आपला शेजारी पाकिस्तान (Pakistan) सध्या आर्थिक संकटात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेथे गगनाला भिडले आहेत. त्यात भर म्हणजे पाकिस्तानच्या मोठ्या भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. क्वेटा, लाहोर, कराचीसह देशातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पाकिस्तानच्या 22 जिल्ह्यांमध्ये वीजच गुल झाली आहे. अवघा पाकिस्तान (Pakistan) अंधारात बुडला आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये विजेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानची प्रमुख शहरं इस्लामाबाद, कराची आणि पेशावर यांच्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वीज खंडित झाली असून विजेअभावी लोकांचे हाल होत आहेत. याला कारण सर्वच क्षेत्रातील कामगारांना देण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारकडे पैसेच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलभूत सेवा पुरवणा-या क्षेत्रातील कामगारांची उपासमार होत आहे. हे एकीकडे होत असताना पाकिस्तानचे सरकार चालवणा-या अधिका-यांनी आणि काही नेत्यांनी महागड्या गाड्या स्वतःच्या ताफ्यात घेतल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला खाण्यासाठी अन्न नसतांना आणि विजेअभावी सर्व व्यवहास ठप्प झालेले असतांना नेत्यांची मात्र उधळेगीरी चालू आहे. यामुळे पाकिस्तानी (Pakistan) जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या सर्वत्र ब्लॅक आऊट आहे. तेथील ऊर्जा मंत्रालयाने वीज यंत्रणा बिघडली असून सर्व प्रणाली सुधारण्यासाठी वेगाने काम केले जात असल्याचे जाहीर केले आहे. उर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर या ब्लॅकआऊटबाबत आपले निवेदन दिले आहे. वीज वाचवण्यासाठी सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिवाळ्यात वीज निर्मिती युनिट बंद ठेवली जात आहेत. मात्र यानंतर सकाळी जेव्हा ही सर्व यंत्रणा चालू करण्याच्या प्रयत्न झाला तेव्हा उत्तर पाकिस्तानच्या क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये बरेच चढ-उतार दिसून आले. त्यानंतर एकामागून एक संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली. पॉवर ग्रीड पूर्ववत होण्यासाठी 12 तास लागतील, असे त्यांनी वृत्तवाहिनीवर जाहीर केले.
हे एकीकडे असतांना ज्या नागरिकांनी या सर्वाचा फटका बसला आहे, ते दुकानदार आणि सामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत. आधीच पाकिस्तानमध्ये (Pakistan) विज पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य शहरं वगळता अन्य पाकिस्तानमध्ये 10 ते 12 तास विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यात आता सर्वच यंत्रणा नादुरुस्त झाल्याने अर्धेअधिक पाकिस्तान अंधारात डुबले आहे. पाकिस्तानच्या पेशावर आणि इस्लामाबादमध्ये यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानमधील 117 पॉवर ग्रीड वीजविना आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या चार महिन्यांत अशाप्रकारे संपूर्ण देशाचा पॉवर ग्रीड ठप्प होण्याची ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तान सरकारने यावर्षी नवीन ऊर्जा योजना तयार केली. मात्र तेथील नागरिकांनी ही योजना स्विकारली नाही. या योजनेला विरोध करणारे बहुतेक नागरिक हे व्यापारी होते.
=========
हे देखील वाचा : फोनमध्ये इंटरनेट सुरु होत नसेल तर ‘या’ सेटिंग्समध्ये करा बदल
=========
सध्यातरी पाकिस्तानमध्ये (Pakistan) विजेचे संकट हे अधिक गडद होत चालले आहे. विज वाचवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीनंतर फक्त एलईडी बल्ब वापरण्यात यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सरकारी विभागांमध्ये 30 टक्के वीज बचत करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय रात्री साडेआठ वाजेनंतर सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या सर्वांना पाकिस्तानमधील नागरिकांचा विरोध होत आहे. कराचीमधील नागरिकही वीज बचत करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात निदर्शने करत आहेत. वास्तविक, पाकिस्तानमधील (Pakistan) बहुतांश वीज प्रकल्पांमध्ये तेलापासून वीजनिर्मिती केली जाते. हे तेल आयात केले जाते. पाकिस्तानचे परकीय चलन कमी झाले आहे. त्यामुळे तेलाची आयात तेलाची आयात मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. तेलाची आयात कमी झाल्यामुळे विजेचा मोठा तुटवडा पाकिस्तानमध्ये निर्माण झाला आहे. त्यातच या विजेचा पुरवठाही असमान पद्धतीनं होत आहे. पाकिस्तानच्या शहरी भागात विजेचा पुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र विज 10 ते 12 तास विज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच आता सगळाच पाकिस्तान पुन्हा एकदा काळोखात गेला असून नागरिकांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.
सई बने