आज संपूर्ण भारतभर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या मंदिरापासून ते घरातील देवघरात हा जन्माष्टमी आनंदाने साजरी होताना दिसते. हा सण फक्त भारतात नव्हे तर जगभरत जिथे जिथे कृष्ण भक्त आहे तिथे तिथे कृष्ण जयंती मोठ्या प्रमाणावर होते. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.
देवकी आणि वासुदेव यांचा आठवा पुत्र म्हणून श्री विष्णु यांनी पृथ्वीवर आठवा अवतार घेतला. आज सर्वत्र जन्माष्टमीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र उद्या देखील हा उत्साह असाच कायम राहणार आहे. किंबहुना हा उत्साह आनंद अधिकच द्विगुणित होणार आहे. याचे कारण म्हणजे उद्या असणारी दहीहंडी. दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. दहीहंडीच्या सणात मातीचे भांडे दही पोहे भरून दोरीवर टांगले जाते. त्यानंतर गोविंदांचा एक गट थरावर थर रचून ते भांडे फोडतो. हे जरी सगळ्यांना माहित असले तरी या सणाचे महत्व, सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया.
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची खूप आवड होती. तो हे पदार्थ दिसताच खाऊन टाकायचा. म्हणूनच कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि गोकुळातल्या इतर गोपिका दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिंक्यावर ठेवायच्या. दही वार असल्याने श्रीकृष्णाचा हात तिथपर्यंत पोह्चायचा नाही. म्हणून तो मित्र हाताशी घेऊन त्यांच्या पाठीवर चढून ते दही खायचा आणि मित्रांना पण द्यायचा. याचीच एक आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडीचा हा खेळ खूपच मजेशीर असतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. आजकाल हा खेळ, खेळ नाही तर स्पर्धा झाली आहे. सर्वात उंच दहीहंडी वर बांधायची आणि जो गट ती फोडेल त्याला रोख पारितोषिक दयायचे असे आता या दहीहंडीचे स्वरूप झाले आहे. याचा सुद्धा मोठा सराव केला जातो. या दहीहंडी फोडण्याची प्रक्रिया देखील मानाची समजली जाते.
एका विशिष्ट उंचीवर एक मातीचे मडके बांधले जाते. त्यात दही, दूध, लोणी, पोहे भरतात आणि वर नारळ ठेवतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या खालच्या थरापासून प्रत्येक वरच्या थरावर गोविंदा तोल सांभाळतो आणि वरच्याच भार आपल्यावर घेतो. सर्वात वर जो एक मुलगा असतो तो गोविंदा. तो त्याचा तोल सांभाळत हंडी फोडतो.
======
हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त
======
ही हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. मुंबईत सर्वात जास्त या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. आताच्या काळात तर गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनेक मंडळे अशी आहेत, ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. दहीहंडीला सरकारने २०२२ मध्ये साहसी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. मात्र या खेळामध्ये अनेक गोविंदांना यात आपले प्राण गमवावे लागतात तर काही जखमी होतात तर काहींना कायमस्वरूपाचे अपंगत्व येते.