणून काम करत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. क्युबाची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेने तिला गुप्तचर (Undercover) म्हणून नेमले होते.  मात्र अॅनाने स्वतःच्या देशाविरुद्ध काम केल्याची माहितीही पुढे आली होती. याच प्रकरणात अॅना मॉन्टेसला 20 वर्षाचा तुरुंगवास झाला. आता हीच अॅना तुरुंगाच्या बाहेर आल्यावर तिच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.  2001 मध्ये जेव्हा अॅनाला पकडण्यात आले तेव्हा अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिला ‘मोस्ट डेडली’ वुमन म्हटले होते. अॅनानं आपल्या पर्समध्ये काही गुप्त माहिती कोड रुपात लपवून ठेवल्याचा आरोप तेव्हा ठेवण्यात आला होता. अॅनाला पकडल्यावर तिच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.   क्युबाला अमेरिकन अधिकाऱ्यांची माहिती दिल्याची कबुली तिनं थेट कोर्टात दिली आहे.  तिने ज्या अमेरिकन अधिका-यांची माहिती क्युबाला दिली,  त्यामुळे  क्युबातील अमेरिकन ऑपरेशनचे लक्षणीय नुकसान झाल्याची माहिती आहे.  

अॅनाला डीआयए अधिकारी ख्रिस सिमन्स यांनी पकडले होते.  त्यांनी तिचा उल्लेख डेडली वुमन असा केला आहे.  डबल एजंट म्हणून अनेकांनी काम केले आहे.  पण अॅना या सर्वात खतरनाक असल्याचे तिला पकडलेल्या अधिका-यांनी सांगितले आहे.  क्युबासाठी काम करत असताना अमेरिकेने अॅनाला अनेक वेळा बढती दिली आहे. उत्तम काम केल्याबद्दल तिला पुरस्कारही देण्यात आला. अमेरिकेत तिच्यासोबत काम करणारे लोक तिला क्युबाची राणी म्हणत असत.  अॅनाची बुद्धीमत्ता तिव्र होती.  त्यामुळे ती अनेक कोड लक्षात ठेवायची.  नंतर या कोडमधील माहिती आपल्या पर्समध्ये  विशिष्ट कोडमध्ये लिहून ठेवायची.  ही पर्स आणि हे कोड मिळाल्यावर त्यांची फोड करण्यासाठीही अमेरिकेतील गुप्तचर (Undercover) अधिका-यांनी खूप मेहनत करावी लागली.  अमेरिकेची फसवणूक करणारा कोणी एजंट एकदा क्युबाला गेला असल्याची माहिती एफबीआयकडे आली.  यानंतर अनाची फाईल अमेरिकेच्या गुप्तचर अधिका-यांनी ओपन  केली.  क्युबाला गेलेल्या लोकांच्या यादीत अॅनाचे नाव पाहिल्यावर अमेरिकेच्या अधिका-यांनी तिच्यावर पाळत ठेवली.   त्यावेळी त्यांनी तिच्या दुहेरी गुप्तहेराच्या भूमिकेबाबत कळले.  अॅनाला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या 10 दिवस आधी, 9 सप्टेंबर 2011 रोजी अटक करण्यात आली.

तिच्याबदद्ल अनेक माहिती पुढे आली आहे.  सीएनएनच्या रिपोर्टनुसार, वयाच्या 20 व्या वर्षी अॅना मॉन्टेसला यांनी केवळ अमेरिकाच नाही तर जगाच्या राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली.  अॅनाने 1985 मध्ये यूएस डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  या काळात तिला हेरगिरी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  अॅनाला अमेरिकन गुप्तहेर (Undercover) विभागात सहजपणे प्रवेश मिळाला.  कारण तिच्या वडीलांनी अमेरितेच्या सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे.  एक सच्चा देशभक्त म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता.  त्यांची मुलगी म्हणून अॅनाला कायम काम करतांना सूट मिळाली  आणि तिनं त्याचाच जास्त फायदा घेतला.  अमेरिकेचा शत्रू राष्ट्र असलेल्या क्युबासाठी तिनं अमेरिकेत राहून काम केलं.  अॅनाचा भाऊ टिटो आणि बहीण लुसी हे अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) कर्मचारी होते. टिटो एफबीआयचा विशेष एजंट होता आणि बहीण लुसी दीर्घकाळ एबीआयमध्ये भाषा विश्लेषक आणि अनुवादक होत्या. विशेष म्हणजे, अॅनाबद्दल माहिती मिळाल्यावर तिला पकडण्यासाठी तिची बहीण लुसीने महत्त्वाची भूमिका बजावली.  अॅनाचा प्रियकर रॉजर कॉर्नेटो हा क्यूबन प्रकरणांमध्ये विशेष गुप्तचर (Undercover) अधिकारी म्हणून पेंटागॉनसाठी काम करत होता. या सगळ्यांना अॅनाच्या भूमिकेनं जबर धक्का बसला होता. अटकेनंतर  अॅनावर 4 अमेरिकन हेरांची ओळख उघड करण्याचा आणि क्यूबाला अत्यंत गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप होता. यासाठी तिला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.  शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांनी तिच्यावर संपूर्ण देशाला गंभीर धोक्यात आणल्याचा आरोप केला.

======

हे देखील वाचा : RBI कडून बँक लॉकरच्या नियमांत बदल

======

अॅनावर दिवंगत क्यूबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांच्या विचारांचा प्रभाव होता.  16 वर्षांपासून ती फिडेल कॅस्ट्रोची निष्ठावंत म्हणून काम करत होती.  फिडेल कॅस्ट्रो यांना मारण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर (Undercover) संस्थेने तब्बल 638 वेळा कट रचल्याची माहिती आहे. पण हा कट कधीच यशस्वी झाला नाही.  प्रत्येकवेळी आश्चर्यकारकरित्या कॅस्ट्रो वाचले आहेत.   आता अॅना तरुंगाबाहेर आली आहे.  तिचे आता वय 65 च्या पुढे आहे.  6 जानेवारी 2023 रोजी तुरुंगातून तिची सुटका झाली.  चांगल्या वागणुकीमुळे तिला फोर्ट वर्थ येथील फेडरल जेलमधून सोडण्यात आले. मात्र, सुटकेनंतरही तिच्यावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे.  अटक होण्यापूर्वी अॅना वॉशिंग्टन डीसीच्या क्लीव्हलँड पार्कमध्ये दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होती.  आता सुटकेनंतर ती तिथेच रहाणार आहे.  मात्र तिच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकन गुप्तचर खात्याची नजर रहाणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.