कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस सण साजरा केला जातो. दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लोकं लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि भगवान गणेशाची पूजा करतात. सोबतच आजच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिन देखील साजरा केला जातो. धन्वंतरी देव यांना आयुर्वेदाचे जनक समजले जाते. धनत्रयोदशी ही तिथी किंवा हा दिवस अतिशय शुभ समजला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक प्रकारच्या खरेदी केल्या जातात.
धनत्रयोदशी किंवा धनतेरस दोन शब्दांपासून बनलेली आहे, पहिला शब्द ‘धन’ म्हणजे संपत्ती आणि दुसरा ‘तेरस किंवा त्रयोदशी’. हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास त्याचे १३ पट अधिक फळ मिळते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवीन भांड्यांचीही खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करावी? जाणून घेऊया
जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर धनत्रयोदशीला तुम्ही अख्खे धने खरेदी करू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. धनत्रयोदशीला धने आणि खडीसाखरीचाच नैवेद्य दाखवला जातो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा. या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे झाडू खरेदी देखील शुभ आणि लाभदायक मानली जाते.
याशिवाय धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे फलदायी मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते. सोबतच तुम्ही चांदी, हिऱ्याची देखील खरेदी करू शकतात. यादिवशी सोने चांदी खरेदी केल्याने भरभराट होते अशी मान्यता आहे. धनत्रयोदशीला तुम्ही वाहन खरेदी करू शकता. धनत्रयोदशीला वाहन खरेदी करणे शुभ असते. आजच्या दिवशी जमीन किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार केल्यास सुख-समृद्धी वाढते. तुम्हाला तुमच्या घरातील सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर धनत्रयोदशीला कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र खरेदी करू शकता.
यासोबतच आजच्या आधुनिक काळात लोक टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज, एसी आणि इतर मशीन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील खरेदी करतात. यासोबतच मीठ खरेदी करणे देखील लाभदायक समजले जाते.
==========
हे देखील वाचा : धनत्रयोदशीला पूजा केले जाणारे धन्वंतरी आहे कोण?
==========
धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये?
धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या दिवशी काळे कपडे, लोखंडी, प्लॅस्टिक पासून बनवलेल्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू आदी गोष्टींची खरेदी करू नये. या दिवशी शनी, केतू आणि राहूशी संबंधित वस्तू खरेदी करणे टाळावे. या दिवशी चाकू, कात्री, सुया यासह कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी कृत्रिम दागिने खरेदी करू नयेत. या दिवशी तेल किंवा तेलाचे पदार्थ जसे तूप, रिफाइंड इत्यादी आणण्यास मनाई आहे.