भारताला असणाऱ्या अनेक सांस्कृतिक परंपरांमध्ये पंचांग परंपरेला मानाचे स्थान आहे. भारताची कालगणना सांगणारी ही परंपरा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग आहे. ही फक्त परंपरा नसून एक कला देखील आहे. खुद्द लोकमान्य टिळकांनी ज्योतिष परिषदेत या विषयी वक्तव्य केले होते. टिळक म्हणाले होते, ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे, पंचांगातील गणितात आकाशात दिसले पाहिजे!’
पंचांगांच्या दुनियेतलं ‘दाते पंचांग’ हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पण या दाते पंचांगची सुरुवात कधी झाली, हे माहितेय का तुम्हाला? सोलापूर आणि दाते पंचांग यांचं नातं जवळजवळ १०३ वर्षांचं! १९१६-१७ साली पहिले दाते पंचांग प्रसिद्ध झाले होते! ज्या काळात पंचांगांमध्ये एकवाक्यता नव्हती, मतभिन्नता होती, त्या काळात दाते पंचांगाचा खप दिवसेंदिवस वाढतच चालला होता. दाते पंचांग मराठी भाषेत असले, तरी कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश अशा राज्यांतील आणि परदेशातील मराठी भाषिक आवर्जून दाते पंचांग विकत घेतो.
सोलापूरचे दाते पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचा आज जन्मदिन. पंचांगकर्ते म्हणून ‘दाते’ हे नाव प्रसिद्ध आहेच, पण सोलापूरचे पंचांगकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे लक्ष्मणशास्त्री दाते. यांना ल. गो. किंवा नानाशास्त्री दाते असेही म्हटले जायचे. लोकमान्य टिळकांच्या वरील वाक्यावरून प्रेरित होऊन नानाशास्त्री यांनी पहिलं पंचांग काढलं आणि ते कोल्हापूरमधल्या अर्यभूषण प्रेस मधून छापून घेतलं. पंचांगामधील इतकी सारी गणितं सोडवताना नानाशास्त्री यांची मान आणि कंबर दुखत असे. गणितातील उत्तरासोबत या दुखण्यावरही नानाशास्त्रींनी जालीम उत्तर शोधून काढले. त्यांनी भिंतीवर गणिते सोडवायला सुरुवात केली. भिंतींची पाटी करत तिच्यावर पंचांगाचे धडे गिरवले. नाना शास्त्री नंतर धुंडीराजशास्त्री, श्रीधर लक्ष्मण दाते यांनीही दाते पंचांग लोकप्रिय करण्यास हातभार लावला. दाते पंचांगाची लोकप्रियता आणखी वाढवण्याचे काम नानाशास्त्री यांचे नातू आणि धुंडीराज शास्त्रींचे पुत्र मोहन दाते यांनी केले. बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या. पॉकेट पंचांग, मराठी, कन्नड आणि हिंदी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी ते आता थेट मोबाईलवर पंचांग उपलब्ध करून दाते पंचांगाने ग्राहकांची गरज आणि लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. मोहन दाते यांचे पुत्र ओमकार आणि श्रीधर दाते यांचे पुत्र विनय हेही आता या व्यवसायात आहेत. चार पिढ्यांच्या योगदानामुळे दाते पंचांग घरोघरी पोहोचले आहे.
हे ही वाचा : किर्लोस्करांची यशस्वी गाथा
दाते पंचांग हे ज्योतिषांना संदर्भग्रंथासारखे कामी येते. कोणत्याही गोष्टीचा ‘रेफरन्स’ दाते पंचांगातून मिळतो. ज्योतिष शास्त्र, पंचांग याचा अभ्यास करणाऱ्यांना दाते पंचांग विश्वासार्ह वाटते. अशा उपयुक्त पंचांगाची निर्मिती करणारे दाते पंचांगाचे सर्वेसर्वा लक्ष्मणशास्त्री दाते यांस जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
- सोनल सुर्वे