Home » दलाई लामांनी दिला चीनला धक्का…

दलाई लामांनी दिला चीनला धक्का…

by Team Gajawaja
0 comment
Dalai Lama
Share

तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी तिसरा सर्वोच्च आध्यात्मिक नेता म्हणून एका 8 वर्षाच्या मुलाला मान्यता दिली आहे. दलाई लामा यांच्या या घोषणेनंतर चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण हा मुलगा मंगोलियन आहे. सध्या या मुलाचे आईवडील अमेरिकेमध्ये वास्तव्यास असले तरी हा मुलगा मुळ मंगोलियाचा आहे आणि मंगोलियाच्या धार्मिक नेत्याला मान्यता देण्यासाठी चीननं आधीच नकार दिला आहे. तो विरोध डावलून, किंबहून चीनकडे दुर्लक्ष करुन धर्मगुरु दलाई लामा यांनी 8 वर्षांच्या मंगोलियन मुलाला तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वोच्च आध्यात्मिक नेता म्हणून मान्यता दिली आहे.  हे करतांना दलाई लामा यांनी हा 8 वर्षाचा मुलगा, 10 व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म असल्याचे म्हटले आहे.  दलाई लामा यांनी 2016 मध्येच मंगोलियाच्या भेटीदरम्यान जेत्सून धम्पा रिनपोचे यांच्या पुनर्जन्माची घोषणा केली होती.  तेव्हा त्यांच्या मंगोलियाच्या भेटीवर चीननं आक्षेप घेतला होता. आता दलाई लामा यांच्या त्या भेटीचा हेतू उघड झाला आहे.  

ज्येष्ठ बौद्ध नेते दलाई लामा यांनी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक नेता म्हणून एका अमेरिकन मंगोलियन मुलाला मान्यता दिली आहे. स्थानिक मंगोलियन वृत्तानुसार ही घोषणा करताना उत्सव करण्यात आला. यावेळी सुमारे 600 मंगोलियन नागरिक जमले होते. या सोहळ्याचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यात लाल कपडे घातलेला एक मुलगा 87 वर्षीय दलाई लामा यांच्याजवळ आदरानं उभा असलेला दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे या मुलाला तिबेटी आध्यात्मिक नेता म्हणून मान्यता देण्याचा सोहळा पार पडला. येथेच 87 वर्षीय दलाई लामा राहतात आणि तिबेटमधील निर्वासित सरकारही याच ठिकाणाहून चालते.

दलाई लामा यांनी ज्या मुलाची निवड जाहीर केली आहे, तो 8 वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगोलियन मीडियानुसार जुळ्या भावंडांपैकी एकाची निवड करण्यात आली आहे. दलाई लामा यांनी या मुलाचे वर्णन 10 व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म असे केले आहे. बौद्ध धर्मात धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिले जाते. दलाई लामा यांना 1937 मध्ये पूर्वीच्या नेत्याचा पुनर्जन्म म्हणून ओळखले गेले जेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते. धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे धार्मिक नेत्याचा पुनर्जन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामुळे मंगोलियाचा शेजारी चीन मात्र नाराज होण्याची शक्यता आहे.

दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली आणि घोषणा केली की जेटसन धाम्पाचा नवीन अवतार जन्माला आला आहे आणि त्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. या भेटीनंतर चीनने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.  या भेटीचा चीन-मंगोलियन संबंधांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे चिनी सरकारने म्हटले होते.  पण दालई लामा यांनी. उलानबाटर सोडण्यापूर्वी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा, जेत्सुन धम्पा, यांनी मंगोलियामध्ये पुनर्जन्म घेतला आहे, असे जाहीर केले होते.  दलाई लामा यांनी ही घोषणा केल्यापासून त्यांचा शोध घेण्यात आला.   माहितीनुसार मंगोलियन मुलगा अगुईडाई आणि अचिल्टाई अल्तानार या जुळ्या मुलांपैकी एकाची निवड करण्यात आली आहे. मात्र, दोघांपैकी नक्की कोणाची निवड झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अल्टनार चिंचुलून आणि मोन्खनासन नर्मंदख अशी त्याच्या पालकांची नावे आहेत. मुलाचे वडील अल्टनार चिंचुलुन हे विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय संसाधन गटाचे कार्यकारी आहेत. मुलाची आजी मंगोलियाच्या माजी संसदपटू गारमजाव सेडेन या आहेत.

=======

हे देखील वाचा : गेल्या काही वर्षात पुतिन यांना विरोध केलेल्या अनेकांचा रहस्यमय मृत्यू

=======

मंगोलियामध्ये जन्मलेल्या मुलाला बौद्ध आध्यात्मिक नेत्याचा पुनर्जन्म म्हणून मान्यता देण्याच्या घोषणेमुळे चीन संतप्त होऊ शकतो.  चीनने याआधीच आग्रह धरला आहे की, तो केवळ चीन सरकारने मंजूर केलेल्या आणि विशेष टीमने निवडलेल्या बौद्ध नेत्यांनाच मान्यता देईल. मात्र आता दलाई लामा यांनी केलेल्या या घोषणेमुळे मंगोलियामध्ये आनंद व्यक्त होत आहे.  तरही चीन काय भूमिका घेतेय याचीही प्रतीक्षा त्यांना आहे.  दलाई लामा यांच्या या घोषणेनंतर चीन संतप्त होऊन मंगोलियावर आक्रमण करण्याचाही धोका आहे.   आधीच चीनने इनर मंगोलिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोठ्या भागावर कब्जा केला आहे.

1995 मध्ये, जेव्हा दलाई लामा यांनी नवीन पंचेन लामा नाव दिले, तेव्हा त्यांना चिनी अधिकाऱ्यांनी अटक केली आणि हद्दपार केले.   त्यांच्या जागी चीनने पंचेन लामा म्हणून निवडलेल्या बौद्धांना सादर केले. अशा परिस्थितीत चीन या मुलावरही आक्रमक कारवाई करण्याची शक्यता आहे. दलाई लामा यांनी स्वत: सांगितले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर पुढील दलाई लामा चीन किंवा चीनच्या ताब्यातील प्रदेशातील नसतील.  यातून त्यांनी सूचित केले आहे की त्यांचा उत्तराधिकारी भारत, नेपाळ, भूतान किंवा मंगोलिया सारख्या तिबेटी बौद्ध देशांपैकी असू शकतो.  आणि आता तशाच मंगोलियन मुलाची निवड झाली आहे.  यावर चीनची काय प्रतिक्रीया आहे, याकडे लक्ष लागले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.