Home » मानवतावादी विचारवंत सावरकर

मानवतावादी विचारवंत सावरकर

by Correspondent
0 comment
Vinayak Damodar Savarkar | K Facts
Share

सावरकरांच्या हिंदुत्व, हिंदूसंघटन व हिंदूराष्ट्र ह्या कार्यामुळे त्यांचे विचार केवळ हिंदूंपुरतेच मर्यादित असून मानवतावादी विचारवंतांमध्ये सावरकरांचा समावेश होणे अशक्य आहे असा एक गैरसमज हिंदूद्वेष्ट्ये इतकेच नव्हे तर हिंदूत्ववाद्यांमध्येही पसरलेला आहे. खरतर सावरकर हे एक थोर मानवतावादी विचारवंत होते पण त्यांचा मानवतावाद स्वप्नाळू नसून वास्तवावर आधारित होता.

विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पाठिराखे व सावरकरांचे लंडनमधील सहकारी व ‘वर्ल्ड’ या पत्राचे संपादक गाय अल्ड्रेड ह्यांच्या एका पत्राला दिनांक २९ एप्रिलला १९४७ ला पाठविलेल्या उत्तरात सावरकर म्हणतात, ”माझ्या अलीकडील लेख नि भाषणांवरून आपणाला वाटेल की, मी आता संकुचित राष्ट्रवादी झालो आहे. मानवाची प्रगती राष्ट्रवाद नि संघराज्य ह्या मार्गाने व्हावी, असे माझे मत असले तरी ह्या सर्वांचे म्हणजेच मानवजातीचे अंतिम राजकीय ध्येय मानवता हेच असले पाहिजे, राष्ट्रवाद हे असू नये. सर्व राजकीय कला आणि शास्त्र यांचे अंतिम ध्येय मानवराज्य हेच असले पाहिजे. पृथ्वी हीच आपली माता नि मानवजात हेच आपले राष्ट्र. तुमचीही हीच विचारधारा असल्याने आपण दोघे बंधू बंधू आहोत असे मला वाटते.

असे असले तरी, या लहानशा पत्रात एवढेच सांगायचे की, इतिहासाच्या कालक्रमानुसार सध्या मला माझी सर्व शक्ती सापेक्ष अशा हिंदुसंघटन आणि हिंदुराष्ट्र कार्यासाठी लावावी लागत आहे. हे कार्यही मानवराज्य ध्येयाचीच एक पायरी आहे… विश्वबंधुत्वाच्या भावनेने भारतीय लढ्यात आपण दिलेल्या सहाय्याविषयी आपणाला धन्यवाद देणारा – सावरकर.” १

10 Interesting facts about VD Savarkar | Deccan Herald
Vinayak Damodar Savarkar

म्हणजे सावरकरांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याइतकाच हिंदुत्व, हिंदूसंघटन व हिंदूराष्ट्र ह्यामागील दृष्टीकोन विश्वबंधुत्व व मानवता हाच होता. केवळ तात्कालिक धोरण म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता, चिरकाल, चिरंतन, जगाच्या अंतापर्यंत हिंदुत्व टिकून रहावे असे त्यांचे उद्दीष्ट मुळीच नव्हते. हिंदुत्व ही विश्वबंधुत्व व मानवता ह्याकडे जाणारे पायरी आहे, एक टप्पा आहे ह्याची त्यांनी जाणीव होती. मानवता हे त्यांचे आदर्शवादी धोरण होते व हिंदुत्व हे त्यांचे तात्कालिक धोरण होते.

”We believe in a universal state embrassing all mankind. All divisions and distinctions are artificial though indispensable.”२ असे (१९५०) ला म्हणणारे सावरकर जर कुठलाही भेदाभेद न मानणारे मानवतावादी विचारवंत होते तर मग त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार का केला असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. ह्याचे उत्तर स्वत: सावरकरांनीच दिले आहे. १९५३ ला एका भाषणात सावरकर म्हणाले, ”सर्व मानव तेवढा एक मानणे, हे ध्येय उत्तम आहे. मला ते प्रियही आहे. कोणीही दाराला कुलूप लावू नये, हा नियमही आदर्श आहे. पण जगात चोर आहेत हे जाणून ज्याप्रमाणे आपण ‘कुलूप लावू नये’ हा आदर्श नियम बाजूला ठेवून आपापल्या घराला कुलूप घालतो, त्याप्रमाणे जगात इतर धार्मिक व राष्ट्रीय लोक आपल्या धर्माचा नि राष्ट्राचा विस्तार करीत आहेत, तोवर मीसुद्धा हिंदू म्हणून जगले पाहिजे आणि राष्ट्राला हिंदुत्वाचे कुलूप घालणे आवश्यक आहे.३ म्हणजे सावरकर मानवता ही आदर्श कल्पना व ध्येय म्हणून मानत असले तरी त्यांना वास्तवाचे भान होते, म्हणून वास्तववादी सावरकर हिंदूंवर हिंदू म्हणून अन्याय होत होता म्हणून त्यांनी हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हिंदूसंघटनेचा पुरस्कार केला. सावरकरांचे हिंदुत्व हेच तात्कालिक धोरण का होते ह्याचे उत्तरही वरील उताऱ्यातून मिळते.

अंदमानातून पाठविलेल्या दि.६-७-१९२० च्या पत्रात बंधू नारायणरावांना सावरकर लिहितात, ‘ज्यात सर्व मनुष्यजातीचा समावेश होईल आणि जेथील एकूण एक स्त्रियांना आणि पुरुषांना, ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी आणि हा प्रकाश – हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत – यांच्यापासून मिळणाऱ्या लाभासाठी प्रयत्न करणाचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील असे संपूर्ण जगाचे एकराष्ट्र हे आमचे ध्येय आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे. इतर सारे विभाग आणि भेद अवश्य असले तरी कृत्रिम आहेत.’ अंदमानात जन्मठेप भोगत असतानाही ते अखिल मानवजातीच्या समानतेवर आधारित राष्ट्राचे स्वप्न पाहत होते.

१९६५ ला ‘Organiser’ साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाला म्हणजे मृत्युच्या काही महिने आधी दिलेल्या मुलाखतीत सावरकर म्हणतात, ”My India would be a democratic state in which people belonging to different religions, sects or races would be treated with perfect equality. None would be allowed to dominate others. None would be deprived of his just and equal rights of free citizenship, so long as every one discharged the common obligations which he owed to the State as a whole.”४ आयुष्याच्या शेवटपर्यंत सावरकरांचा लोकशाही, मानवता व विश्वबंधुत्वावरील विश्वास अढळ होता व त्यांच्या स्वप्नातील भारत ह्याच समानतेच्या पायावर उभा असेल हे त्यांचे स्वप्न होते.

Veer Savarkar- Cellular Jail | History Under Your Feet
Vinayak Damodar Savarkar

मूळात सावरकरांचे हिंदुत्व, हिंदूसंघटन व हिंदूराष्ट्र हे संकुचित नसून उलट मानवतेवर आधारित आहेत. सावरकर हिंदूंसाठी वेगळे विशेषाधिकार मागत नव्हते, जे अधिकार हिंदूंना असतील तेच अहिंदूंनाही असतील. अल्पसंख्य असो नाहीतर बहुसंख्य, कोणालाही धर्माच्या आधारावर विशेषाधिकार असणार नाहीत.

सावरकर (Vinayak Damodar Savarkar) बंधू नारायणरावांना अंदमानातून दि.६-७-१९२०ला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘हिंदुस्थानवरील परकीयांच्या स्वामित्वाविरूध्द बंड करून उठावेसे जितके मला वाटते तितकेच मला जातिप्रथा व अस्पृश्यता यांच्याविरूध्दही बंड करून उठावेसे वाटते.’ तसेच १९४७ला ‘दलित सेवक’चे संपादक ‘वि न बरवे’ ह्यांना लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, ‘जर क्वचित माझी प्रकृती सुधारून सार्वजनिक कार्यात पडण्याइतकी शक्ती आली तर ह्या अस्पृश्यतेच्या नि पोथिजात जातिभेदाच्या उच्चाटनाचे कार्यच निदान एक दोन वर्ष तरी करावे आणि त्या घातक रूढीवर आणखी एक अखिल भारतीय चढाई करावी असे वारंवार मनात येते. इतके हे कार्य मला केवळ हिंदू संघटनार्थच नव्हे तर मानवी संघटनार्थही निकडीचे वाटते.’५ म्हणजे रत्नागिरीहून सुटल्यावर राजकारणाच्या धामधुमीत व भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाही सावरकरांच्या मनात जातिभेदाचे समूळ उच्चाटन हाच विचार होता. १९३९च्या कोलकाता, १९४१च्या भागलपूर व १९४२च्या कानपूरच्या हिंदूमहासभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी ‘अस्पृश्यतानिर्मूलनाचा’ तात्कालिक कार्यक्रमात समावेश केला होता. सावरकरांचा समाजसुधारणेमागील हेतूसुद्धा मानवता हाच होता.

राजकारण असो वा समाजकारण सदैव मानवतेचा विचार करणाऱ्या अशा ह्या महान मानवतावादी विचारवंताला त्यांच्या जयंतीदिनी शतश: नमन!

संदर्भ:

१. सावरकर, बाळाराव. स्वा. वीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व, वीर सावरकर प्रकाशन, १९७६, पृष्ठ ३९८-३९९

२. हिन्दु, वीर सावरकर अंक, २८ मे १९५३

३. हिंदू, दिनांक २८ डिसेंबर १९५३

४. मोरे, शेषराव. सावरकरांचे समाजकारण: सत्य आणि विपर्यास, राजहंस प्रकाशन, १९९२, पृष्ठ १२

५. सावरकर, बाळाराव, अखंड हिंदुस्थान लढा पर्व, वीर सावरकर प्रकाशन, १९७६, पृष्ठ ३६९-३७०

लेखक- अक्षय जोग


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.