– श्रीकांत नारायण
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी २५ जून १९७५ साली भारतात अचानक जारी केलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरचा फार मोठा कलंक होता, जो नंतर लोकशाहीप्रेमी जनतेनेच पुसून टाकला. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ अशी तब्बल २१ महिने देशात आणीबाणी होती. ‘त्या’ आणीबाणीच्या कालखंडाला या महिन्यात ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र त्या कालखंडातील काही आठवणी अजूनही ताज्या आहेत.
१९७१ च्या बांगला देश युद्धात पाकिस्तानचा पराभव होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्यासाठी बांगला देशाला सर्व प्रकारची मदत केल्याने हा विजय सुकर झाला. या विजयामुळे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच नाव झाले होते. त्यांचा अभूतपूर्व असा दबदबा निर्माण झाला. त्यामुळे त्यांचा एकछत्री अंमल सुरु झाला.
देशापुढील महागाई, बेरोजगारी, काळाबाजार, नफेखोरी, भ्रष्टाचार आदी प्रमुख ज्वलंत प्रश्न मात्र कायम होते. त्यांच्याविरोधात सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन सुरु केले आणि त्यांनी ‘संपूर्ण क्रांती’ चा नारा दिला. जयप्रकाशजींच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी तसेच रा. स्व. संघांनेही सक्रिय पाठींबा दिला. आंदोलनाला तरुण वर्गाचा वाढता पाठिंबा मिळू लागल्यामुळे पाहता पाहता हे आंदोलन देशभर पेटले.
या आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून खवळलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी २५ जून १९७५ रोजी मध्यरात्री अचानक ‘आणीबाणी’ जाहीर केली आणि विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आणीबाणीत प्रामुख्याने रा. स्व. संघाला लक्ष्य करण्यात आले. संघावर बंदी घालण्यात आली आणि हजारो संघ-स्वयंसेवकांना अटक करून कारागृहात ठेवण्यात आले.
नागरी स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. सरकारविरुद्ध काहीही बोलण्यास आणि लिहिण्यास मनाई करण्यात आली. वृत्तपत्रांसाठी सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. एक प्रकारे ती अघोषित हुकूमशाहीच होती.
त्यावेळी माझी पत्रकारितेची नुकतीच सुरुवात झाली होती. मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची (बॅचलर ऑफ जर्नालिझम) पदवी घेऊन मी नांदेड येथील ‘प्रजावाणी’ या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रूजू झालो होतो. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. ते नांदेडचेच असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावेळी नांदेडला फार मोठे महत्व प्राप्त झाले होते.
शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) यांची पहिल्यापासून ‘कडक स्वभावाचे’ मंत्री म्हणून ख्याती होती त्यातच देशात ‘आणीबाणी’ लागू करण्यात आल्यामुळे त्यांचा कारभार आणखीनच ‘कडक’ झाला आणि त्याचे प्रत्यंतर सर्वत्र येऊ लागले. मुख्यमंत्री चव्हाण नांदेडचे असले तरी नांदेडमध्ये ‘आणीबाणी’ला विरोध झालाच. त्यामुळे रा. स्व. संघ आणि जनसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह बऱ्याच जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
मात्र एकदा खुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासमोरच आणीबाणीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आणि ती घटना सर्वत्र चर्चेची ठरली आणि तिचे नंतर दूरगामी परिणाम झाले. त्या घटनेला मी पत्रकार म्हणून साक्षी होतो.
मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याच शारदा भवन शिक्षण संस्थेच्या यशवंत महाविद्यालयात एक खास कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्री चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून त्याला उपस्थित होते. त्यामुळे महाविद्यालयात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्होत्रा हे जातीने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला तरुण विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीत आधीपासूनच मध्यभागी दबा धरून बसलेल्या भास्कर ब्रम्हनाथकर या तरुण संघ-स्वयंसेवकाने मुख्यमंत्री चव्हाण यांचे भाषण सुरु होताच एकदम उठून जोरजोराने आणीबाणीच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणांमुळे सारी सभा अवाक झाली आणि एकदम शांतता पसरली. स्वतः मुख्यमंत्री चव्हाण हे देखील या घोषणांनी काही काळ स्तब्ध झाले त्यांनाही पुढे काही बोलण्याचे सुचेना. श्री ब्रह्मनाथकर हे अगदी मध्यभागी बसल्याने पोलीसही चक्रावले कारण त्यांनाही त्यांच्यापर्यंत लवकर जाता येत नव्हते.
शेवटी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मल्होत्रा यांनी स्वतः पळत पळत जाऊन भास्कर ब्रम्हनाथकर यांस ताब्यात घेतले. खुद्द मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेत ही घटना घडल्यामुळे हे प्रकरण आपल्यावर शेकणार म्हणून पोलीस अधीक्षक अतिशय चिडले आणि त्याचा परिणाम म्हणून पोलीस कोठडीत ब्रम्हनाथकर यांचा अतिशय क्रूर पद्धतीने छळ करण्यात आला. आणीबाणीनंतर ‘आणीबाणीतील छळांच्या कहाण्या’ सांगणारे जे पुस्तक प्रसिद्ध झाले त्यामध्ये प्रामुख्याने ब्रम्हनाथकर यांच्या छळाचीही हकिकत सांगण्यात आली आहे.
त्यानंतरची एक घटना अशीच माझ्या कायम स्मरणात आहे. आणीबाणी (The Emergency) असतानाच काही महिन्यानंतर इंदिराजींनी लोकसभेच्या निवडणूका जाहीर केल्या. त्यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अर्थातच काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या प्रचारावर फारच मर्यादा आल्या होत्या. नांदेड लोकसभा मतदारसंघात, काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री चव्हाण यांच्याच यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गो. रा. म्हैसेकर आणि जनता पक्षातर्फे शेकापचे नेते केशवराव धोंडगे असा सामना रंगणार होता. म्हैसेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री चव्हाण यांची जुन्या मोंढ्यातील टॉवरसमोरील मैदानात पहिलीच सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला तरुणांची मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री चव्हाण बोलायला उभे राहताच एका तरुणाने जोरात बोंब ठोकली. त्यापाठोपाठ अनेक तरुणांनी आणीबाणीच्या विरोधात आणि जनता पक्षाच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. आणि सभेचा नूरच एकदम पालटला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी कसेबसे आपले भाषण आटोपते घेतले आणि ते तेथून निघून गेले. व्यासपीठावरून ते निघून जाताच काँग्रेसची प्रचार सभा क्षणार्धात जनता पक्षाची प्रचारसभा झाली.
तरुणांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली आणि नागरिकांना जनता पक्षाला निवडून देण्याचे आवाहन केले. आणीबाणीच्या विरोधात जनता जागृत झाल्याचे ते चित्र नंतर अधिकाधिक गडद होत गेले आणि अपेक्षेनुसार त्या निवडणुकीत जनतेचा विजय झाला आणि जनता पक्षाचे केशवराव धोंडगे हे प्रचंड मतांनी विजयी झाले.
(केशवराव धोंडगे यांचे निवडणूक चिन्ह ‘खटारा’ (गाडा) होते. त्यामुळे ”धोंडगे यांचा गाडा : दिल्लीला धाडा” ही निवडणूक काळातील घोषणा खूपच लोकप्रिय झाली होती) केवळ नांदेडलाच नव्हे तर संपूर्ण देशात जनता पक्षाचा प्रचंड मोठा विजय झाला आणि केंद्रात पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले.
या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा सर्वत्र जबरदस्त पराभव झाला. आणि केंद्रातील काँग्रेसची सत्ता पहिल्यांदाच संपुष्टात आली. ‘आणीबाणी’ला जनतेनेच सपशेल नाकारले होते आणि आपले लोकशाहीवरचे प्रेम आणखी दृढ केले होते.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.