Home » गटारी नव्हे , ही आहे दिव्याची अमावास्या… 

गटारी नव्हे , ही आहे दिव्याची अमावास्या… 

by Team Gajawaja
0 comment
Gatari amavsya
Share

यावर्षी गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी आषाढ अमावास्या आहे. त्यानंतर शुक्रवार २९ जुलैपासून शनिवार २७ ॲागस्ट २०२२ पर्यंत पवित्र श्रावणमास येत आहे.(Gatari amavsya)

आषाढ अमावास्येला ‘दिव्याची अमावास्या’ असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया घरातील दिवे घासून – पुसून एकत्र मांडतात, त्यांच्या भोवती रांगोळी घालतात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात. दीपपूजन केल्याने धन धान्य व लक्ष्नी प्राप्त होते अशी लोकांची श्रद्धा आहे. प्राचीनकाळी विद्युत दिवे नव्हते पावसाळयात घरात जास्त अंधार होतो, घरातील दिवे सुस्थितीत असावेत, त्यांची देखभाल केली जावी म्हणून कदाचित हे सांगण्यात आले असावे. दिव्याच्या ज्योतीला केलेली ही प्रार्थना तुम्हाला नक्कीच माहीत असेल.


“ शुभं करोति कल्याणं , आरोग्यं धनसंपद: ।
शत्रुबुद्धि: विनाशाय , दीपज्योति: नमोस्तुते ॥


“‘हे दीपज्योती, तुला नमस्कार असो. तू आमचे शुभ आणि कल्याण कर. आम्हाला आरोग्य आणि धनसंपत्ती प्राप्त करून दे आणि आमच्यातील शत्रुत्वाची ( वैरभावना ) बुद्धी नाहीशी कर.” अर्थात दिव्यातील ज्योतीपासून प्रेरणा घेऊन या सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठी आपल्यालाच करावयाच्या आहेत. उपनिषदात ऋषीनी केलेली एक सुंदर प्रार्थना आहे (Gatari amavsya)

“असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ॥ मृत्योर्मा अमृतं गमय ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति : ॥”


मला असत्याकडून सत्याकडे ने. मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने. मला मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. आम्हाला अध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभोतिक अशी शांती लाभू दे.” ऋषींनी त्याकाळात ईश्वराकडे ही प्रार्थना केली होती. हा ईश्वर बाहेरचा नसून आपल्यामधील चैतन्य म्हणजे आत्मारूपी ईश्वरच आहे. आपणच आपल्याला असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे नेत असतो. आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असतो. या कलियुगात आपणच आपलं जीवन घडवीत असतो किंवा बिघडवीत असतो. भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात, ध्यानयोगात भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे

                             उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्।
                             आत्मेव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ॥

“मनुष्याने स्वत:च स्वत:चा उद्धार करावा. आपला नाश आपण करून घेऊ नये. कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू असतो.” दीप हा आपणास अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करण्यास सांगत असतो. त्या प्रवासाबरोबरच आपणास अज्ञानाकडून ज्ञानाकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे, गरीबीतून समृद्धीकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अनीतीकडून नीतीकडे, व्यसनाधीनतेकडून निर्व्यसनीपणाकडे, अंधश्रद्धांकडून वैज्ञानिक जीवनशैलीकडे प्रवास करावयाचा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास बाहेरची ईश्वरी शक्ती घडवीत नसते. आपणच हा प्रवास योग्य दिशेने अथक परिश्रम करून करावयाचा असतो. यासाठी आपणच आपल्या जीवनाचे ‘दीप’ व्हायचे असते. आपणच दीपगृह बनून आपल्या जीवन नौकेला मार्ग दाखवायचा असतो.(Gatari amavsya)

अनेक कवी आणि गीतकारांनी दिव्यासंबंधी अनेक कविता व गीते लिहीली आहेत. शंकर रामाणी यांनी रचना केलेले आणि पं. जितेंद्र अभिषेकी किंवा पद्मजा फेणाणी यांनी गायलेले भावगीत मला खूप आवडते. ती म्हणजे, “दिवे लागले रे , दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले..”

====

हे देखील वाचा – पुणे शहरातील ‘हॉंटेड’ जागा; हे पिकनिक स्पॉटही आहेत हॉंटेड

====

गटारी अमावास्या


खरे म्हणजे आषाढ अमावास्या ही दीप पूजनाची अमावास्या! परंतु काही लोक या अमावास्येस ‘गटारी अमावास्या’ म्हणूनही ओळखतात. कारण आषाढ अमावास्येनंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. श्रावण महिन्यात मद्यपान व मांसाहार वर्ज्य करण्यास सांगण्यात आलं आहे.

श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करायला मिळणार नसल्यामुळे मांसाहारी लोक आषाढ अमावास्येलाच मांसाहार करून घेतात. मद्यप्राशन करणारे मद्यपानही करून घेतात. या दिवशी अतिमद्यपान केल्याने काहीजण रस्त्यावर पडतात म्हणून कदाचित आषाढ अमावास्येस ‘गटारी अमावास्या’ असे म्हटले जात असावे.

श्रावण महिन्यात शेतीची बरीचशी कामे आटोपलेली असतात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. माणसे घरातच असतात. शरीराचे चलनवलन कमी होते. अशावेळी हलक्या आहाराची शरीरास जरूरी असते. मांसाहार केला तर अपचन होऊन शरीराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणून मांसाहार करू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच सतत घरात राहिल्याने मन:स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानेश्वरी, तुकाराराम गाथा, एकनाथी भागवत इत्यादी धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगण्यात आले आहे. मन, अंत:करण शुद्ध रहावे यासाठी व्यसनापासून दूर रहावे, असे सांगण्यात आले आहे.

पूर्वी मुंबईत अनेक कापड गिरण्या होत्या, लाखो कामगार रहात होते. त्यावेळी ‘गटारी अमावास्या’ हे शब्द जास्त बोलले जायचे. आता माझेच अनुभव मी तुम्हाला सांगतो.

गिरणगावची गटारी


मी व्यवसायाने टेक्सटाईल इंजिनीअर. मुंबईच्या व्ही. जे. टी. आय्. कॅालेजमधून टेक्सटाईल पदवी घेतल्यानंतर मफतलाल मिलमध्ये २५ वर्षे नोकरी केली. त्यामुळे गिरण कामगारांचे जीवन मी जवळून पाहिले आहे. त्याचवेळी मुंबई नगरीत ६० कापड गिरण्या चालू होत्या. त्यामध्ये सुमारे दोन-तीन लाख कामगार कापड गिरण्यांमधून काम करीत होते.

गिरणगावात गटारी अमावास्येचा विशेष माहोल असायचा हे खरे आहे. पण गिरणकामगार म्हणजे तो दारू पिणाराच असणार हा समज मात्र चुकीचा होता. कारण चांगल्या कामगारांची संख्याही तशी खूप मोठी होती. गिरणकामगारात व्यसनाधीनता येण्याची कारणेही तशीच होती.

गिरण कामगार हा जास्त शिकलेला नसायचा, त्यावेळी गिरण कामगारांचा पगारही त्यामानाने इतरांपेक्षा तसा खूप जास्त असायचा, गिरणीत कामाचा ताण खूप असायचा, घाम खूप यायचा, नाकातोंडात कापूस जायचा, रात्रपाळी करावी लागायची, शिवाय जागेच्या टंचाईमुळे बऱ्याच कामगारांची कुटुंबे त्यांच्याबरोबर नसायची.(Gatari amavsya)

कुटुंब गावी असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवायचा. .त्यामुळे आणि काही कामगारांना वाईट संगतीमुळे दारूचे व्यसन लागायचे.असे कामगार गटारी अमावास्येच्या दिवशी कामावर दांडी मारून ‘गटारी’ यथेच्छ साजरी करायचे. त्या दिवशी गटारीची म्हणून आणि दुसऱ्या दिवशी उताराची म्हणून प्यायचे. चपटीची सोबत असायची. चिंचेच्या झाडाखाली वावर असायचा. तिसऱ्या दिवशी लाजत, तोंड लपवीत ते कामावर यायचे.

बहुतेकांना गटारीसाठी कर्ज देणारे ‘सावकार’ गिरणीतच टपलेले असायचे. काही ठिकाणी कर्ज देणारे दंडुकाधारी पठाण गिरणीच्या गेट बाहेर असायचे . पगाराच्या दिवशी ते गेटवरच कर्ज घेणाऱ्या कामगारांकडून फक्त व्याज घ्यायचे. मुद्दलाचा ‘विषारी वृक्ष’ तसाच जिवंत ठेवायचे. त्यावेळी गिरण कामगारांना ‘कर्जमाफी’ देणारे कोणी मायबाप नव्हते. बेवड्या कामगारांना इतर गिरण कामगारांत प्रतिष्ठा नसायची.

कापड गिरणीत मोठ्या कष्टाचे काम असायचे. काही निर्व्यसनी कामगार दारू पिणाऱ्या कामगाराच्या गळ्यात तुळशीची किंवा रूद्राक्षाची माळ घालून त्याला सुधारण्याचाही प्रयत्न करायचे. पण त्यातले काही व्यसनाधीन सुधारण्याच्या अगदी पलिकडे गेलेले असायचे. त्यांच्या कामावर बऱ्याच दांड्या असायच्या. अपूर्ण पगार मिळायचा. महिन्याचे खाणावळीचे बिल देण्यासाठी कर्ज काढायला लागायचे.

अशा कामगारांसाठी गटारीचा दिवस मात्र महत्वाचा असायचा. एक गोष्ट अतिशय महत्वाची असायची की हेच नशा करणारे बरेचसे कामगार संपूर्ण श्रावण महिन्यात दारूला स्पर्श करीत नसत. तेवढी त्यांची श्रद्धा ठाम असायची. पण हल्ली समाज बदलला आहे. माणूस आत्मकेंद्रित झाला आहे.(Gatari amavsya)

काही लोक आषाढ अमावास्येला गटारी साजरी करतात आणि पवित्र श्रावण मासही पाळीत नाहीत. त्यांना बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस सारखेच असतात. हे मात्र योग्य नाही. अर्थात या लोकांचा अपवाद सोडला तर बहुतेक सर्व लोक पवित्र श्रावण मासाचे पावित्र्य जपत असतात.

तेव्हा आपण सर्वांनी आषाढ अमावास्येला ‘गटारी अमावास्या’ न म्हणता ‘दिव्याची- दीपपूजनाची अमावास्या’ म्हणूया. या दिवशी दिव्यांच्या स्वच्छतेबरोबरच मनाची गटारे स्वच्छ करून सद् विचारांचे संवर्धन करूया. दीपपूजन करून सदाचाराचे आचरण करूया.

  • दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
    (dakrusoman@gmail.com)

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.