Home » Alexei Navalny : बेडकाचे विष आणि एक गुढ मृत्यू

Alexei Navalny : बेडकाचे विष आणि एक गुढ मृत्यू

by Team Gajawaja
0 comment
Share

रशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी आर्क्टिक तुरुंगात निधन झाले. १९ वर्षांची शिक्षा भोगत असलेले नवलनी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक होते. रशियन सरकारमधील भ्रष्टाचारविरुद्ध त्यांनी जोरदार मोहीम सुरु केल्यानंतर त्यांना आर्क्टिक सारख्या रशियातील सर्वात खतरनाक अशा तुरुंगात टाकण्यात आले. याच नवलनी यांचा अचानक मृत्यू झाल्यावर त्याच्यामागे व्लादिमीर पुतिन यांचा हात असल्याची चर्चा सुरु झाली. पुतिन यांनी त्यांच्या विरोधकांना अतिशय निष्ठुरपणे संपवल्याची चर्चा होते, त्यात नवलनी यांच्या मृत्यूची भर पडली. नवलनी यांच्या अकस्मात झालेल्या मृत्यूनतंर त्यांच्या पत्नीनं आतंरराष्ट्रीय मंचावर आवाजही उठवला. मात्र यात त्यांना यश आले नाही. ( Alexei Navalny )

पण आता जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा अलेक्सी नवलनी यांच्या गुढ मृत्यूची चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि नेदरलँड्स या पाच युरोपीयन देशांनी यासंदर्भात एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात अलेक्सी नवलनी यांना एपिबेटिडाइन नावाचे प्राणघातक विष टोचण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे विष एका बेडकामध्ये असते. या बेडकाच्या विषामुळे व्यक्तीला श्वास घेता येत नाही आणि काही मिनिटांतच अर्धांगवायू होऊ शकतो. हेच विष नवलनी यांना देण्यात आल्याचे युरोपीन देशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करण्यासंदर्भात विचार चालू आहे.

रशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ वर्षभरानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. त्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि नेदरलँड्स या पाच युरोपीयन देशांनी पुढाकार घेतला आहे. या देशांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन नवलनी यांचा मृत्यू नैसर्गिक नसून राजकीय हत्या असल्याचा दावा केला आहे. या युरोपीनय देशांमधील शास्त्रज्ञांना नवलनी यांच्या शरीरामध्ये अत्यंत दुर्मिळ प्राणघातक अशा बेडकाच्या शरीरातील विषाचा अंश सापडल्याचाही दावा आहे. प्राचीन काळी या बेडकाचा वापर आदिवासी लोक शिकारीसाठी करत असत. तेच विष नवलनी यांच्या शरीरात सापडले आहे. या सर्व प्रकऱणामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही शंका आहे. कारण याच पाच युरोपीयन देशांनी रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला साथ दिली आहे. आता युद्धबंदीच्या चर्चा सुरु असतांना रशियावर दबाव टाकण्यासठी नवलनी प्रकरण सुरु झाल्याचीही शंका व्यक्त होत आहे. ( Alexei Navalny )

रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी आणि व्लादिमीर पुतिन हे पक्के वैरी म्हणून ओळखले जाते होते. नवलनी यांना १९ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यावर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. नवलनी यांचा मृत्यू झाला, त्याआधी ते काही तास अत्यंत स्वस्थ होते, पण अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या सर्वांमागे दक्षिण अमेरिकेतील विषारी डार्ट बेडकांच्या कातडीतून काढण्यात येणारे विष कारणीभूत असल्याचा दावा युरोपीयन देशांनी केला आहे. डार्ट बेडकाचे लांबी सुमारे दोन इंच असते, परंतु त्यांच्या शरीरात सुमारे १० प्रौढ लोकांना मारण्यासाठी पुरेसे विष असते. या बेडकांच्या त्वचेतून काढलेल्या विषाला एपिबॅटिडाइन म्हणतात. हे एक न्यूरोटॉक्सिन आहे, म्हणजेच मज्जासंस्थेवर थेट परिणाम करणारे विष. याला रासायनिक शस्त्र म्हणूनही ओळखले जाते. डार्ट बेडकाचे विष हे पृथ्वीवरील सर्वात घातक विषांपैकी एक मानले जाते.

=======

हे देखील वाचा : Suneung College : दक्षिण कोरियातील शैक्षणिक स्पर्धेचे भयाण वास्तव

=======

हे विष मॉर्फिनपेक्षा अंदाजे २०० पट जास्त शक्तिशाली असून या विषाचा प्रयोग ज्या व्यक्तीवर केला जातो, त्याला अर्धांगवायू, श्वासोच्छवासाच्या गंभीर समस्या होऊन त्याचा वेदनादायक मृत्यू होतो. हेच विष नवलनी यांना देण्यात आल्याचा दावा युरोपीयन देश करत आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, केवळ सरकारी यंत्रणाच इतके दुर्मिळ विष मिळवू शकते. शिवाय हिच सरकरी यंत्रणा तुरुंगासारख्या ठिकाणी एखाद्याला ते देऊ शकते. नवलनी यांचे १६ फेब्रुवारी २०२४ रोजी रशियाच्या सर्वात धोकादायक आर्क्टिक तुरुंगात निधन झाले. रशियन अधिकाऱ्यांनी दावा केला की फिरायला परतल्यानंतर ते अचानक आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र नवलनी यांच्या कुटुंबानं हा दावा कधीही स्विकारला नाही. ( Alexei Navalny )

विशेषतः नवलनी यांची पत्नी युलिया यांनी यासंदर्भात जागतिक स्तरावर प्रश्न विचारुन नवलनी यांची हत्याच असल्याचे ठामपणे सांगितले. अलेक्सी नवलनी यांचा जन्म १९७६ मध्ये मॉस्कोच्या पश्चिमेकडील एका गावात झाला. १९९८ मध्ये त्यांनी मॉस्को येथील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशियामधून कायद्याची पदवी प्राप्त केली. पुढच्या दशकात, त्यांनी हळूहळू रशियन राजकारणात प्रवेश केला आणि एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून उदयास आले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर क्रेमलिनमध्ये सत्ता केंद्रित करण्याचा आरोप केला. त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी संघटनेने सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तपशीलवार दावे केले. त्यांच्यावर अनेक वेळा खटले चालवण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. नवलनी यांना २०१७ ची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. यादरम्यानही नवलनी यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला. तेव्हा त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले. तिथे बरे होऊन ते रशियात परतल्यावर त्यांना अटक करण्यात आली. तीन वर्ष तुरुंगात राहिल्यावर नवलनी यांचा गुढ मृत्यू झाला. आता त्याच गुढ मृत्यूच्या रहस्याची उकल झाल्याचा दावा ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन आणि नेदरलँड्स या पाच युरोपीयन देशांनी केला असून यामुळे व्लादिमीर पुतिन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.