भारताच्या प्राचीन वारसा स्थळांपैकी एक स्थळ छत्तीसगड राज्याच्या बस्तर जिल्ह्यात आहे. 1000 वर्ष जुन्या असलेल्या येथील दंतेश्वरी माता मंदिराला(Danteshwari Temple) पुरातन वारसा आहे. हा सगळा विशाल मंदिर परिसर डाकनी, शंखनी आणि धनकिनी नदीच्या काठावर आहे. भारतीय समृद्ध स्थापत्य कलेचा वारसा जपणारे हे दंतेश्वरी माता मंदिर काकतीय वंशाची कुलदेवी माता दंतेश्वरीचे जागृत स्थान आहे. बस्तरमध्ये प्रत्येक उत्सव हा या भागातील आदिवासींची आराध्य देवता दंतेश्वरी मातेच्या दरबारातून सुरू होतो. या मंदिर परिसरात नलयुग ते छिंदक नागवंशी काळातील वास्तुकलेचे वैभव विखुरलेले आहे. देवीच्या 52 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपिठ असलेल्या या दंतेश्वरी माता मंदिरात एकदा नाही तर तीनवेळा नवरात्रौत्सव साजरा होतो. वर्षातून तीनवेळा उत्सव साजरा होणारे हे देशातील एकमेव मंदिर आहे. त्यामुळे वर्षभर या मातेच्या मंदिरात भक्तांची गर्दी असते. छत्तिसगडसोबत महाराष्ट्र आणि तेलंगाणामधील भक्तही मोठ्या संख्येने दंतेश्वरी माता मंदिरात जातात.
देशातील 52 शक्तीपीठांपैकी एक मंदिर म्हणजे छत्तीसगड येथील दंतेश्वरी मंदिर(Danteshwari Temple). येथे माता सतीचे दात पडले होते, म्हणून तिचे नाव दंतेश्वरी पडले. देवीच्या नावावरून या भागाला दंतेवाडा हे नाव पडले. देवीच्या सर्व शक्तीपीठांमध्ये हे एकमेव मंदिर आहे, जिथे तीनवेळा नवरात्रौत्सव साजरा होतो. चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सवाबरोबर इथे नवरात्र फाल्गुन महिन्यात साजरी होतो. या उत्सवाला स्थानिक भाषेत फागुण माडाई उत्सवही म्हणतात.
या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दसऱ्याच्या दिवशी माता मंदिरातून बाहेर पडते. येथे माता रथातून नगरप्रदक्षिणा करते. बस्तरमध्ये दसरा उत्सवाचा विधी 75 दिवस चालतो. ही परंपरा सुमारे 610 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षापूर्वी हा भाग नक्षलवादी कारवायांनी प्रभावीत झालेला होता. त्यामुळे दंतेश्वरी मातेच्या मंदिरात फारशी गर्दी होत नसे. पण आता या मंदिराचा महिमा सर्वदूर पसरला आहे. हजार वर्षाची वास्तूकला आणि मातेचे रुप बघण्यासाठी भाविकांची गर्दी होते. शंखनी-दंकणी नदीच्या काठावर 12व्या-13व्या शतकापासून येथे मंदिरे असून दंतेश्वरी माता मंदिर(Danteshwari Temple) प्रमुख आहे. त्यासोबत असलेल्या अन्य मंदिरातही भाविकांची गर्दी होते. बस्तरमधील स्थानिक या दंतेश्वरी मातेची कुलदैवत म्हणून पूजा करतात. काकतीय राजवंशाची ही देवी इष्टदेवता असल्याची मान्यता आहे.

दंतेश्वरी माता मंदिराचे (Danteshwari Temple) मुख्य पुजारी म्हणून हरेंद्रनाथ जिया हे काम पहातात. ते सांगतात की, पौराणिक मान्यतांनुसार, जेव्हा भगवान विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे 52 भाग केले तेव्हा तिच्या शरीराचे 51 भाग देशाच्या विविध भागात पडले. 52 वे अंग म्हणजे देवीचा दात इथे पडला. त्यामुळे देवीचे नाव दंतेश्वरी पडले आणि ज्या गावात दात पडले त्या गावाचे नाव दंतेवाडा पडले. दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या पंचमीला, बस्तरच्या राजघराण्याचे सदस्य बस्तर दसरा उत्सवात सहभागी होण्यासाठी दंतेश्वरी मातेला आमंत्रित करण्यासाठी मंदिरात येतात. शतकानुशतके ही प्रथा सुरू आहे. अष्टमीला माता आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मंदिरातून बाहेर पडते. यावेळी ठिकठिकाणी मातेची डोली आणि छत्राचे स्वागत करण्यासाठी भक्तांची गर्दी होते.हजारो वर्ष जुने असलेले दंतेश्वरी मातेचे मंदिर हे भारतीय वास्तुशास्त्राचा अनोक पुरावा आहे. याबाबत आणखी संशोधन करण्याची मागणी होत आहे.
स्थानिकांच्या माहितीवरुन राजा अन्नम देव यांनी सुमारे 850 वर्षांपूर्वी तारळा गावात आई दंतेश्वरीचे मंदिर बांधले. 1932-33 मध्ये बस्तरच्या महाराणी प्रफुल्ल कुमार देवी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वी येथे फक्त गर्भगृह होते. आजूबाजूला दुसरी रचना नव्हती. मात्र वेळोवेळी स्थानिक राजांनी मंदिरात विकासकामे केली आणि आताचे भव्य स्वरुप मंदिराला प्राप्त झाले. मंदिराचे गर्भगृह ग्रॅनाइट दगडांनी बनलेली आहे. गर्भगृहाचा बाहेरील भाग मौल्यवान सराई आणि सागवान लाकडापासून बनलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर दोन मोठ्या मूर्तीही स्थापित केल्या आहेत. या चार हातांच्या मूर्ती भैरवबाबांच्या आहेत. स्थानिक, भैरव बाबा हे माँ दंतेश्वरीचे अंगरक्षक असल्याचे सांगतात. दंतेश्वरी मातेचे दर्शन घेतल्यानंतर भैरवबाबांचे दर्शन घेणे आवश्यक आहे. देवीच्या दर्शनाला येणारे भक्त भैरवबाबांना प्रसन्न करतात, मग भैरवबाबा देवीला भक्तांची इच्छा सांगतात. या मंदिराच्या आवारात गरूड स्तंभ आहे. असे मानले जाते की, जो कोणी हा स्तंभ आपल्या दोन्ही हातात धरतो आणि दोन्ही हातांची बोटे एकत्र जोडतात, तर त्याची इच्छा पूर्ण होते.
दंतेवाड्यात मातेचे मंदिर (Danteshwari Temple)कसे बांधले गेले याबद्दल अनेक दंतकथा आहेत. असे मानले जाते की, काकतीय वंशाचा राजा अन्नम देव यांच्या स्वप्नात येऊन देवीने मार्ग शीर्ष पौर्णिमेच्या दिवशी घोड्यावर बसून तुमची विजय यात्रा सुरू करा असे सांगितले, तसेच जिथे जाल तिथे तुमचे राज्य पसरेल असा आशीर्वादही दिला. मात्र राजाला देवीनं मागे बघून नका असे सांगितले होते. देवीच्या आज्ञेने राजाने प्रवासाला सुरुवात केली. डानकिनी-शंखनी नदीच्या संगमावर वाळूत देवीच्या पावलांचा आवाज थांबला. तेव्हा राजाने मागे वळून पाहिले आणि देवीच्या सांगण्यानुसार देवी संगमाच्या तीरावर स्थिर झाली. पुढे या ठिकाणी राजानं देवीचे मंदिर उभारल्याचे सांगतात. डंकिनी-शंखनी संगमाकडे जाणाऱ्या पायवाटेच्या बाजूच्या खडकावर आजही देवीच्या पावलांचे ठसे बघता येतात. दंतेश्वरी मातेच्या मंदिरात येणारे भक्त या पावलांचेही दर्शन घेतात.
==============
हे देखील वाचा : काही आदिवासी परिसरात महिषासुराला पुर्वज मानले जाते?
==============
दंतेश्वरी देवीची मुर्ती ही कायम पारंपारिक पोशाख आणि अलंकारांनी सजलेली असते. मंदिराच्या प्रांगणातील वटवृक्षाखाली पद्मासन मुद्रेत एक देवीची मूर्ती आहे. या भग्न मूर्तीच्या एका हातात तलवार आहे. स्थानिक लोक तिला ग्वालीन माता म्हणतात. ही देवी म्हणजे कलीचे रूप असल्याचे सांगतात.दंतेश्वरी देवीचे मंदिर डंकिनी शंखनी नदीच्या संगमावर अत्यंत सुंदर अशा स्थळी आहे. येथे केव्हाही जाता येते, भक्तांना राहण्याचीही येथे उत्तम व्यवस्था आहे. निसर्गसंपन्न अशा परिसरातील या दंतेश्वरी मातेच्या मंदिराला देवीभक्तांनी एकदा तरी भेट द्यायला हवी.
सई बने