हिंदू धर्मातील आणि विशेषतः भारतातील सण वार पाहिले तर त्यात असणारे वैविध्य आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येक महिन्यात त्या महिन्याला, त्या महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा सण आपण साजरा करतो. त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य देखील खास असते. त्या त्या महिन्याची खासियत जाणून खानपान काय असावे?, पेहराव कसा असावा?, काय करावे?, काय करू नये? आदी सर्वच गोष्टी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवल्या आहेत.
इतकेच नाही तर एक महिना संपून दुसरा महिना सुरु होताना देखील एक छोटासा सण असतोच. किंवा काहीतरी दिनविशेष असतेच. आता दीप अमावास्याचेच पाहा. श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणार दिवस म्हणून दीप अमावस्या ओळखली जाते. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. आजच्या आधुनिक युगात या दिवसाला गटारी या नावाने ओळखले जाते हे आपले केवळ दुर्दैवच आहे.
दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावास्येने होते. किती सुंदर विचार आहे या सनामागचा. आजच्या अनेकांना या सणाबद्दल माहिती नसते. कारण हा दिवस बहुतेक लोकं मांसाहार करण्यात आणि दारू पिण्यात घालवतात आणि गटारी अमावस्या म्हणून साजरा करतात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून या सणाबद्दल माहिती देत तो कसा साजरा करतात हे सांगणार आहोत.
दीप अमावास्येच्या दिवशी दीप पूजन करून श्रावण महिन्याचे लख्ख प्रकाशात स्वागत केले जाते. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतिक आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी,तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीप पूजन केले जाते.
दीप अमावास्येच्या दिवशी घरातले सर्व दिवे घासून-पुसून स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते. या पाटाभोवती रांगोळी काढावी. सर्व दिव्याने प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते. कणकेचे गोड उकडलेले दिवे बनवतात. ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर पुढील श्लोक म्हणतात.
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || 3 ||
अधिराजा महाराजा वनराज वनस्पती |
इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् |
मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यविष्णुरुपिण: |
अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः ||
दीप अमावस्येचे महत्व :
दीप अमवास्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते. अनेक लोकं या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात तशी ही देखील जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा करतात. या दिवशी पित्र पूजा देखील केली जाते. अनेक जणं दीप अमावास्येला तर्पण करतात आणि पितरांना पुरणाचा नैवैद्य दाखवतात.
अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोकं करतात, पूजा करतात, दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. दीप अमावास्येला पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी आदी झाडांची रोपटे लावली जातात. या दिवशी माशांना पीठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात.
अनेक ठिकाणी दीप अमावास्येच्या दिवशी सायंकाळी ‘शुभंकरोती’ ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा. घरातील इडापिडा टळून, अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो.
यावर्षी दीप अमावस्या ही महाराष्ट्रात ४ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. श्रावण महिना ५ ऑगस्टला सुरू होत आल्याने आदल्या दिवशी ४ ऑगस्टला ही दीप अमावस्या साजरी होणार आहे.
दीपपूजनाची कथा :
एक नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला. उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की, रोज दिवे घासावेत, तेलवात करावी आणि स्वतः प्रज्ज्वलित करावे. खडीसाखरेने त्यांच्या ज्योति साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडीत झाला.
======
हे देखील वाचा : मंगळागौर पूजेचे महत्व, विधी आणि कथा
======
पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाट-माट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.
इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की, असे होण्याचे कारण काय? मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सूनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेणा पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. तिला दिवा पावला. जसा तिच्यावरील आळ टळला, तसा तुमच्या आमच्यावरील आळ टळो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.