नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याबद्दल इंडिगोला (Indigo) 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, त्यांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, एअरलाइन्सच्या कर्मचार्यांनी मुलाशी वाईट वागणूक दिल्याने प्रकरण वाढले.
भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, “जर हे प्रकरण सहानुभूतीने हाताळले गेले असते, तर प्रकरण इतके वाढले नसते की प्रवाशांना बोर्डिंग नाकारले गेले असते.”
नागरी विमान वाहतूक नियमांनुसार वागले नाही
डीजीसीएने म्हटले आहे की विशेष परिस्थितीत चांगला प्रतिसाद आवश्यक आहे. परंतु एअरलाइन्सचे कर्मचारी परिस्थिती हाताळू शकले नाहीत आणि नागरी उड्डाण नियमांची भावना राखण्यात अयशस्वी झाले.
घटनेबद्दल संताप
विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफने दिव्यांग मुलाला बोर्डिंगपासून थांबवल्याच्या वृत्ताने प्रचंड संताप व्यक्त केला. या निर्णयावर चौफेर टीका होत होती, त्यानंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने त्याची दखल घेत चौकशी सुरू केली. रांची-हैदराबाद फ्लाइटमधील प्रवासी मनीषा गुप्ता यांनी मुलाची आणि त्याच्या पालकांना ग्राउंड स्टाफकडून त्रास होत असल्याची कथा सांगितली तेव्हा ही बाब उघडकीस आली.
सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल
मनीषा गुप्ता यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, इंडिगोचे मॅनेजर मुलाची प्रकृती स्थिर नसल्याबद्दल सतत ओरडत होते. विमानात बसलेल्या अनेक प्रवाशांना पीडितेच्या कुटुंबाला मदत करायची होती आणि त्यांनी मॅनेजरला विमानात बसू देण्याची विनंती केली पण त्यांचे ऐकले नाही.
====
हे देखील वाचा: मुंबईहून पुण्याला प्रवासी अवघ्या 90 मिनिटांत पोहचणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम होणार लवकरच पुर्ण
====
इंडिगोच्या सीईओचे विधान
ही घटना उघडकीस आल्यानंतर इंडिगो एअरलाइनचे सीईओ रॉनजॉय दत्ता म्हणाले की, बोर्डिंगच्या वेळी मूल घाबरले होते आणि त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करावी लागली. त्याच वेळी, विमान कंपनीने सांगितले होते की कुटुंबाला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यात आले.