यावर्षी आपण भगवान श्रीकृष्णाची ५२५१ वी जयंती साजरी करत आहोत. दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला दहीहंडीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ ऑगस्ट रोजी सगळ्यांनी जल्लोषात कृष्ण जन्म साजरा केला. मध्यरात्री १२ ला श्रीकृष्णाला पाळण्यात टाकून त्याचा जन्मोत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि प्रेमळ भावनेने केला.
आता आज २७ ऑगस्ट रोजी सगळीकडे धूम असणार आहे ती दहीहंडीची. सर्व गोविंदांना आज जास्तीत जास्त दहीहंडी कशा फोडता येतील याचाच विचार असणार आहे. तसे पाहिले तर दहीहंडी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते. मात्र मुंबईमध्ये या दिवशी एक वेगळेच वातावरण असते. हवेमध्ये एक नवा जल्लोष, आनंद, उत्साह असतो.
मुंबईमधील दहीहंडी ही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अतिशय उंच उंच दहीहंडी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात. इथे दहीहंडी फोडण्यासाठी अतिशय प्रसिद्ध पथकं आहेत. ज्यांच्यामध्ये सर्वात उंच दहीहंडी फोडण्यासाठी नेहमी चढाओढ पाहायला मिळते. आज सर्वच मुंबईतील पथकं या दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. खास या दहीहंडी पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर जगभरातून देखील अनेक लोकं मुंबईत येत असतात. लहान- मोठ्या असंख्य दहीहंडी मुंबईमध्ये आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील अशातच आज जाणून घेऊया मुंबईतील निवडक अतिशय प्रसिद्ध आणि मानाच्या दहिहंडीबद्दल.
1) जांबोरी मैदान, वरळी :
मुंबईतील पहिली मोठी आणि अतिशय प्रसिद्ध दहीहंडी म्हणजे ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या ‘श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट’ची. या ट्रस्टच्या माध्यमातून वरळीत मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. वरळीतील जी. एम. भोसले मार्गावरील जांबोरी मैदानावर ही दहीहंडी बांधली जाते. ही दक्षिण मुंबईची सर्वांत उंच आणि मानाची दहहंडी आहे. या दहीहंडीला बॉलीवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटी उपस्थिती लावतात. असल्याने ही दहीहंडी प्रसिद्ध आहे.
2) घाटकोपर :
मुंबईतील घाटकोपरची दहीहंडी देखील लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. भाजपा आमदार राम कदम यांची घाटकोपरची दहीहंडी मुंबईसोबतच संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला अनेक बड्या बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती असते. राम कदम यांनी यावर्षी देशातील सर्वात मोठी दहीहंडी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.
3) लालबाग :
मुंबईतील किंवा मुंबई बाहेरील लोकांना लालबाग ही जागा फक्त गणपतीसाठीच माहीत आहे. पण असे अजिबातच नाहीये. येथील दहीहंडी देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. पारंपारिक दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी लालबाग हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासोबतच लोअर परळमधील जय जवान मित्र मंडळाचीही दहीहंडी पाहण्यासारखी असते.
4) देवीपाडा मैदान, बोरिवली :
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून बोरिवली, पूर्व देवीपाडा येथील मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. ही राजकीय दहीहंडी असल्याने येथे हंडी फोडण्यासाठी मुंबईभरातून गोविंदांचे संघ पोहोचतात. दरवर्षी लाखोंची बक्षिसेही येथे ठेवली जातात. विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर हे देखील अशोकवन येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. त्यांची हंडी ही सांताक्रूझ पूर्व स्थानकासमोर गेल्या 20 वर्षांपासून आयोजित केली जाते.
5) छबिलदास लेन, दादर
मुंबईतील दादर परिसरात साजरा होणारा हा दहीहंडी उत्सव सर्वांत मोठा दहीहंडी उत्सव आहे. येथे फक्त तरुण गोविंदांचीच पथके नाही, तर तरुणींच्या पथकेही मटकी फोडण्याचे प्रयत्न करतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते.
6) वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे कॉलनी येथे या दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दहीहंडी म्हणून ही दहीहंडी ओळखली जाते. मुंबईतील अनेक मोठ्या दहीहंडी पथकांना येथे येण्यासाठी खास आमंत्रण दिले जाते. इथे देखील अनेक मोठे सेलिब्रिटी येतात.
======
हे देखील वाचा : दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती
======
7) संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’मार्फत होणारी ही दहीहंडी आहे. ही दहीहंडी ठाण्यातील अतिशय प्रसिद्ध दहीहंडी आहे. मागील काही वर्षांमध्ये या दहिहंडीने चांगलीच लोकप्रियता आणि ओळख निर्माण केली आहे. २०१२ मध्ये जय जवान गोविंदा मंडळाने येथे ४३.७९ फूट आणि ९ थरांचा मानवी मनोरा रचून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नाव नोंदवले होते. ठाणेमध्ये वर्तकनगर परिसरातील महापालिकेच्या शाळा परिसरात याचे आयोजन करण्यात आले आहे.
8) श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ, खारघर
नवी मुंबई येथील खारघर परिसरातील श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ आपल्या अनोख्या जन्माष्टमी उत्सवासाठी ओळखले जाते. सुव्यवस्थित आणि थेट उत्सवांसाठी हे मंडळ गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झाले आहे. येथील दहीहंडी कार्यक्रम ही शहरातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते.