बॉलिवूडमध्ये काम मिळवणे आणि यशस्वी होणे हे अनेकांचे स्वप्न असते. मुंबई नावाच्या मायानगरीमध्ये अनेक जणं सिनेसृष्टीमधे काम मिळवण्याच्या उद्देशाने येतात. मात्र यातले अगदी मोजकेच यशस्वी होतात. या क्षेत्रात येणे, काम करणे आणि यश संपादित करणे हे तुमच्या प्रयत्न, मेहनत यासोबतच नशिबावर देखील अवलंबून असते. आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, जे सुपरस्टार हे बिरुद मिरवताना दिसतात.
मात्र अगदी सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये सुपरस्टार म्हणून ओळख मिळवलेले एकच अभिनेते होते. आणि ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही राजेश खन्ना. बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार म्हणून आजही राजेश खन्ना यांचे नाव घेतले जाते. त्यांनी बघितलेले स्टारडम, यश, लोकांचे प्रेम हे आजही कोणत्याही कलाकाराला मिळवता आलेले नाही. मात्र असे असूनही राजेश खन्ना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अमाप गाजले. सांभाळता येणार नाही एवढे यश पदरात असलेल्या राजेश खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक गंभीर, त्रासदायक गोष्टी होत्या. ज्यामुळे ते सतत चिंतेत असायचे.
राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले. अभिनेता राजेश खन्ना यांनी डिंपल यांना लग्नासाठी प्रपोज केले आणि त्यानंतर डिंपल यांचा पहिला सिनेमा ‘बॉबी’ रिलीज झाला. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश खन्ना आणि डिंपल त्यांनी लग्न केले. तर 17 व्या वर्षी डिंपल या एका मुलीची आई देखील झाल्या. मुलगी आणि संसारासाठी डिंपल यांनी करियरमधून ब्रेक घेण्याचे ठरवले. पहिलाच सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र डिंपल यांच्या या निर्णयाने अनेकांना मोठा धक्का बसला.
डिंपल कपाडिया यांनी सुपरस्टार राजेश खन्ना आणि मुलगी ट्विंकल यांच्यासाठी आपल्या करिअरला ब्रेक दिला. यानंतर डिंपल कपाडियांनी तब्बल 10 वर्षानंतर हिंदी सिनेमात कमबॅक केला. त्यांनतर डिंपल यांनी अनेक मोठे आणि हिट सिनेमे केले. ८० च्या दशकातील जवळपास सर्वच हिट अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. डिंपल यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या कठीण प्रसंगांचा सामना केला. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही.
त्यांचा हा संघर्ष त्यांची मुलगी अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने जवळून पाहिला आहे. तिने तिच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी तिच्या आईवडिलांच्या वेगळे होण्याबद्दल भाष्य केले होते. ट्विंकलने देखील तिच्या आई वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत अभिनयात पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर तिने तिचा मोर्चा लिखाणाकडे वळवला. आता ती एक उत्तम लेखिका म्हणून ओळखली जाते.
ट्विंकलने तिच्या आईवडिलांचे स्टारडम पाहिले, लोकांचे त्यांच्यावरील प्रेम पाहिले, यश पाहिले आणि मुख्य म्हणजे त्यांना वेगळे होताना पाहिले. लग्नानंतर केवळ १० वर्षातच ते वेगळे झाले. याबद्दल एका पुस्तक प्रश्नाच्या कार्यक्रमामध्ये ट्विंकल आणि डिंपल यांनी त्यांचे मन मोकळे केले होते. यावेळी डिंपल यांनी देखील त्यांचे आणि राजेश खन्ना यांचे नाते कसे बिघडले हे देखील सांगितले.
डिंपल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की “मला वाटते की मी आणि राजेश दोघे वेगळ्या प्रकारच्या व्यक्ती होतो. मात्र हे समजून घेण्यासाठी मी तेव्हा खूप लहान आणि तरुण होते. नक्की राजेश हा कोणत्या प्रकारचा पुरुष आहे. जी व्यक्ती सुपरस्टार राहिली आहे, त्याचे करिअर खाली खाली का जाते? मला स्टार्स वगैरे विषयी तर नाही माहित आणि मानतही नाही. पण माझ्यासाठी राजेशला अशा परिस्थितीत समजून घेणे कठीण होते.”
पुढे डिंपल यांनी सांगितले, “माझ्यासाठी राजेशसोबत राहणे दिवसंदिवस कठीण होत चालले होते. ते लग्न माझ्यासाठी खूप ट्रॉमॅटिक झाले होते. जेव्हा त्यांनी माझ्याशी लग्न केले तेव्हा ते त्यांच्या करिअरच्या पीकवर होते. मात्र लग्नानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली आणि ही गोष्ट त्याला स्वीकारताच येत नव्हती. त्यामुळे त्यांनी आमचे वैवाहिक आयुष्य खराब केले. त्याची पत्नी असणे माझ्यासाठी त्रासदायक बनले होते.”
=======
हे देखील वाचा : बिग बॉसमधून योगिता आणि निखिल पडले बाहेर
=======
ट्विंकल खन्नाने याबद्दल सांगितले की, “मी जे काही लिहिते, ते महिलांविषयी असते ज्या महिला या जगात त्यांचे स्थान शोधत असतात. एक स्त्री काय आहे आणि तिने कसे असायला पाहिजे याविषयी लिहीत असते. कुठे ना कुठे माझ्या डोक्यात ही सिंग्युलर इमेज आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आजीच्या घरी जायचो. आम्ही सगळे एकाच खोलीत राहायचो. मी, माझी बहीण जमिनीवर गादी टाकून झोपायचो.”
“त्यावेळी माझ्या आईची शिफ्ट 3 ची असायची. आणि ती 9 वाजता घरी यायची. तरी सुद्धा कधी तक्रार करत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचे. माझ्यासाठी त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट होती की एका महिलेला कोणावर अवलंबून राहण्याची गरजच भासायला नको. पुरुष ठीक आहे, त्यांच्यासोबत राहणं ठीक आहे. पण त्यांच्यावर अवलंबून राहाणे चुकीचे आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व्हायलाच पाहिजे.”