हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या श्याम बेनेगल यांचे आज २३ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे निधन झाले. बेनेगल हे मागील काही दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते.
श्याम बेनेगल यांनी मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात सायंकाळी ६.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी २४ डिसेंबर २०२४ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्याम बेनेगल बऱ्याच काळापासून क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. बेनेगल यांना हिंदी सिनेसृष्टीतील कलात्म चित्रपटाचे जनक देखील मानले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणाऱ्या श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे मोठे नुकसान झाले आहे.
श्याम बेनेगल यांनी नुकताच १४ डिसेंबर रोजी त्यांचा ९०वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांनी मिळून श्याम बेनेगल यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यामध्ये अभिनेता नसिरुद्दीन शाह, दिव्या दत्ता, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, राजत कपूर, अतुल तिवारी, शशी कपूर, कुणाल कपूर आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते.
श्याम सुंदर बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अर्थशास्त्रात M.A केल्यानंतर ते फोटोग्राफी करू लागले. कॉपी रायटर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अंकुर’ हा पहिला चित्रपट बनवण्यापूर्वी त्यांनी ॲड एजन्सीसाठी अनेक ॲड फिल्म्स बनवल्या होत्या. चित्रपट आणि जाहिराती बनवण्यापूर्वी श्याम कॉपी रायटर म्हणून काम करायचे.
पुढे श्याम बेनेगल यांनी १९७४ साली त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांचा ‘अंकुर’ नावाचा पहिला दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांच्या या पहिल्याच दिग्दर्शित सिनेमाला सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
१९८६ मध्ये त्यांनी टीव्ही जगतात देखील प्रवेश केला. त्यांनी स्वतःची ‘यात्रा’ नावाची मालिका दिग्दर्शित केली. ही मालिका देखील खूप गाजली. समांतर सिनेमा दिग्दर्शित करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते. जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावर माहितीपट बनवण्याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी ‘यात्रा’, ‘कथा सागर’ आणि ‘भारत एक खोज’ या मालिकांचे दिग्दर्शनही केले.
श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’, ‘मंथन’, ‘जुनून’, ‘आरोहण’ या चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. बेनेगल यांनी ‘महाभारत’ या संकल्पनेवर दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला कल्ट सिनेमा मानला जातो.
श्याम बेनेगल यांनी ‘सरदारी बेगम’, ‘झुबैदा’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो’, वेलकम टू सज्जनपूर, ‘वेल डन अब्बा’, ‘त्रिकाल’, ‘मंडी’, ‘जुनून’ त्यांचे हे सिनेमे कमालीचे गाजले. त्यांच्या चित्रपटांमधून अभिनय करत बॉलीवूडला अनंत नाग, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील आदी दिग्गज कलाकार मिळाले.
=======
हे देखील वाचा : ड्रोन की युएफओ अमेरिकेत खळबळ !
=======
श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर, सत्यजित रे, आणि द मार्केटप्लेस या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना ८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
श्याम बेनेगल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले. त्यांना त्यांच्या योगदानासाठी अतिशय मोठा आणि प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळवले होते. त्यांना १९७६ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९१ मध्ये भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.