Home » दिल्लीची पंजाबवर सरशी

दिल्लीची पंजाबवर सरशी

by Team Gajawaja
0 comment
PBKS vs DC
Share

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपीटल्स (PBKS vs DC) यांच्यादरम्यान रंगलेल्या सामन्यात रायली रुसो ( ३७ चेंडूत ८२ धावा ), पृथ्वी शॉ ( ३८ चेंडूत ५४ धावा ) आणि डेव्हिड वॉर्नर ( ३१ चेंडूत ४६ धावा ) यांच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने पंजाब किंग्सवर १५ धावांनी मात करत विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजी करतांना दिल्लीच्या सलामीवीरांनी विस्फोटक फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. ९४ धावांची सलामी दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर माघारी परतला. वॉर्नरच्या विकेटचे दडपण न घेता पृथ्वीने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. आपल्या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला.(PBKS vs DC)

दोनही सलामीवीर माघारी परतल्यानंतर मात्र रायली रुसोने सर्व सूत्र आपल्या हातात घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिल साल्टने १४ चेंडूत २६ धावांची खेळी करत त्याला योग्य साथ दिली. फलंदाजांच्या उत्तम प्रदर्शनामुळे दिल्लीचा संघ २ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारू शकला. पंजाबकडून फक्त सॅम करणलाच बळी मिळवण्यात यश मिळाले. त्याने ४ षटकात ३६ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले.

दिल्लीने दिलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करायला उतरलेल्या पंजाबची सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. कर्णधार शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. अनुभवी इशांत शर्माने पहिल्याच चेंडूवर त्याला झेलबाद केले. त्यानंतर प्रभसिमरण सिंगने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु २२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याला आपला बळी गमवावा लागला. पंजाबचे दोन्ही सलामीवीर आता पव्हेलीयन मध्ये परतले होते.(PBKS vs DC)

त्यानंतर मात्र युवा अथर्व तायडे आणि विस्फोटक फलंदाज लिव्हींगस्टोन यांनी फटकेबाजी करत संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी अथर्व तायडेने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या तर गोलंदाजांना धारेवर धरत लिव्हींगस्टोनने ४८ चेंडूत तब्बल ९४ धावा ठोकल्या. अनुभवी इशांत शर्माच्या चेंडूवर झेलबाद झाल्यामुळे त्याला आपल्या वैयक्तिक शतकाला मुकावे लागले. पंजाबच्या खालच्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याने पंजाबचा संघ लक्षापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दिल्लीकडून इशांत शर्माने शानदार कामगिरी करत ३ षटकात ३६ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. त्याचबरोबर संघाचा स्टार गोलंदाज नॉर्खीयानेसुद्धा ४ षटकात ३६ धावा देत २ बळी मिळवले. अक्सर पटेल आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्यांना योग्य साथ दिली.(PBKS vs DC)

======

हे देखील वाचा : पाकिस्तानी क्रिकेटर आणि त्यांचे विषारी बोल…

======

गुणतालिकेत अनुक्रमे आठवे आणि नववे स्थान पटकावणाऱ्या पंजाब आणि दिल्लीचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. १३ सामन्यांत ६ विजयांसह पंजाबचे १२ गुण आहेत तर १३ सामन्यात ५ विजयांसह दिल्लीचे १० गुण आहेत. स्पर्धेतील चुरस लक्षात घेता प्लेऑफसाठीचा मार्ग अजून खडतर होणार आहे. आतापर्यंत गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे तर चेन्नई दुसऱ्या, लखनऊ तिसऱ्या आणि मुंबई चौथ्या स्थानी विराजमान आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.