भारतीय महिला क्रिकेटच्या विश्वात काल-परवा काही खास गोष्ट झाली. भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्माने ( Deepti Sharma) इंग्लंडच्या फलंदाजाला अनोख्या पद्धतीने धावबाद केले. दिप्तीने मंकडिंग पद्धतीनं ही विकेट घेतली. ही विकेट घेतल्यावर प्रतिस्पर्धी संघ, इंग्लडनं दिप्तीवर टिका केली. ही चिटिंग असल्याचा भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आणि भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांनी दिप्तीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. हे सर्व होत असतांना मंकडिग पद्धती आणि अमिर खानचा चित्रपट लगान या सर्वाबाबत सोशल मिडीयावर मिम्सची एकच लाट आली आहे.
वास्तविक 2017 मध्ये मंकडिंगचा नियम करण्यात आला होता. या नियमानुसार, गोलंदाजाला नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला धावबाद करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु त्याआधी चेंडूचा पूर्ण अंदाज घ्यावा. त्यावेळी गोलंदाज नॉन-स्ट्रायकरला धावबाद करण्यात अयशस्वी झाल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करतील, अशीही अट ठेवण्यात आली.
क्रिकेटच्या इतिहासात मंकडिंगची पहिली घटना 13 डिसेंबर 1947 रोजी घडली होती. भारतीय खेळाडू विनू मंकडने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राऊनला अशाच पद्धतीने धावबाद केले होते. त्यावेळी विनू मंकड यांच्यावरही जोरदार टीका झाली होती, पण ऑस्ट्रेलियन कर्णधार डॉन ब्रॅडमन यांनी मंकडच्या कृतीचे समर्थन केले होते. त्यानंतर मंकड यांच्याच नावावरून अशा पद्धतीनं खेळाडूला बाद केल्यास ‘मंकडिंग’ हे नाव देण्यात आले.
आता या मंकडिंगचा वापर महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झालाय आणि तोही भारतीय खेळाडूकडून. दिप्ती शर्माने घेतलेल्या बळीमुळे नवा वादही निर्माण झाला. ज्या खेळाडूला बाद केले ती खेळाडू, शार्लोट डीन. मंकडिंगच्या नियमानं आऊट झालेल्या शार्लोट डीनला मैदानातच रडू कोसळले आणि इंग्लिश मिडीयामध्ये भारताच्या खेळाडूंवर टिकेचा पूर आला. मात्र भारतीय कप्तान हरमनप्रित कौरनं दिप्तीच्या खेळाला पाठिंबा दिला. हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही वेगळे काही केले आहे, असे मला वाटत नाही, असे तिनं स्पष्ट केलं.
भारताने इंग्लडला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडच्या 153 धावा झाल्या होत्या. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीनने 80 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. पण भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने (Deepti Sharma) चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनला धावबाद केले. या सामन्यात भारत विजयी झाला आणि इंग्लडला शार्लोटच्या आऊट होण्यात चिटींगचा अनुभव येऊ लागला. भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. मालिका जिंकली. पण या विजयापेक्षा लॉर्ड्सवर मंकडिंगची चर्चा जास्त झाली.
दिप्तीने शार्लोटला बाद केल्यानंतर शार्लोटनं मैदानातच रडायला सुरुवात केली. यावरुन भारतीय क्रिकेटप्रेमींना अमिर खानच्या लगानची आठवण झाली. मग काय सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊसच सुरु झाला. दिप्तीनं लगानचा बदला घेतला म्हणत अनेकांनी भन्नाट मजेशीर मीम्स बनवले. यामध्ये अशाप्रकारे विकेट घेतलेल्या रविचंद्रन आश्विनचे फोटोही वापरण्यात आले आहेत.
=========
हे देखील वाचा : राजा विक्रमादित्यने ११ वेळा शीर कापून देवीच्या चरणावर ठेवले होते, जाणून घ्या ‘या’ अनोख्या मंदिराची कथा
==========
भारतीय गोलंदाज दिप्ती शर्मावर इंग्लडच्या मिडीयामध्ये झालेल्या टिकेला मग भारतीय क्रिकेटपटूनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. यात विरेंद्र सेहवागही मागे नाही. दिप्तीच्या तत्पर खेळाचे कौतुक करत सेहवागने दिप्तीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. विरेंद्र सेहवागने ट्वीट करत, इंग्लिश खेळाडू हरल्यावर रडतायत हे पाहून गंमत वाटत असल्याचे ट्विट केलंय, सेहवागने दिप्तीच्या टीकाकारांचे काही स्क्रिनशॉटही आपल्या ट्विटमध्ये जोडले आहेत.
त्यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना पाठिंबा देणाऱ्या बर्मी आर्मी या ग्रुपने दिप्ती शर्माने (Deepti Sharma) जे केलं, त्याला क्रिकेट म्हणत नाहीत, अशी भावना व्यक्त केली. यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी दिप्तीनं विकेट घेतलेला क्षण पुन्हा रिट्विट करत दिप्तीने केले ते खेळाला धरुनच असल्याचे सांगितले आहे. काहींनी तर इंग्लडच्या संघाला आणि क्रिकेट चाहत्यांना पराभवचा स्विकार करायची सवय करा, असा सल्लाच दिला आहे. एकूण काय दिप्ती शर्मामुळे सोशल मिडीयावर मंकडिंग आणि विनू मंकड यांची चर्चा रंगली आहे.
– सई बने