श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी, १६ जुलै पहाटे ४ वाजता या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीच्या पाण्याने मुख्य गाभा-यात प्रवेश केला. या पाण्याचा श्रींच्या पादुकांना स्पर्श होऊन हे पाणी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडले. यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हणतात.कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा संगमस्थानावर असलेल्या नृसिंहवाडी येथून दरवर्षी ही बातमी आली की दत्तभक्त सुखावतात
नृसिंहवाडी म्हणजे दत्त प्रभूंचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वतीनी तप केलेले पावन स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी भारताचा दौरा करून या ठिकाणी आले. त्यांनी नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख मिळवून दिली. याच नृसिंहवाडीतील श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीला हजारो दत्तभक्त वर्षभर गर्दी करतात. कृष्णा नदीचा संगम आणि सुपिक जमिन, संपन्न शेती असे वातावण असले तरी नृसिंहवाडीला पावसाळ्याचे चार महिने कठिण असतात. (Dakshindwar Ceremony)
पण यातही वाडीत उत्सव साजरा केला जातो. त्यातलाच एक उत्सव म्हणजे, दक्षिणद्वार सोहळा. दरवर्षी कृष्णानदिच्या पाण्याची पातळी पावसाळ्यात वाढते. अशावेळी पाणी थेट मंदिरात येते. मात्र ही घटना दत्तभक्तांना प्रसन्न करणारी असते. याला एक सोहळ्याचे रुप प्राप्त झाले आहे. नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. पावसाळ्यात नदिच्या पाण्याची पातळी वाढल्यावर उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रीच्या स्वयंभू चरणांना स्पर्श करुन दक्षिण द्वारातून बाहेर पडते. हा सोहळा बघण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित असतात. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेतात, यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हटले जाते. मंगळवारी पहाटे ४ वाजता हा दक्षिण द्वार सोहळा झाला तेव्हाही मंदिर परिसरात अनेक भाविक उपस्थित होते. (Dakshindwar Ceremony)
त्यांनी दत्तनामाचा गजर करत या पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला. दक्षिणद्वार सोहळा झाल्यावर मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले आहेत. दक्षिणद्वार सोहळा होतो, त्याआधी मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रीच्या उत्सव मूर्तीवर करण्यात येतात.तसेच आता उत्सव सोहळे नृसिंहवाडी येथे सुरु आहेत. पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच होत आहेत. दक्षिणद्वार सोहळा झाल्यावर कृष्णा नदिच्या पाण्याची पातळी खाली गेली की, पुन्हा सर्व मंदिर परिसराची स्वच्छता करुन श्रीच्या मंदिरात पुन्हा पूजा अर्चा सुरु होते. (Dakshindwar Ceremony)
नृसिंह सरस्वतींनी येथे बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यानंतर ते गाणगापूरला निघून गेले. नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान व्यक्तींनी येथे वास्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण नृसिंहवाडीत भक्तीमय वातावरण असते. पहाटे तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत नृसिंहवाडीतील श्रीच्या मंदिरात अविरत सेवा सुरु असते. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्तगजरात पालखी सोहळा आणि शेजारती यासारख्या सोहळ्यांनी हा परिसर कायम दत्तभत्तीमध्ये तल्लीन झालेला असतो.
देशभरातून हजारो भक्त या ठिकाणी येतात. येथे होणारी श्रींची दत्त पालखी सोहळा हा विलक्षण सोहळा असतो. स्थानिक पुजारी वेगवेगळी भजनं गात श्रीची पालखी मंदिराभोवती फिरवतात. रात्री होणा-या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी असते.कृष्णा नदिकाठावरच मंदिर असल्यामुळे मंदराचे घाट भक्कमपणे बांधण्यात आलेले आहेत. (Dakshindwar Ceremony)
===========================
हे देखील वाचा : ‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…
============================
पावसाळा सुरु झाला की याच घाटांवर वाढणा-या पाण्याचा पातळीवरुन दक्षिणद्वार सोहळा कधी होणार याचा अंदाज बांधत पुजारी या सोहळ्याची तयारी करतात. २००५ मध्ये मात्र आलेल्या महापुराने जवळपास संपूर्ण नृसिंहवाडीमध्येच हाहाकार केला होता. तेव्हा या मंदिराच्या वरच्या घाटांवरुनही पाणी वाहिले होते. अलिकडील काही वर्षात नृसिंहवाडीयेथे जाणा-या भाविकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.
या भाविकांसाठी नृसिंहवाडी संस्थानच्या धर्मशाळा, भक्त निवास, प्रसादालयाची व्यवस्था आहे. तसेच वेदपूजेसाठी स्वतंत्र भवानाची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधांमुळेच येथे भाविकांची गर्दी असते. आता दक्षिणद्वार सोहळा झाल्यामुळे कृष्णा नदित स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. (Dakshindwar Ceremony)
सई बने